संपादकीय

रांगोळी

नमस्कार रसिकहो,

मराठी भाषेवर, साहित्यावर प्रेम करणार्‍यांच्या ह्या 'महाजालीय मांदियाळीत' दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपले पुन्हा एकदा स्वागत.
मनोगतचा दिवाळी अंक हा दर वर्षी एक ई-अंक म्हणून प्रकाशित होतो. तो संगणकासमोर बसून वाचणे अपेक्षित असते. त्याची रचना, मांडणी, सजावट ही त्याच दृष्टिकोनातून केलेली असते.

ह्या अंकाप्रमाणेच, प्रामाणिक प्रयत्नांतून तयार झालेले इतरही काही दिवाळी अंक आणि नियतकालिके महाजालावर पहायला मिळतात, अनेकजणांकडून वाचली जातात. ह्या सगळ्यांतून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नव्या तांत्रिक आणि संगणकीय युगात, वाचन आणि लेखन संस्कृतीत घडू पाहणारे बदल. अजूनही वाचन म्हटल्यावर नव्व्याण्णव टक्के लोकांना पुस्तकेच आठवतील. तरीही सर्वांनीच काळाची ही बदलणारी पावले ओळखायला हवीत. कारण समस्त साहित्यप्रेमी जगत अगदी कासवाच्या गतीने का होईना पण एका नव्या क्षितिजाकडे वाटचाल करत आहे, जिथे छापील पुस्तकांना, साहित्याला काही नवे पर्याय (प्रतिस्पर्धी नव्हेत!) निर्माण होत आहेत. असेच दोन महत्त्वाचे पर्याय म्हणजे पुस्तकाची वेब आवृत्ती आणि पॉडकास्टिंग. मराठीला चांगले वाचक नाहीत म्हणून चांगली पुस्तके लिहिली जात नाहीत की चांगली पुस्तके नाहीत म्हणून वाचक इतर भाषांतील (म्हणजे प्रामुख्याने इंग्रजी) पुस्तकांकडे वळतात, अशा वृथा वादात आपली ऊर्जा आणि वेळ वाया न घालवता आपण सर्वांनी ह्या बदलांचे खुल्या मनाने स्वागतच करायला हवे.

पुस्तक हे उत्पादन अतिशय कष्टपूर्वक निर्मिलेले असते. ते योग्य त्या मार्गाने खपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुळात त्याच्या निर्मात्यांनीच करायला हवेत. पुस्तकाला ओळख लाभते ती त्यातल्या पानांवर छापल्या जाणार्‍या अर्थ आणि अभिरुचिपूर्ण, रसास्वादात्मक ऐवजामुळे. वाचकांपर्यंत तो ऐवज ज्या ज्या योग्य मार्गांनी पोहोचवणे शक्य आहे, ते ते सर्व मार्ग लेखक, प्रकाशक आणि समीक्षक ह्या सर्वांकडून अवलंबले गेले पाहिजेत. तसेच त्या ऐवजाचे निरनिराळे आविष्कार वाचकांनीही आपलेसे केले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातूनच पुस्तकाची जालीय (वेब) आवृत्ती काढण्यासाठी अधिकाधिक प्रकाशकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे म्हणावेसे वाटते. आजकाल शहरी विभागातले लोक दिवसातले किमान दहा-बारा तास आपापल्या कार्यालयांत संगणकासमोर असतात. त्यामुळे त्यांच्याकडे हातात पुस्तक घेऊन बसायला वेळ नसतो. पण म्हणून त्यांना वाचनाची भूकच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यांच्या बदलत्या राहणीमानानुसार त्यांना पुस्तकासाठी हा ई-आवृत्तीचा पर्याय उपलब्ध करून द्यावाच लागेल.

समीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ह्याला असाच अजून एक पैलू आहे. नामवंत प्रकाशन संस्थांनी त्यांच्या नवनवीन, दर्जेदार पुस्तकांची परीक्षणे, त्यांवर आधारित समीक्षात्मक लेखन ई-साहित्याच्या स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला तर संबंधित पुस्तकांच्या विक्रीवर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल.

पॉडकास्टिंग हा दुसरा पर्याय म्हणजे आपण लहान मुलांना जसे पुस्तक वाचून दाखवतो तसाच काहीसा प्रकार आहे आणि तो विशेषतः तरुणांमधे लोकप्रिय होत आहे. आधुनिक जगातील तीव्र चढाओढींचा झपाटा इतका आहे की खासकरून तरुणांना त्यांचे प्राधान्यक्रम बदलण्याविना दुसरा मार्ग नाही. त्यामुळे एखादा छापील लेख हातात घेऊन वाचत बसण्यास त्यांच्याकडे वेळच नाही. त्यापेक्षा प्रवासात, रस्त्याने चालता चालता, कानांत खुपसलेल्या इयरफोन्सच्या मदतीने त्यांच्या आय-पॉडवरचा तो लेख 'ऐकणे' त्यांना जास्त आवडत आहे. अर्थात हे शहरी भागात जास्त दिसून येते. युरोप, अमेरिकेत महाजालावरून अशा श्राव्य-फिती आपापल्या आय-पॉडवर उतरवून घेण्याचे (डाउनलोड) प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. हेच लोण अजून काही दशकांत आपल्या देशातही येऊन पोहोचेल व छापील साहित्याला आव्हान देईल एवढे नक्की. कुणी सांगावे, एखाद्या पुस्तकातल्या एखाद्या प्रकरणाची किंवा त्या पुस्तकावर आधारित एखाद्या उत्कृष्ट समीक्षेची श्राव्य-फीत ऐकून ते संपूर्ण पुस्तक कुणाला वाचावेसे वाटेलही आणि छोट्या छोट्या लेखांपर्यंत मर्यादित असलेले हे पॉडकास्टिंग बघता बघता मोठ्या पुस्तकांना आपल्या जाळ्यात ओढेलही.

