झोपेत चुळबुळणाऱ्या बाळाच्या अंगावरून हळूहळू दुपटे सरकत जावे तसे पाऊसभरले ढग हळूहळू सरकत नाहीसे झाले होते. पाणी ओतप्रोत पिऊन घेतलेली धरती तृप्तीचे उष्ण आणि दमट हुंकार देत होती. तीनचार महिने आपण कामात जरा हयगयच केली, कधी आलो तर कधी नाही, असा ओशाळवाणा अपराधी भाव मनात घेऊन सूर्य आता दुप्पट तडफेने कामाला लागला होता. दुपारचे ऊन सणाणून तापे.
मात्र रात्री उशीरा आणि पहाटे लौकर चांगलाच गारवा जाणवे. आत्ता सूर्याची टायली चालू देत, पण पुढच्या निकराच्या हल्ल्याला तयार रहा असा थंडी जणू इशाराच देत होती.
सगळीकडे दिवाळीची तयारी हळूहळू वेग घेऊ लागली होती.
दुपारची वेळ होती. रस्त्यावरचे डांबरही चकाकत होते. त्यात सुधाताईंच्या स्वस्तातल्या प्लास्टिकच्या चपला चिकटून रुतत होत्या. त्यांच्या हातातल्या पिशवीत निगुतीने ठेवलेली दोन दोन किलो चकल्यांची पाच पाकिटे होती. सुधाताईंच्या चकल्या चोखंदळ घरांमध्ये चांगलीच प्रतिष्ठा पावून होत्या.
अश्या चकल्या आपल्या मुलीला करता आल्या तर पाककलानिपुण हा शब्दही उच्चारण्याची गरज पडणार नाही, उपवर मुलांची रांग आवरायला पोलिस बोलावावे लागतील अशा स्वप्नांत अनेक माता दंग होत होत्या. त्यांनी सुधाताईंच्या चकल्या आपल्या कन्येच्या हातच्या असे म्हणून खपवण्याचे प्रयत्नही केले होते. पण जिचा चेहरा बघताच हिने हातात चहाचे गाळणेदेखील धरले नसेल याची खात्री पटे तिच्या हातून अशा चकल्या घडतील हे कुणा उपवर मुलाच्या पचनी पडत नसे. ताटलीतल्या चकल्या तेवढ्या संपवून सगळे चालू पडत, "पत्रिका जुळत नाही" हे नंतर कळवण्यासाठी.
अश्या चकल्या आपल्या बायकोला करता आल्या तर बाकी सगळे माफ, रोजचे जेवणदेखील बाहेरून डबा लावून मागवू, पण वाटेल तेव्हा तोंडात टाकायला अशा हलव्यासारख्या काटेरलेल्या, आतून नेमकी सळी पडलेल्या आणि लोण्याची गरज न ठेवता आपोआप तोंडात विरघळणाऱ्या चकल्या मिळाव्यात, बास... अशा स्वप्नात अनेक नवरे दंग होत होते. काहीजणांची मजल तर 'बायकोला दर महिन्याला एक नवा दागिना आणि वर्षाकाठी परदेशी सहल' येथवर गेली होती. पण त्यांच्या बायकांना काही असल्या चकल्या जमत नव्हत्या, आणि त्यांचे पैसे वाचत होते. अगदी 'तश्शीच' चकली करण्याच्या बायकोच्या प्रयोगांनी बरेच जणांचे दंतवैद्याकडे जाणे मात्र वाढले होते.
अस्मिता अपार्टमेंटमधल्या दंडवत्यांकडे चकल्या पोहोचवायला सुधाताई घाणेकर भर उन्हाच्या दोनप्रहरी वाट तुडवत होत्या. मध्येच एका विजेच्या मोठ्या खांबाच्या आडोशाला उभे राहून त्यांनी पदराने कपाळावर डवरलेला घाम टिपून घेतला. त्यांचा गौरवर्णी चेहरा चांगलाच लाल झाला होता. किंचितशा लागलेल्या धापेने आटोपसूत नाक आणि जिवणी थरथरत होती. लख्ख घारे, नव्हे हिरवेच, असलेले डोळे आसमंत सजगतेने टिपत होते. तोंडाने जोरात श्वास सोडत त्यांनी हुश्श केले आणि परत वाट तुडवायला सुरुवात केली.
