...किती दिसांनी !
माझ्यामधला पूर्वीचा मी
मला गवसलो...किती दिसांनी !
दोघेही मग घन झालो अन्
मुक्त बरसलो...किती दिसांनी !
कोंदटलेल्या या जगण्याने
पंख पसरले...किती दिसांनी !
बोटांवरती पाकोळ्यांचे
रंग उतरले...किती दिसांनी !
बालपणीची कागदहोडी
जळी सोडली...किती दिसांनी !
...आणि हरवल्यां आयुष्याशी
नाळ जोडली...किती दिसांनी !
झा़ड शोधले, पार शोधला...
समीप बसलो...किती दिसांनी !
गोष्टी वदलो, गप्पा केल्या...
रडलो-हसलो किती दिसांनी !
एवढेच मी केले आणिक
प्राण बहरले...किती दिसांनी !
बरे दुःखही आज नेमके
मला विसरले...किती दिसांनी !!
गतकाळाची गंधकुपी मी
आज फोडली...किती दिसांनी !
ठेवणीतल्या आठवणींची
घडी मोडली...किती दिसांनी !
* * *
...उशीर झाला या साऱयाला
हेही कळले...किती दिसांनी !
लवकर का हे सुचले नाही...?
मन हळहळले...किती दिसांनी !!
* * *
( रचनाकाल ६ नोव्हेंबर २००४ )
- प्रदीप कुलकर्णी