गांधारी (१)

गांधारी मरेनाला एकदाचं खडतर दणदण जीपचा प्रवास करत आदळले. हुश्श!!! करत इथल्या खोपटीच्या ओवरीत बसले. राहण्याचा इरादा पक्काच होता. इथं दादाची शेती होती. सांज होत आली तसं मला चहा प्यायची हुक्की आली. इतर ऋतूत मी चहाकडं न पाहणारी असल्या कडक गारव्यात हमखास चहाची याद यायचीच. आता चुलीवर चहा मांडायचा होता. शांतानं चूल पेटवून दिली. समोर धाड-धाड चूल पेटली. तसं मी उठले नि पातेल्यात सामग्री टाकून चहा कधी उकळते याकडं टुकूटुकू पाहत होते.

इतक्यात नाकेर बाड्डे नर-मादी जोडी माझ्याजवळ आली. नि चुलीवर मी काय मांडलं याकडं माना वर करकरून मोठ्या कौतुक नजरेनं पाहत होती. आपल्या खाण्यायोग्य काही आहे का याचा स-स-स-स ऽऽऽऽऽ आवाज करत वास घेऊ लागली. मी पण त्यांना कौत्तुकानं पाहण्यात रमले. दोघांची पावलं पातेलीत चोंच घालण्याइतपत आली. तेंव्हा त्यांना मी हुश श!! हुश श!! हात रे ऽऽऽ करत राहिले. मग सारखं त्यांना असं माझ्या मनाविरुद्ध हाकत राहावं लागलं नि या भानगडीतच चहाला उकळी आली. जरा खाली पडली. लक्षात आलं की सामानात पक्कड टाकायला विसरले. चुलीतली लाकडं बाहेर काढली नि विस्तवावर पाणी शिंपलं. धूर झाला. डोळ्यात गेला. चुलीवरलं पातेलं दिसेना झालं. मी चहाकडं पाहिलं. चूल गरम असल्यानं चहा तसं गरमच होता. खाल्णं बारीक उकळ्या येत होत्या. चहाचा मग भ्ररला नि पिस्तरीवर मनभर ताव मारला. सध्यातरी रात्रीच्या जेवणवेळेपर्यंत तरी पोटोबाची फिकर नव्हती.

मग झोळीसारख्या बाजेवर आरामाची पोझ घेऊन बसले. तर खाली हळूच मधाळ आवाजात म्याऊ- म्यॉव ऽऽऽऽ करत मांजरीचं पिल्लू लोंबणाऱ्या दोऱ्यांशी खेळात मग्न झालेलं. अल्लद पिलू मांडीवर घेऊन जोजावू लागले. जोजवत असतांनाच शेकोटी पेटवत असणाऱ्या सीतारामला विचारलं की, या पिलाचं नाव काय!

'बिल्लो' जी - सीताराम शेकोटी फुंकळीनं फुंकत म्हाणाला. तर अशी ही बिल्लो माझ्या अस्वली मायेनं गुदमरली नि मांडीवरनं लगेच बाहेर उसळी मारून पळाली.

समोरच शेकोटीच्या निखाऱ्यात शांता बरेच मोठे भुट्टे भाजत होती. त्याचे दाणे फुटल्याचा फटफट आवाज हिरवाईत घुमत राहिला. नि खमंग वासाची शरीरात लहर पसरत गेली. कधी एकदा शांता भुट्टा हातात देईल असं झालेलं. लगेच तिनं माझ्या हातात दोन भुट्टे ठेवले. नि हिरवाईत भुट्टा खाण्यात तल्लीन झाले.

जरा वेळानं शांतानं बुट्टीभर चवळीची भाजी समोर ठेवली. दोन पानांवरची करकरीत कोवळी भाजी पाहताच आवडली. हिरवाईत रमलेला माझा जीव पण पोटोबाची फिकर होतीच. जर पोटोबाची खातिरदारी केली नाही तर, हिरवाई पाहतांना पोटात कावळ्यांच्या ऑर्केस्टामुळं मी बेजार होते. शांतानं परत चूल धडधड पेटवून दिली. मी भाजी करायला घेतली. मग दोन भाकरी थापणार असा झकास बेत होता. कोवळी भाजी असल्यानं लवकरच झाली. त्याचा खमंग वास दरवळत पसार झाला. हवेत खूप गारवा असल्यानं मी पण चुलीतला जाळ भाकरी करता कमी-जास्त करत तिथेच बसले. झटपट स्वयंपाक झाला. शेकोटीजवळच आम्ही तिघं बसलो होतो. वर आकाशात खुललेल्या चांदण्या पाहत जेवायला मजा येत होती. रातकिड्याचं संगीत तर मला अगदी जीव वेडावून गेलं. हवेत गारवा चांगलाच वाढला होता. बाजूला बिल्लो येऊन आवाज करत होती. 'गबरू' नावाचा कुत्रा कसला त्रास न देता शेकोटी जवळ शेक घेत होता. असा सारा नजारा पाहत-पाहत कधी भाजी-भाकरी संपली कळलंच नाही. भांडी गोळा करून शांता घेऊन गेली. तोवर सीतारामनं आत खोपटीत अंथरुण केलं. नि उशाजवळ शेकोटी पेटवली. एकंदर खोपटी अत्यंत उबेची झालेली. मी आत पाऊल ठेवताच ऊब जाणवली. झकास जेवण झाल्यानं साहजिकच झोपेची सुरसुरी पापण्यात दाटून आली. ऐसपैस गादीखाली ऊब यायला जाडजूड उंचीच तणस अंथरलं होतं. दुलई-घोंगडी होती. माझ्या अंगावर पण गारव्यामुळं दोन स्वेटर-शाल-स्कार्फऱ्हातमोजे-पायमोजे असा जामानिमा होता. मग काय!.... पडल्या-पडल्या मे कधी गाढ-गहिऱ्या झोपेत गेले कळलंच नाही. शिवाय साथीला रातकिड्याचा संगीत नाद होताच.