माहिती तंत्रज्ञानात मराठीचे योगदान : भटकर / शिकारपूर ह्यांचे विचार

कालच्या ईसकाळमध्ये ही बातमी वाचनात आली. संगणकावर मराठीच्या वापराविषयी चिंता किंवा गोडी असणाऱ्या सर्वांना विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या हेतूने ती बातमी येथे उतरवून काढली आहे :

ईसकाळ मधील बातमी : माहिती तंत्रज्ञानातील मराठीच्या योगदानाबाबत विचार करण्याची वेळ - विजय भटकर

पुणे, ता. १२ - ""माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे आणि पर्यायाने मराठीचे काय योगदान आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले. ........
दीपक शिकारपूर लिखित "संगणकाची भरारी' या पुस्तकाचे प्रकाशन श्री. भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पुण्याचे पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ऑटोलाइन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक एम. राधाकृष्णन, नॅसडॅक दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक घनश्‍याम दास, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, विद्यार्थी साहायक समितीच्या विश्‍वस्त निर्मलाताई पुरंदरे आदी या वेळी उपस्थित होते. भटकर पुढे म्हणाले, ""सध्या मराठीचे काय होणार अशी ओरड होत आहे. माहिती तंत्रज्ञानातही मराठीचा वापर अतिशय कमी आहे. या क्षेत्राचा आवाका लक्षात घेता संचार तंत्रज्ञान, सायबर लॉज, संगणक यावर मराठीसह सर्व भाषांत जास्तीत जास्त पुस्तकांची निर्मिती व्हायला हवी. भाषा विज्ञाननिष्ठ झाल्या तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. यासाठी सध्याच्या इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे काय योगदान आहे, याचा विचार व्हायला हवा.''

संगणक आणि विज्ञानाचे प्रमाणबद्ध साहित्य इंटरनेटवर उपलब्ध व्हायला हवे आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवे, असेही ते म्हणाले.

पुण्यातील आणि ग्रामीण भागातील युवा वाचकवर्ग समोर ठेवून पुस्तक लिहिल्याचे श्री. शिकारपूर यांनी सांगितले. आजपर्यंतची तंत्रज्ञानाची; तसेच या व्यवसायाची भरारी आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोचविण्यासाठी काय करता येईल, असे या पुस्तकाचे तीन भाग आहेत. संगणक क्षेत्रात धाकदपटशापेक्षा कौशल्यनिर्मिती आणि प्रशिक्षण या बाबी स्थानिकांना रोजगार देतील, असेही ते म्हणाले.