फेड - जीएंची एक लघुकथा

जीएंच्या लांबलचक कथा तुम्ही पाहिल्यात. पण छोट्या कथा पाहिल्यात का?

'कुसुमगुंजा' हे जीएंनी लिहिलेल्या लघुकथांचं पुस्तक आणि मी वाचलेलं जीएंचं पहिलं पुस्तक. पुस्तक वाचनाची काही पद्धत असते, पहिल्या पानापासून, अगदी प्रस्तावनेपासूनच सुरुवात करावी वगैरे गोष्टी माहिती नव्हत्या, त्यावेळी पुस्तकात मध्येच कुठेतरी असलेली "फेड" ही कथा प्रथम वाचली. नंतर झपाटून जाऊन जीएंची जवळपास सगळी पुस्तकं वाचून काढली. पण ज्या कथेने मला जीएंची ओळख करुन दिली ती कथा तुम्हीही वाचावी अशी इच्छा आहे.

एक जीएप्रेमी वाचक पुरुषोत्तम धाक्रस यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून,

जी.ए. कुलकर्णी यांच्या ह्या 'कुसुमगुंजा' म्हणजे काही दुर्मिळ चीजा आहेत. त्यांत
बहुतेक छोट्या छोट्या कथा असल्या तरी कथाकाव्याच्या रुढ चौकटीत बसवता न येणारेही
काही मासले त्यात आढळतील."जी.ए. म्हणजे प्रदीर्घ पल्ल्याचा लेखक", "त्यांच्या कथा
म्हणजे कादंबऱ्याच त्या," हा त्यांचा लौकिक इथे डोकावत नाही. इथे जीए नावाचा एक
अनोखा पक्षी चोचीतून एकेक आगळी गुंज जमवीत असल्याचा प्रत्यय येतो.

फेड


शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद माधवला कधी वाटला नाही. कारण घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा दवाखान्याकडे जावे लागे. घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ-मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे, "आता लौकर पळ, नाही तर डॉक्टर जातील."

दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे. मग रस्त्यातच पोह्यांचा एकेक घास खात जायला बरे असे. पण कट्ट्यावर बसून खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती. आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर त्याला एकदाही मिळाले नव्हते.

माधव देवळापाशी आला. त्या ठिकाणी दामलेचे किराणा मालाचे दुकान होते. माधव जवळ आल्यावर दामलेने त्याला हाक मारली, व म्हटले "अरे, काय सामान घेऊन जाताना धाड होत नाही. पैसे कोण तुझा बाप देणार आहे की काय?"

माधव एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, "आबा तर आजारी आहेत. आईला विचारुन सांगतो."

दामले खाली उतरून आला. त्याने जाड मिशा ठेवल्या होत्या, आणि तो फार दारू पितो हे सगळ्यांना माहीत तर होतेच. पण त्याची बायकोच सगळ्यांना तसे सांगत असे. तो म्हणाला, "काय खेळ चालवलात की काय? उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये, नाही तर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन."दामलेने नंतर हात उगारला व माधवच्या थोबाडीत दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले, व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला.

आई त्याची वाट बघत होती. पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, "काय झालं? सगळं सांग मला."

माधवने सगळे सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले, "आज दवाखाना नको. मघाशीच डॉक्टर आले होते. उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस."

ती कपाटाकडे गेली व एक-दोन डबे उघडून तिने पाहिले. एका डब्यातून तिने काही तरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, "मी येथेच गाडगीळांकडे जाऊन येते."

माधवने समोरच्या चहा-पोह्यांकडे पाहिले. किती तरी दिवसांनी त्याला कट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती. पण त्याची भूकच मेली होती. आणि त्याला चेंगरुन गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला. गाडगीळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तेथल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते, आणि तेथल्या खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या.

थोड्या वेळाने आई परत आली. चहा-पोहे तसेच पाहून तिने माधवकडे पाहिले. पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर टाकली, आणि आबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले, "मी दहा मिनिटांत परत येते मारुतीला जाऊन!"

तिने बाहेरच्या दाराला नुकतीच कडी लावली व माधवला म्हटले, "चल माझ्याबरोबर." माधवने तिच्या पायांकडे पाहत म्हटले, "तुझी जोडवी राहिलीच की!"

जोडवी घातल्याखेरीज आई कधी बाहेर जात नसे, आणि तिच्या बरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा होणारा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे. मग आईने पुन्हा कडी काढली, देवाच्या कोनाड्यांतील जोडवी गोळा करून पायांच्या बोटात अडकवली व त्याला बाजूला घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, "हं, आता चल."

आई दामलेच्या दुकानात आली. दामले रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती, तरी दामले तिच्याएवढा उंच दिसत होता.

"दामले, तुमचे किती पैसे द्यायचे आहेत?" तिने शांतपणे विचारले, "पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल, असं मी गेल्या शनिवारीच सांगितलं होतं ना? त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना?"

"म्हणालो म्हणून काय झालं? मऊ लागलं म्हणून काय कोपरानं खणायचं काय?" दामले म्हणाला, "तुमची बाकी नऊ रुपये आहे?"

आईने नोटा काढल्या व एकेक पुन्हा मोजून त्या दामलेला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुर्मीने म्हटले, "बाकी चुकती झाली. आता यापुढं उधार मिळणार नाही."

"सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही." आई म्हणाली. तिने झटकन हात वर केला, व फाडकन दामल्याच्या मुस्काटात दिली. दामले खुळ्यासारखा पाहतच राहिला. रस्त्यावर दोन बायका शाल पांघरून मारूतीला चालल्या होत्या, त्या तेथेच थबकल्या. एक माणूस सायकलीवरून उतरून पाहू लागला. दुकानातील गिऱ्हाईके तर एकदम गप्पच झाली. आणि साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम तो तसाच हातात धरून वेंधळ्यासारखा पाहत उगाच दोरा फिरवू लागला.

"तू एक चपराक याला दिली होतीस ना, ती देखील फेडायचीच होती. आता सगळी बाकी चुकती झाली." आई म्हणाली, "आणखी एक लक्षात ठेव. पुन्हा जर पोराच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मढं पाडीन आडवं!"

आई तितक्याच शांतपणे फळीवरून खाली उतरली व माधवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ढकलत चालू लागली. "आता घरी जाऊन चहा तापवून देते. मग कट्ट्यावर बसून पोहे खा."

माधव त्या चित्राने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली.

हाच लेख येथेही वाचता येईल.