गांधारी (३)

शांता-सीताराम माझीच वाट पाहत होते. त्यांची जेवणं आटपली होती. माझ्यापुरता दाळ-भात शिजवून चुलीवर मांडला होता. ऊबदार निखाऱ्यावरचं मायेचं जेवण पाहून भूक खवळली. समोर आलेलं जेवण कधी संपलं कळलं नाही. अंघोळीकरता पाणी कडकडीत तापलेलं होतं. लगेचच अंघोळ आटपली. नि मी पेरुखाल्ची बाज पायावर ऊन येईल अशी ओढून आडवं झाले. जेवण-अंघोळ नि चालण्याची सुस्ती येऊन पापण्या लप लप करत कधी मी झोपेच्या स्वाधीन झाले कळलंच नाही. माझ्या पायावरचं ऊन गेलं तसं गार-गार जाणवून मला गाढ झोपेतनं जाग आली. मग परत माझी बाज ऊनात ओढली नि जरा वेळानं उठू म्हणता-म्हणता सायंकाळ झाली.

चहा करायला उठावं या विचारात असतांनाच चुलीपाशी खुडबूड ऐकू आली. पाहते तर काय!... बिल्लो-नाकेर नर-मादी-गबरू याशिवाय कोंबड्या नि त्यांची जंगी पिलावळ होती. त्या साऱ्यांनी सतत टाक टाक-कॉक - कॉक - चिव - चिव असे अनेक नाद ऐकवत हा सारा हिरवाईतला परिसर दणाणून टाकला. म्हणून कधी एकदा सांज जोते नि हा सारा बारदाना बाजूच्या अडगळीत घालू असं शांताला व्ह्यायचं. शांताचा पारा वाढू लागला की बिल्लोचा आवाज गायप व्हायचा. ती गबरुच्या कुशीत जायची. नि गबरुपण आपली दोस्ती जपायचा. बिच्चारी SS बिल्लो तर गारव्यानं गारठायची. शेकोटीजवळ ऊब मिळायची. पण तरीही शेकोटीजवळ बसलेल्या गबरुच्या कुशीत बसूनच ती उबेचा आनंद घ्यायची. नि गबरुपण तिचं घुसळणं खुशीनं सहन करायचा. तरीही किती सहन करणार म्हणा!... जरा वेळानं तिला दूरवर भगवायचा. बिल्लो त्यला दाद द्यायची नाही. परत त्याला छळायची. जवळ येऊ दिलं नाही तर, दूरूनच म्याँव SSS म्याँSS म्याँSS म्यॉवSSS असं दीर्घ उग्र स्वर काढून गबरुलाच दम भरायची. गबरुला सारा बारदाना घाबरायचा. पण बिल्लो मी वाघच आहे, अश्या ऐटीत वावरायची. गबरू सतत तिची जिरवत राहायचा. तरीही ती त्याला पुरून उरायची. मग गबरू तिला पंजा मारायला कमी करायचा नाही. दोघं क्षणात एकमेकानं गुरगुरणार. नि दुसऱ्याच क्षणी, काही जणू घडलंच नाही, असं बिल्लो त्याला रेलून मोकळं-ढाकळं रेलून बसायची.

आदल्या दिवशी मला खूप फिरणं झालेलं, म्हणून साडेनऊ झाले सकाळचे तरी जाग आली नाही. बाहेर ओवरीत बारदाना नि बिल्लो यांचा आवाज टीपेला पोचला होता. इतकी कशी गाढवासारखी बेहोष झोपले म्हणून उठले. सारं आटपून एक-दोन तासात येते म्हणून शांताला सांगून पाऊलवाटेला लागले. गबरू मागंमागं होताच.

समोर जिथवर नजर जाईल तिथवर प्रतापगड हिरवाईत ऐसपैस पसरलेला होता. त्याकडं मधनं नजर लावत माझी पावलं पडत होती. तर पाखरांची दुनिया आपल्या गाण्यात नि पोटोबाच्या फिकरीत मग्न झालेली. दोन्ही बाजूनं सात-आठ फूट उंच गवत वाढलेलं. त्याच्या झुबक्यांवर इवली पाखरं ऊनात मस्त झुलायची मजा करत होती. साग-पळस-चार-बेहडा-मोह अश्या झाडांची गर्दी नि गवत-पानं-फुलं-कुजलेली पानं, यांचा उग्र गंधही मनाला भारावून गेला.

अजून जरा चालल्यावर पिंढरीइतकं पाणी असणारी लहानी बोडी आली. हाडं गारठून टाकणारा गारवा असूनही बोट काढून मी पावलं बोडीत टाकली. गारेगार लहरीच्या लहरी शरीरात दौडत होत्या. तरीही मला मजा येत होती. तशीच या टोकापसनं पल्याड पाणी चुब क - चुब क वाजवत गेले. बोडीच्या काठानं दवभरल्या गवती गंधाची हिरवाईतली अनोखी नशा जाणवत होती. इवल्या पाखरांचं गवतावर हलणं-झुलणं पाहून मलाही त्यावर झुलण्याचा मोह आवरत नव्हता. पण ते फक्त माझ्या परी स्वप्नातच शक्य होतं. मी अजून पाऊलवाट पार करतच होते. गबरू पहिल्या बोडी आधीच परतला. आता दुसरी बोडी लागली. पाऊलभर पाणी होतं. यातनंही पाण्याचा नाद ऐकत नि तरंग पाहत पल्याड पोचले. परत तिसरी बोडी आली. प्रत्येक बोडी आपल्यातच मस्त पण निराळंपण जपणारी होती.

घारीच्या तरंगण्याची साथ मला थकवत नव्हती. पण तरीही झाडाखाली बसावं असा विचार होता. नि जरा त्यापैकी कोरडी जागा पाहून बसली. पानांच्या दाटीतनं ऊनाचे ऊबदार कवडसे अंगावर पडत होते. अशा अल्लद स्पर्शाची खुमारी काही औरच होती. इथल्या सकाळ-दुपार नि सांजेच्या सोनसळी झळझळ सरमिसळ ऊनाची मी दिवाणी होते. हलकी-प्रसन्न-मोकळी हवा अनुभवणं, माझ्याकरता हिरवाईचा दुर्मिळ पर्वणीचा खजिनाच होता. निळ्याभोर डोळे लप लप करायला लावणाऱ्या आकाशाखाली सारी कशी निरवता-नि:शब्दता-स्तब्धता भारून होती. फुलपाखरं तर एकटी-दुकटी नव्हतीच. त्यांचं वाऱ्यावर लहरत-झुलत मौज लुटणं सुरू होतं. समोरच उंच गवतही वाऱ्यानं झुलत आपल्याच लहरी-लहरीत रमलेलं. दयाळाची शीळ तरंगत माझ्यापर्यंत येत होती. त्यांची चार-पाच जणांची आपसात साद देण्याची तल्लीनता लागलेली. मग हिरवाईत पाखरांच्या दुनियेत बालपणच्या कविता मनात नकळत उलगडत होत्या. आपसूकच मन त्या बालपणात घरंगळत गेलं. मनाला तर कुठलाही बहाणा चालतो. तिथं ते पसार होतं नि पोचतं. नि आपल्याला दिवाणंपण बहाल करून जातं. काही आठवणी अस्तित्वाची जाण देणाऱ्या वाळक्या पानासोबत तरंगत आल्या नि तजेलदार मन उगीच अल्लद हळवं होतं गेलं.