गांधारी (४)

आता उठावं हा मनी विचार आला. नि पावलांना आपोआपच गती मिळाली. जरा बऱ्यापैकी सरसर चालत मरेनावर पोचले. लगेच अंघोळ करून जेवून घेतलं. नि पेरूखाली बाजंवर पायावर ऊन घेत पडले. सुस्ती दाटून आली होती, त्याचा आनंद अवर्णनीय!... मी यात पार विरघळून गेलेली. विरघळून टाकण्याचं सामर्थ्य हिरवाईतल्या सळसळीत - पिवळ्या धम्म कडकडीत ऊनाला निश्चित आहे. बाजंखाली बिल्लो-गबरू-नाकेर नि बाजूला पिलावळ सुस्त लोळत होती. सारी हिरवाईच सुस्तीत लोळण घेतांना जाणवली. मग बराच वेळ मी गाढ गहिऱ्या सुस्तीच्या अधीन मे ही होते.

माझा झकास आराम झाल्यानं मी उठून बसले. गरम पाणी चेहऱ्यावर शिपकारलं. चेहरा मोकळा झाला. तजेला जाणवला. पाणी तसंच चेहऱ्यावर मुद्दाम ठेवलं. नि तयार झाले. जवळच शेताच्या बांधाबांधानं निघाले. वाटेनं केळीची बाग लागली. तिथल्या ऐसपैस पानांवर भारद्वाज तोल सावरत उड्या मारण्यात बेजार नि मग्न होता. ते कौशल्य खरंच पाहण्यासारखं होतं. दयाळाची शीळ वातावरणात घुमत होतीच. शिंपी-धोबी-सुगरण-रानचिमण्या-शाहीबुलबुल-ब्राह्मणी मैना-रंगीत साळुंकी-वेडा राघू-कवडा नि निळ्याभोर आकाशी थव्यानं जाणारे बगळे आपल्या परीनं हिरवाईत संगीत ओतत होते. कधीही मनात न गुणगूण करणारी इथं पाखरांच्या संगतीत मीही गुणगुणत बांधाबांधानं पावलं टाकत होते. नाजूक शीळ मारत होते. गाण्याच्या ओळी आपसूक ओठी येत होत्या. नि रेंगाळत होत्या. तर पाखरांची संगीत मैफल हिरवाईत रंगली होती. मी त्यात हरवून गेले. अंगात आपोआपच सुखद लहरी दौडत होत्या, नि मनही तजेलदार झालेलं.

हरेक शेतात एक गवताळ इवली खोपटी!... इवलाच पण अब्बड-धब्बड मांडव!... त्यात राखणदार, त्याची बायको नि देशी भक्कम बांध्यचा एक कुत्रा, असा थाट होता. गारव्यामुळं शेकोटी पेटलेली. सात-आठ शेतं ओलांडल्यावर परत अशीच गवताळ खोपटी आली. इथं कुणीच नव्हतं. मांडवाखाली चार लाकडं रोवून त्यावर तशीच खडबडीत आडवी-उभी लाकडं नुसती ठेवली होती. त्या रानटी बाकावर मी दोन्हीकडं टांग टाकून आरामी पोझ घेऊन बसले. आता यावेळी मात्र गबरुनं साथ केली. माघारी गेला नाही. त्याची मला साथ देणं पाहून, त्याच्याबद्दल जीव गलबलून आला. नि हुंदका दाटला. पापण्या आसवांनी गच्च भरल्या. तसंच समोरच्या मावळत्या सूर्याकडं टक लावून पाहत होते. बदलत्या रंगात मीही रंगले. साऱ्या पाखरांच घरटी जाण्याच ओढाळ उडणं पाहून भारावले.

अगदी मक्याची कणसं खाण्यापेक्षा नासधूस करणारा पोपटांचा थवा नि एकटा-दुकटा पोपटही घरटी जाण्याच्या घाईत उडत होता. सारीकडं हिरवाई रंगाचं गडद-गहिरं-गूढ साम्राज्य!... गारवा-शेकोटीचा धूर-शेतातला पिकांचा विलक्षण मिश्र गंध उरली-सुरली शरीरातली मरगळ झटकत होता. इथल्या हिरवाईत मनमानेल भटकण्यास माझा जीव सतत आसुसलेलाच. समोर सूर्यदेव दिसेना झाला. तरी त्याच्या केसरी-सोनेरी-बदामी रंगांच्या छटाकडं पाहून भारावून गेले. ही कातरवेळ मला बालपणापासून ओढ लावते. हुरहूर लावते. मनावर अल्लद रेशमस्पर्श करते नि मनात खोलवर गच्च रुतून बसते. धीर-गंभीर सांज मला अधिकच गंभीर करून गेली. सांजेचा निवांतपणा मलाही आवडून जातो. तसं हिरवाईतली प्रत्येक ऋतूमधली सांज अनुभवली आहे. प्रत्येक सांजच कशी विचित्र अनामिक कातर हुरहुर लावणारी. मग ती पावसाळी सांज असो - गारव्यातली सांज - महाखट्याळ वादळी वाऱ्यातली सांज - सावळी गंभीर सांज - हसरी सुनहरी सांज अश्या साऱ्या मन पिसाळून टाकणाऱ्या!...

क्रमशः

नाकेर - रानबदकाचं एक नाव