गांधारी (२)

पहाटे-पहाटे बाजूच्या भिंतीपल्याडनं कोंबड्याची बांग ऐकू आली. नि बांग मोजता-मोजता परत गाढ झोपले. उजाडू लागलं तसं एक-एक पाखरांचा आवाज घुमू लागला. हिरवाई बोलकी होऊ लागलेली. दयाळाची शीळ तर ऐकतच राहावी अशीच होती. त्यांचं एकमेकांना साद देणं सुरू झालं. एक-एक आवाज ऐकत आळसावत पडून होते. दाराच्या वरचा भाग फूटभर मोकळा होता. तिथनं दिसलं की फटफटत होतं. जरा वेळानं मी उठून बाहेर आले.

आवारात चुलीवर दोन गाडग्यात शांतानं पाणी ठेवलेलं. कडकडीत तापलं होतं. शरीराची हाडं गार-गार करणाऱ्या असल्या गारव्यात मला गरम पाण्यात डुबून राहण्याची इच्छा झाली तर काही नवल नव्हतंच. हात-पाय तोंड धुतलं. तसं बरं वाटू लागलं. शांतानं चहा करायला चूल पेटवून दिली. माझ्या नेहमीच्या सवयीनं मी हिरवाईत दिवसाच्या मागं उलगडत जाते. काय करायचं ठरवलेलं नसतं. मनसोक्त फिरणं हे एकच मनात पक्कं राहतं. त तसंही हिरवाईत आलं की, माझं अबोलपण अधिकाधिक गहिरं होतं. इतक्यात 'आपण गांधारी तळ्याकडं जाऊ या! ' - माझ्या मनातलं ऐकू आलं नि मी बूट घालून तयार झाले. निघायच्यावेळी शांता म्हणाली - 'ताई, जेवणाचं काय करायचं? ' - मुख्य गोष्टच मी कशी विसरले, म्हणून कपाळावर हात मारून घेतला. दाळ-भात शिजवून ठेव. भाजी नीट करून बुट्टीत धुऊन ठेव. बाकी आल्यावर करते. शांताला सूचना दिल्या नि मी पाऊलवाट धरली.

रेती रंगाच्या फुफाट्याच्या पाऊलवाटेवर चालू लागले. पंधरा मिनिटं शेताच्या बांधाबांधानं संपली. पुढंही पाऊलवाटच पण दोन्ही बाजूनं दाट झाडीतली होती. मध्येच विरळ झाडी होती. तर मध्येच शेती नि त्यातल्या झोपड्या दिसत. इथल्या प्रत्येक शेती राखणाऱ्याजवळ भले थोर जंगी कुत्रे होते. प्रत्येकजण वेगळा नि आपल्यातच मस्त रुबाबदार होतं. माझ्यापण मागं-पुढं गबरू साथ करत होता. त्यालाही शांततेची सवय होती. त्यामुळं पाऊलवाटेनं जातांना बाजूच्या कुत्र्यानी केलेली गुर्र SSगुर्रSS त्याला सहन होत नव्हती. म्हणून जरा वेळानं कंटाळून तो माघारी गेला. नि माझी काळजी मिटली. अजून पंधरा मिनिटं पाऊलवाट गेल्यावर एक लहानशी बोडी लागली. बोडीच्या एका बाजूनं अजून लहानी वाट होती. वठलेली झाडाची खोडं बोडीत अगदी भरपूर होती. या खोडावर खंड्या आपल्या भक्ष्याच्या प्रतीक्षेत होता. तर काठानं ढोकऱ्या समाधी लावून होत्या. इतर लहान पाखरं आजूबाजू भिरभिरत होती. बोडीतल्या पाण्यात कसलीही लहर येत नव्हती. हिरवाईच्या आरशात ढोकरी-दाट-झाडी पाख्ररांचं प्रतिबिंब खुलून दिसतं होतं. इथनं पाऊल समोर पडत नव्हतं. मी झाडाखाली मोकळी-ढाकळी पोझ घेऊनसारा नजारा पाहण्यात हरवून गेले. पाख्ररांच्री गाणी-टिटवी -खंड्या यांचं उडणं पाहून जीव सुखावला. नि जरावेळानं पावलांना आलेला शीण गायप झाला. व मी लहानी पाऊलवाट चालू लागले. गांधारी तळयापर्यंत पोचायला अजून बरंच अंतर जायचं होतं.

दोन्ही बाजूनं चार-तेंदू-कांचन-अमलतास-साग-कटांग बांबूच्या रांजी-ऐरोण्याच्या जाळी गच्च होत्या. हिरवाईत पाखरांचा मनभर पोटोबा भरणं सुरू होतं. त्यासोबतच जगोजागी पाखरांच्या दुनियेत 'तू-तू-मी-मी झकास सुरू होती. नि ती रंगलेली होती. हे सारं नजरेत भरून, त्यात हरवत, तळ्याच्या पारीवर कधी येऊन टेकले कळलंच नाही.

उमललेली लाल-पांढरी कमळं-कुमुदिनी समोर तळ्यात ऐसपैस पसरलेला. गिधाड पहाड-काठाचं गवत त्याचं झुबकेदार डुलणं-लहरणं यामुळं गांधारी तळं अगदी खुलून दिसत होतं. मी पाराच्या खाली अगदी पाण्याजवळ आले. झाडांची दाट सावली पाहून मी टेकले.

शक्यतो नजर पोचेल तितक्यात पाण्यांतले बाड्डे-काठाचे पाणपक्षी मी पाहत होते. त्यानंतर दुर्बीण लावली. पाहिलं तर काय!... काठाला टिटवी जोडी आरामसे चरत होती. खंड्या पण इकडून-तिकडं भरर जातांना नजरेत आला. नि त्याची निळाई डोळे दिपवून गेली. घारी आकाशात आपल्याच लयीत तरंगत होत्या. पाणकोंबड्या काठाशी जोडी-जोडीनं वाद करण्यात दंगलेल्या. काळ्या पांढऱ्या रंगाचे बाड्डे भरपूर पाण्यात डूबत मौज करत होते. पाण्याचे तुषार उडवत होते. तर तांबटही आपला आवाज हिरवाईत घुमवत होता. या साऱ्यांना टिटवीचा आवाज पुरून उरत होता. तळ्यातला पाण्याच्या लहरींनी तर मला कधीचंच वेड लावलं होतं. गिधाड पहाडाचं पाण्यातील दृष्य तर दिलखेच होतं. सारेजण तळ्याला खुलवत होते. तळ्यापलाड रस्त्याच्या झाडाखाली मोर-लांडोरी जोरात आवाज करत होती. त्यांचा सात-आठ जणांचा सकाळचा नाश्ता अद्यापही सुरू होता. हरणं नि पिलावळपण त्यांना सोबत करत होती. हिरवाईचा नजर पाहत मग्न तळ्याजवळ कितीतरी वेळ मी बसून होते. नंतर माझ्या कासवगती पावलाने मरेनावर दुपारचे तीनला पोचले.

क्रमशः