गांधारी (६)

मरेनावर लवकर आलो याचा आनंद शांताला तर झालाच. पण बिल्लोही माझ्या पायात-पायात म्यॉव-म्यॉव गोड आवाज करत फिरत होती. नाकेर नर-मादी पण जवळ आले. त्यांना हात मी काही लावायची नाही. तुम्ही आपलं दुरुनच बरं म्हणून हातभर लांबच असायची. त्यांच्या चपट्या-दणकट-जरा पसरट-उग्र, चोचीला मी भ्यायचीच. बिल्लो आपला लाड करून घेऊ लागली. म्हणून मग गबरुही माझ्या पायाला हट्टानं रेलून लाड करून घ्यायला बसला

हिरवाईतली अगदी आतली गांधारी मला परमप्रिय आहे. इथली पहाट-सकाळ-दुपार-सांज-रात्र-मध्यरात्र निराळीच जाणवते. नि माझा जीव या निराळेपणातच गुरफटला. मग हिरवाईतला माझा इथला प्रत्येक दिवस खुलत उलगडला. माझ्या कासवगतीनं रोज एक हिरवाईची बाजू फिरत गेली. आपल्यातच मस्त राहयची इथली दिवस कसे सरसर संपले ह्याचं ध्यानच राहिलं नाही. दादाकडून कालच निरोप पोचला की, 'जीप दुपारी येईल तयार राहा, ' तेव्हा कुठं इथले दिवस सरल्याची जाणीव झाली. हिरवाईत हरवणं, स्वतःला त्यात विरघळून विसरणं म्हणजे काय याची अधिकाधिक गडद जाणीव झाली. नि मन गलबललं.

बिल्लो-गबरू-नाकेर-पिल्लवळीची परत कधी-केंव्हा स्नेहभेट होईल ठाऊक नव्हतं. म्हणून गांधारी मरेनाचा हिरवाई नजारा पाहत पेरुखाली झोळीच्या बाजेत बसले होते. इतक्यात जीप आली. नि तीन-तासांनी परत सिमेंटच्या जंगलात आदळले.

कमळपानाप्रमाणं हिरवाईत स्वतःला विसरून आता पुढल्या क्षणात अलिप्त राहायचं होतं. परत असंच अचानक कधीतरी हिरवाईची मायेची उबदार अल्लदसा स्पर्श असलेली दुलई पांघरून घ्यायला येणारचं!..... सारे क्षण कसे अल्लद पापणीआड जपलेले अफलातूनच!!!... अफलातून!!!... अफलातून!!!... ह एकच नाद माझात घूमत राहिला. नि माझी मी कुठं होते उरले!!!....

समाप्त