==========
चालू असलेल्या अव्हनमध्ये आपण आपले शरीर घुसवले आहे काय असा प्रश्न अनाहिताला गेले काही दिवस दुपारी पडत असे. अर्थात हा प्रश्नही तिच्या विस्कटलेल्या मनाच्या आरशामध्ये तुकड्यातुकड्यांनीच उमटे.
या तुकड्यांचीही एक गंमतच होती. ते कधी कसे जुळत, कधी कसे. काय म्हणतात ते, हां, कलायडोस्कोप, त्यासारखे.
मग तिला कधी स्टेशनवरच्या त्या पाकिटमारामध्ये हजार वॉटसच्या दिव्यांनी घामाघूम होऊन झाण्ण झाण्ण गिटारच्या साथीमध्ये बेधुंदपणे Every breath you take, And every move you make गाणाऱ्या लुईची प्रतिमा उमटे. तो पाकीटमार आपल्या शरीराशी काय हिडीस चाळे करतो आहे हे अजिबात न जाणवण्याइतकी ती प्रतिमा कोरीव असे.
फलाटावर चाललेले ते चाळे असह्य होऊन पोलिसाने पाठीत घातलेल्या लाठीने (तिच्या पाठीत; पोलिसाला बघून अर्थातच पाकिटमार पळून गेलेला असे) ती प्रतिमा कड्यातुकड्यांत विखरून जाई. अचानक त्या पाठीत लाठी घालणाऱ्या पोलिसाच्या जागी तिला तिचे वडील, कर्नल कपूर दिसत. "Daddy, Anahita is sorry. Anahita loves you daddy. Anahita is a good girl daddy, even our teacher said so today. Daddy, please please don't hit your Anahita... it hurts daddy, it hurts...". शेजारून कर्नल मणीअंकल येतील आणि डॅडींना "Hey, Deepak, what are you doing man, are you insane?" असे बोलून आपल्याला सोडवतील या आशेने भोकाड पसरून ती त्या पोलिस हवालदाराला घुसमटवणारी मिठी मारे. ही एकटी मुलगी ठेवून लहानपणीच्या याराबरोबर पळून गेलेल्या बायकोच्या जळत्या आठवणीने ओल्ड मंक एखाद्या पंपाप्रमाणे दर रात्री हापसणाऱ्या कर्नल कपूरांना मुलीत त्या बायकोचीच प्रतिमा दिसे. अजूनच चिडून ते सपासप छडी चालवीत. अनाहिताने कळवळून मारलेल्या मिठीने कासावीस होऊन हवालदार "हिच्या मायला हिच्या" करीत कसाबसा स्वतःला सोडवून पळ काढे.
दुपारच्या झळा अनाहिताला तिच्या विरलेल्या कपड्यांतून जागोजागी चटकत होत्या. कुठे जायलाच हवे का हा कायमचा प्रश्न सतावत होता. समोरच्या पानाच्या दुकानामागे काही झुडुपांची गर्दी दिसली.
अनाहिताला स्वतःला काही देहधर्म उरकायचा आहे याची जाणीव झाली. हा आडोसा बरा म्हणून ती त्या दिशेला चालू लागली.
==========
पानाच्या टपरीवर राजू आळेकर उभा होता. नुकतीच त्याने नेहमीच्या 'छोटी गोल्ड्फ्लेक' ऐवजी 'विल्स नेव्हीकट' ला सुरुवात केली होती. 'ऍस्ट्रा न्यूज'मध्ये प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून लागल्यावर त्याचा दर्जा उंचावला होता. आणि तिथे असिस्टंट प्रोड्यूसर असलेल्या शाय वैद्यनाथनला पाहून तर तो भिरभिरलाच होता. ('शाय' हे 'शैला'चे रूपांतर होते). आपले सुरुवातीचे (तो मुखदुर्बळ होता) आणि शेवटचे (तिचे काळेभोर डोळे आणि किंचित घोगरा आवाज) स्टेशन हेच आहे हे त्याने स्वतःला पुनःपुन्हा बजावले होते. ती हाकही किती जीवघेणी मारे! "हेय राज..." शेवटचा उकार खाण्यासाठीच असतो अशी तिची ठाम समजूत कुणी करून दिली होती देव जाणे, पण ती मदभरी हाक ऐकल्यावर राजू समुद्रातही उडी घालायला तयार असे (त्याला पोहता येत नव्हते).
