गांधारी (५)

रात्री झोपण्याआधी नक्षत्राचा गालिचा ल्यालेलं आकाश पाहायची इथं सवय जडली. अमावस्या जवळ येऊ लागलेली. त्यामुळॅ काळ्या-काळ्याभोर आकाशात नक्षत्र अगदी खुललेली होती. मध्यरात्र नि पहाटेकडं रात्र सरकत होती. त्यामुळं रात्रीचा तोरा काही औरच होता. अवाढव्य आसमंताचा काळाभोर घुमट मला भारावून टाकत होता. माझी नजर त्यावरनं हटत नव्हती. सारी हिरवाईच नक्षत्रांमुळं सौंदर्यात आगळीच निथळत होती. मनात आनंदसुख उफाळात होतं. रातकिड्याची कीर्रर्र ता नि रातव्याचा चक-चक आवाज गूढता नीर्मित होती. त्या विलक्षण आवाजानं मी भारावलेली नि यात विरघळलेली. मग काय!.... अशी अफलातून नक्षत्री गारव्याची रात्र पापणीआड घेऊनच निदच्या कुशीत जायची.

सकाळी-सकाळीच सितारामनं पेरू-कमरस आणले. आता बाजूच्या दाट बांबू रांजीच्या जंगलात जायचं होतं. फळं खात-खात पाऊलवाट चालायची खुमारी काही औरच आली. दाट रांजीकडं पावलं वळवली. सुरुवातीला पाच-सहा शेतं ओलांडली. नि नंतर दाट जंगलातली पाऊलवाट सुरू झाली. काही ठिकाणी तर दोन-तीन पाऊलवाटा जात होत्या. रांजीत ऊनाचा कवडसा येण्याचा पण मार्ग नव्हता, वर पाहावं तर आकाशही दिसत नव्हतं. हिरवाईचा दाट घुमट पसरलेला त्यामुळं बर्फाच्या गुहेतनं चालत आहे, याची जाणीव तीव्र होत होती. थोड्याच वेळात अंगात भरपूर गरम कपड्यांचा भार असूनही गारवा शिरला. सतत गारवा-उन्हाचा अभाव- पालापाचोळा कुजलेला... यामुळं इथं मच्छराच्या झुंडीच्या-झुंडी होत्या. मच्छरांना माझा माग लागला म्हणत मी वाट बदलली.

मग पुढली मोकळी वाट चालू लागली. ही वाट उनाची-मोकळ्या हवेची-पाखरी दुनियेची होती. उनं मावळतीला लागली तसं परतीची पाऊलवाट धरली. दाट झाडांच्या लांब-लांब सावल्या दिसत होत्या. हिरवाईत गाढ-गडदता साचत होती. नि सौम्य-सोनसळी-तांबुसलेला प्रकाश झिरमिरत होता. वाराही मोकळा झालेला. बोचरा गारवा झकास अल्लदसा चेहऱ्यावरनं सरकत होता. या हिरवाईचा एक भाग बनून पाऊलवाट चालणं म्हणजे काय असतं, हे मी अनुभवत होते. हिरवाईतला खुलेपणा माझा जीव वेडावत होता. मध्येच उडणारे चतुर-सुई खूप दिसले. चतुर माझ्यासारख्या कासवगतीला मिळणं तर मुष्किलच होतं. पण सुई मात्र माझ्या हाती अल्लद आली. एक सेकंद बोटाच्या चिमटीत पकडून सुईला सोडून दिलं. नि उडत जाणाऱ्या सुईला पाहत राहिले. वळणा-वळणाची पाऊलवाट संपत आली. नि शेताची बांधा-बांधाची इवली वाट सुरू झाली. गबरू माझ्याच मागं-पुढं दुडदुडत होता.

क्रमशः