बरहा मधल्या युक्त्या

परवा अनामिक ह्यांचा लेख वाचताना जाणवले की बऱ्याच मंडळींना मराठी लेखनाची आवड आहे व त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत. काही मंडळी बरहा चा वापर करतात जेणे करून आपण केलेले लेखन धारीणीत वाचवून ठेवता येते व लेख मोठे असल्यास (एका बैठकीत ते पूर्ण होऊ शकत नाहीत) किंवा चुकीने दुसरीच कळ दाबली गेल्यास लेखन नष्ट होत नाही.
बरहा वापरणारी बरीच मंडळी "र्या" व "ऱ्या" तसेच "र्ह्या" व "ऱ्ह्या" ह्यात थोडा गोंधळ करतात व त्यांना नेमक्या अक्षरांसाठी कोणत्या कळा कश्या उमटवाव्यात हे माहित नसावे. एका मनोगतीचा व्य. नि. आला त्यात त्यांनी "ज्ञ" बरहावर कसे उमटवावे हे विचारले होते..... त्यांना समर्पक उत्तर दिले व मग लक्षांत आले की ही अडचण बऱ्या(र्या)च मनोगतींची  असावी म्हणून ह्या लेखाचे प्रयोजन.    
येथे मनोगतावर परंपरांना प्राधान्य देणारी / न देणारी मंडळी असतील परंतु सर्व परंपरांचे उल्लंघन करून एक माझा अनुभव येथे नमुद करतोय....कृपया त्यांनी ह्या लेखनाला माफ करावे
खालील काही गोष्टी लक्षात ठेवल्यास लेखन सहजसाध्य होईल. 
१  - बरहामध्ये जे अक्षर समाधान कारक उमटत नसेल ते मनोगतावर जावून टंकाळून घ्यावे.....
२  - मनोगतावर टंकाळलेले अक्षर कॉपी - पेस्ट चा पर्याय वापरून बरहाच्या खिडकीत डकवावे
३  - पेस्ट करताना "पेस्ट स्पेशल" हा पर्याय स्विकारून "ऑटोकन्व्हर्ट" ने डकवावे.
४ -  बरहाच्या लेखन चौकटीत ती अक्षरे नेमका पर्याय सुचवतात.

उदाहरणार्थ ज्ञ हे अक्षर बरहा मध्ये उमटवायचे असल्यास येथे टंकाळून बरहाच्या लेखन चौकटीत "ऑटो कन्व्हर्ट" हा स्पेशल पेस्ट पर्याय निवडून डकवावे - म्हणजे तेथे  J ~ J  असे आपणांस दिसेल. हाच पर्याय पडताळणी साठी बरहामध्ये करून बघावा. 
आहे की नाही युक्ती ???
आपल्या कडेही अश्या काही छोटेखानी युक्त्या असल्यास नक्की सांगाव्यात !
शुभेच्छा....