त्याच्या सुदैवाने इथून दीडशे किलोमीटरपर्यंत समुद्र नव्हता.
==========
खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने भुरभुरणाऱ्या बटा सावरून शैलाने इकडेतिकडे पाहिले. सगळेजण कामात गुंग होते, किंवा तसे दाखवत होते. तिला चेन्नईच्या टी-नगरमधला 'वैद्यनाथन व्हिला' आठवला.
सुप्रीम कोर्टातही मुंडू गुंडाळून वर शर्ट-कोट-टाय चढवून जाणाऱ्या बॅरिस्टर वैद्यनाथनना आपली एकुलती मुलगी असे का करते आहे हेच उमजत नव्हते. सगळ्या गोतावळ्याने आग्रह केला (पत्नी सारम्मा तर आघाडीवर) म्हणून तिला सेंट मेरीज मध्ये घातले. पण तिथे शिकून ही असले गुण उधळेल हे त्यांच्या कल्पनेबाहेरचे होते. थेट 'लिंकन्स इन'मधून बॅरिस्टर झालेले वैद्यनाथन मांस सोडाच, अंड्याचे दर्शनही घेत नसत. आणि ही कारटी म्हणे त्या गोमांस भक्षणाऱ्या... व्यंकटरमणा...हुडहुडी भरावे तसे वैद्यनाथन शिरशिरत. सगळे सगळे हाताबाहेर गेल्याची जाणीव झाली तसा त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. तरीही कार्टी ऐकेना म्हटल्यावर आपल्या सगळ्या इस्टेटीतून तिला बेदखल करणे एवढेच त्यांच्या हाती होते.
अम्मा किती रडली-भेकली. पण नाही. पप्पा (त्यांना अशी हाक मारली तर त्यांच्या मस्तकात तिडीकच उठे) ऐकायलाच तयार नव्हते. अखेर आपला हट्ट म्हणून मम्मीने (सारम्माना हे संबोधन ऐकून गुदगुल्या होत; मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून घेतलेली आपली बी ए (सायकॉलजी) ही पदवी आपल्या अरसिक कोरड्या नवऱ्याने वाया वाया घालवली असे त्यांचे घट्ट मत होते) तिच्या माहेरून मिळालेले थोडे सोने विकून शैलाला मुंबईला जाण्यासाठी लाखभर रुपये दिले.
मुंबईत 'स्ट्रगल' करायला आलेल्यांची भरताड होतीच. त्यात शैलाने आपलेही अस्तित्व मिसळले. त्यातल्यात्यात सुदैवाची गोष्ट म्हणजे शैलाला फिल्म लायनीत जायचे नव्हते. त्यामुळे लोखंडवालाच्या परिसरात राहून कवडीमोलाच्या लोकांच्या कोटीमोलाच्या गोष्टी आशाळभूतपणे ऐकणे तिच्या नशिबातून टळले होते.
"मास कम्युनिकेशनची डिग्री नाही" या लंगडेपणावर मात करण्यासाठी तिने आपला इगो गुंडाळून ऍस्ट्रा न्यूज मध्ये प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून पुण्याला मिळालेली नोकरी दोन्ही हातांनी घट्ट धरली. व्हाईट बॅलन्स आठवणीने करणे, क्यू शीट शक्य तेवढ्या बारकाईने भरणे, रेकॉर्ड झालेल्या कॅसेटची लाल गुंडी काढून ठेवणे अशी कामे चोख पार पाडताना हळूहळू ती चीफच्या लक्षात येऊ लागली होती.