लेखकांच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर ह्या घडीला ही गोष्ट मान्य करावीच लागेल, की सध्या महाजालावर जे लेखन केले जाते ते पूर्णपणे हौसेखातर केलेले असते. त्यामागे मुख्य कारण असते ते म्हणजे लेखनाची ऊर्मी. असेही अनेक आहेत की ज्यांनी एखाद्या ब्लॉगद्वारे उत्साहात लेखन सुरू केले आणि कालांतराने सोडून दिले. पण त्या सर्वांचीच आरंभशूर म्हणून सरसकट संभावना करणे धाडसाचे ठरेल. कारण, हे बहुतेक लेखक आपापले व्यवसाय-नोकर्‍या सांभाळून लेखन करतात. आधी म्हटले तसे दिवसातले अनेक तास कामाच्या ठिकाणी असल्यामुळे वेळ मिळेल त्याप्रमाणे दहा मिनिटे, पंधरा मिनिटे, तुकड्यातुकड्याने, पण लिहीत असतात. आज अजूनही अशी स्थिती आहे की मराठीत (देवनागरीत) लिखाण करायचे असेल तर काही विशिष्ट सॉफ्टवेअरे, विशिष्ट संकेतस्थळांची मदत घेणे आवश्यक ठरते. संकेतस्थळांच्या, सॉफ्टवेअरांच्या वापरावर कामाच्या ठिकाणी मर्यादा येतात. ह्या दृष्टिकोनातून छापील साहित्याच्या तुलनेत महाजालावरच्या साहित्याच्या दर्जाबद्दल काही शंका घेतल्या जात असतील तर त्या सध्यातरी काही प्रमाणात का होईना पण रास्त आहेत, असे म्हणावे लागेल. महाजालावरील लेखनात व्यावसायिकता आली तर हे चित्र बदलू शकेल. पण छापील साहित्याच्या विश्वातली प्रस्थापित नावे या क्षेत्रात उतरली तरच हे होईल.

अर्थात, सध्या महाजालावर प्रकाशित होणार्‍या कुठल्याही प्रकारच्या लिखाणाच्या मालकी हक्कांबाबतचे कायदे खूपच संदिग्ध आहेत. त्यांत सर्वसमावेशकता नाही. पण हे कायदे बदलता येतील. किंबहुना नामांकित प्रकाशन संस्थांनी त्यात रस घेण्याचे ठरवले तर ते बदलले जातील.

ई-लिखाणाच्या मोबदल्याबद्दलचा मुद्दाही उपस्थित केला जाऊ शकतो. थोडी व्यावसायिकता आणून, रीतसर, कायदेशीर मार्गाने, प्रताधिकाराचे ई-नियम नव्याने बनवून, लेखकांना महाजालावर वाव दिला गेला तर त्यातूनही मार्ग निघेल. अर्थात ही प्रक्रिया खूप किचकट असेलही, पण कधीकाळी छापील साहित्याच्या बाबतीतही हे केले गेलेच आहे. तेव्हा ह्यासाठी गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची आणि प्रामाणिक प्रयत्नांची.

एकेकाळी व्यवसाय म्हणून लेखन करण्याला भलेभलेही धजावत नसत. तसेच काहीसे चित्र आज ई-लेखनाबद्दल आहे. त्यापायी ई-साहित्याच्या एका वेगळ्याच फायद्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. आज एखादे तीस-चाळीस पानीच पण दर्जेदार लेखन घेऊन कुणी लेखक प्रकाशकाकडे गेला तर त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद दिला जाणार नाही. महाजालावर मात्र हे बंधन नक्कीच शिथील होईल. पण त्यासाठी आधी ई-लेखन ही फावल्या वेळात, भरल्या पोटी, छंद म्हणून, वातानुकूलित खोलीत बसून करायची गोष्ट आहे असा जो सर्वसाधारण समज आहे तो बदलला जाणे गरजेचे आहे.

२०१० सालच्या ह्या मनोगत दिवाळी अंकाचे स्वागत करताना आपणा सर्वांच्याच मनात ह्या बदलांच्या नांदीची नोंद घेतली गेली तर त्याहून दुसरे काय हवे?

समस्त संपादक मंडळातर्फे दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा.

paNatee