माथ्यावर केस चांगलेच विरळ झालेला, घाऱ्या डोळ्यांचा गोरापान चीफ कायम घाईत असे. पण वेळेच्या कमतरतेवर त्याने आपल्या संवेदना तल्लख करून मात केली होती. एकदा त्याने फाटकन विचारले होते, "अजून किती काळ अशी हमाली करणारेस? करीअर करायची असेल तर प्रोड्यूसर, ऍंकर असे काहीतरी हो, नाहीतर चेन्नईला परत जाऊन कुठल्यातरी बालसुब्रमण्यमबरोबर संसार मांडून टाक. मुलं व्हायचे हेच योग्य वय आहे".
चारचौघात कुणी अंगावरचे वस्त्र फेडावे तसे तिला झाले. चेन्नईला परत जायचे म्हणून ती विचारांची जुळवाजुळव करायलाही लागली. पण इमानी कुत्र्याप्रमाणे तिची पाठराखण करू पहाणारा राजू तिच्या मदतीला आला होता. त्याच्या भीषण इंग्रजीत त्याने तिला पटवले की 'जग हे असेच असते, आणि जगाला आपल्यासारखे करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपण जगासारखे होणे जास्त स्वस्त पडते'.
शैलाने परतीचे विचार माळ्यावर टाकून दिले. आपले 'शाय' असे बारसे स्वतःच करून घेतले आणि पुढे घुसून काम मिळवण्याची, धाडकन कुणाच्याही तोंडासमोर माईकचे बोंडूक उगारून प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्यायला सुरुवात केली.
==========
एकावन्न पायऱ्या चढून सुधाताई तिसऱ्या मजल्यावरच्या दंडवत्यांच्या दारात पोचल्या. दारावरची घंटा वाजवण्याअगोदर त्यांनी दोन खोल श्वास घेतले. जरा थोडे श्रम झाले की हल्ली जरा छातीत धडधडल्यासारखे वाटू लागले होते. चपळगांवकर डॉक्टरांकडे एकदा जायला हवे असे त्यांनी मनाशीच घोकले आणि दारावरची घंटा वाजवली.
आतमध्ये वत्सलाबाई टीव्हीवरची सीरीयल बघत बसल्या होत्या. आज गांधीजयंतीची सुटी मिळाल्याने घरी असलेली सून तिच्या खोलीत संगणक उघडून काहीतरी काम करत बसली होती. वत्सलाबाईंना संगणक आणि अग्निबाण हे दोन्हीही आपल्या डोक्यावरून जातात एवढेच माहीत होते. पण मधूनच खोलीत डोकावल्यावर सून घाईघाईने त्या यंत्रात तोंड घालून काहीतरी बोलते असा त्यांना संशय होता. मकरंदचा स्वतःचाच व्यवसाय असल्याने त्याला सुटी नव्हती. बिचाऱ्याला अगदी ताटाखालचे मांजर करून ठेवले आहे या बयेने. त्या आयटीत की बायटीत नोकरी करत म्हणजे काय आभाळाला हात लागले काय?
समोर सीरीयलमध्येही कारस्थानी सून - मवाळ मुलगा - भरडली जाणारी सासू असलेच काहीतरी चालले होते. त्यामुळे वत्सलाबाई मन लावून टिपे गाळत होत्या.
घंटा वाजल्यावर उठायचे त्यांच्या अगदी जिवावर आले. त्यांचे देहमान तसे आटोपसूत कधीच नव्हते. आणि हा गुडघ्यांचा त्रास सुरू झाल्यापासून बाहेर फिरणे नाहीसेच झाले होते. त्यामुळे मैद्याच्या पोत्यासारख्या त्या चहूअंगांनी ओघळल्या होत्या. पटकन उठणे बसणे त्यांना जमतच नसे.
आपल्या सुनेचा त्यांना परत कडाडून राग आला. जरा एक दिवस घरी आहे तर उठून सासूला काही मदत करेल? छे! नाव नको!
"रामकृष्ण गोविंद हरी वासुदेवा परमेश्वरा विठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा" असा सगळ्या देवांचा घाऊक जप करीत त्या उठल्या. दारात सुधाताई उभ्या होत्या.
वत्सलाबाईंना कधीकधी खूपच गोंधळल्यासारखे होत असे हल्ली. सुधाताईंना बघून त्यांना असेच गडबडल्यासारखे झाले. "अं हो, तुम्ही नाही का, या ना, नाही नाही, या या" असे असंबद्ध बडबडत त्यांनी आधी दार लावूनच घेतले. मग चूक लक्षात येऊन ते उघडले. "या या" करीत त्यांना आत आणले आणि वत्सलाबाईंच्या लक्षात आले की सगळ्या खुर्च्यांवर वाळलेले कपडे इस्त्रीवाल्याला देण्यासाठी काढून ठेवले आहेत. गडबडून त्यांनी कपडे बाजूला करण्याऐवजी हातातला टीव्हीचा रिमोट त्या कपड्यांवर टाकला.
"ही चकल्यांची पाकिटे. जपून ठेवा, नाहीतर लगेच मोडतील" सुधाताई करकरीत आवाजात म्हणाल्या.
"हो हो ते तर आहेच ना, बसा बसा" वत्सलाबाई सावरत होत्या त्या परत गोंधळल्या. सुधाताई पिशवी पुढे धरून उभ्या होत्या. अखेर ती आपण घ्यायला हवी हे वत्सलाबाईंच्या ध्यानात आले आणि त्या पिशवी घेऊन आत गेल्या आणि ती ठेवून लगेच बाहेर परत आल्या.
"बाकी ठीक ना सगळं?" संवाद पुढे चालू ठेवायला त्यांनी एक मापटे तेल टाकले.
"पिशवी परत देताय ना? चकल्यांची पाकिटे करून देईन अशी बोली होती. त्याप्रमाणे पाकिटे केली आहेत. पिशवी माझी आहे, ती परत द्या".
परत घाईघाईत वत्सलाबाई आत गेल्या. आता चकल्या काढून पिशवी परत द्यायला हवी हे सगळे त्यांच्या ध्यानात आले. पटापट आणि फार निर्णय घ्यायचे नसले तर त्यांचे डोके व्यवस्थित चाले. चकल्यांची पाकिटे निगुतीने काढून ठेवून त्या रिकामी पिशवी हलवत बाहेर आल्या.
सुधाताई उभ्याच होत्या.
"बसा ना. चहा करू?"
"नको. पैसे द्या, मग लगेच निघते मी. घरी जाऊन दुसरी ऑर्डर करायला घ्यायची आहे"
वत्सलाबाई परत गोंधळल्या. त्यांचे पती रावसाहेब दंडवते सरकारी नोकरीतून अखेर तहसीलदार म्हणून निवृत्त झाले होते. वत्सलाबाईंना हिशेब जमत नाही हे लक्षात आल्यावर रावसाहेब पैश्याचे सगळे खाते आपल्याकडे ठेवून बसले ते आतापर्यंत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला वत्सलाबाईंना त्यांना किंवा मुलाला साकडे घालावे लागे. आत्ता मुलगा बाहेर गेला होता, आणि रावसाहेब झोपले होते. सुनेकडे मागणे त्यांना अतीव अपमानास्पद वाटत होते.
"अं पैसे जरा... नंतर देऊ का? हे की नाही, आत जरा... झोपले आहेत. मग उद्यापरवा देते ना..."
"नाही. पैसे माल दिल्यावर ताबडतोब अशीच पद्धत आहे माझी. माल पोचवला, पैसे घेतले, संबंध संपला" आता सुधाताईंचा आवाज जास्तच धारदार झाला होता. कैऱ्या कापून विळी होते तसा.
'हां, अं, नाही, हो' करीत वत्सलाबाईंनी आत जाऊन रावसाहेबांना उठवले, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सुधाताईंना दिले.
इतका वेळ उभ्याच असलेल्या सुधाताई वळल्या आणि चालू लागल्या.
==========
समोरून येणारी विटक्या चिंध्यांतली तरुणी राजूला ओळखीची वाटली. तसा त्याचा तरुणींचा माहितीसाठा बऱ्यापैकी भक्कम होता. मुखदुर्बळ असलेला माणूस स्वप्ने पाहू शकत नाही असे थोडेच आहे?
तिच्या चालीत काहीतरी अजूनही खिळवून ठेवणारे होते. बाजूने बघताना तिचा चेहरा थोडा कोरीव वाटत होता..... अरे! ही तर ऍना! अनाहिता!! I wanna be with you always या आल्बमने प्रसिद्धीला आलेली ऎना. राजूने तिचे कार्यक्रम प्रत्यक्ष कधी पाहिले नव्हते (परवडणे शक्य नव्हते), पण टीव्हीवर दाखवली गेलेली तिची सगळी गाणी, अंगात आलेल्या बाईसारखे घुमत नाचण्याची तिची तऱ्हा, मध्येच नाचणे थांबवून स्टेजवर डौलाने विहरण्यासारखे चालण्याची पद्धत... बऱ्याच रात्रींकरता ती राजूची स्वप्नसुंदरी होती.
पण ही कशी असेल ती? मग राजूला हळू हळू आठवू लागले.... प्रसिद्धीच्या शिखरावर पोचल्यावर झालेली नेहमीची चित्तरकथा... ड्र्ग्ज, एकापाठोपाठ एक जुळवलेले आणि तोडलेले संबंध, हळू हळू लोकांनी फिरवलेली पाठ... गेल्या एक-दीड वर्षांतल्याच तर या गोष्टी.
पण आपली एकेकाळची स्वप्नसुंदरी प्रत्यक्ष दिसली याच्यापेक्षाही, आपल्या सध्याच्या स्वप्नसुंदरीला, शायला, हा स्कूप देऊन स्वप्न सत्यात उतरवणे आता सहजशक्य आहे याचा त्याला जिवापाड आनंद झाला.
पळतच त्याने आपले ऒफिस गाठले. शाय सुदैवाने काहीतरी स्क्रिप्ट चाळत नुसतीच बसली होती. तिचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. पण राजूने पटापट हालचाली करत ऒफिसच्या रेफरन्स लायब्ररीतून अनाहिताबद्दलचे जुने लेख, आणि भरपूरसे फोटो खोदून काढले. शायची खात्री पटवून पंधरा मिनिटांत तो पळत टपरीकडे आला.
==========
देहधर्म उरकण्यासाठी झुडूप शोधत गेलेली अनाहिता अजून फिरतच होती. एक जागा सापडली, पण तिथे एक दारुडा अर्धा गटारात आणि अर्धा बाहेर असा लोळत घोरत होता. दुसऱ्या कोपऱ्यातल्या डुकरांना हाकलण्यासाठी ती दगड किंवा वीट शोधत होती. तिच्याकडे पाहून राजूने स्वत:ची परतवार खात्री करून घेतली आणि शाय येण्याची वाट पहात तो रस्त्यावर उभा राहिला.
==========
शायने एक शूटिंग टीम मागितल्यावर तिचा मॅनेजर हेटाळणीने हसला. ही मास कम्युनिकेशनचा म माहीत नसलेली मद्रासी पोरगी काय समजते स्वत:ला? घट्ट टी-शर्ट आणि जीन्स घातल्या की सगळे येते? मॅनेजर सुदीप आगाशेने पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशनची पदविका घेतल्याने त्याला अर्थातच सगळे येत होते.
स्कूप म्हणे. तो राजू एक बावळट. लाळ गाळत हिंडत असतो हिच्या मागे. हिला पटवायला तो काहीही थापा मारेल. पण ती त्याला शेवटी मामाच करून जाणार.
पण शायने चक्क थेट चीफलाच फोन लावला. नेहमीच्या घाईत असलेल्या चीफने फोन सुदीपला द्यायला लावला, आणि If you think she is gonna fall flat on her face, let her fall flat on her face. We will take it up from there असा सणसणीत हुकूम सोडला.
नाइलाजाने सुदीपने एक टीम लगेच मोबिलाईज केली.
==========
अनाहिताला अखेर जागा सापडली. परत ती झुडुपांआडून बाहेर आली तेव्हा शाय हातात माईक घेऊन तिच्यासमोर भसकन अवतरली. Are you Anahita? Ana the singer?
अनाहिताला कलायडोस्कोपचे तुकडे पटापट आपापल्या जागी जात असल्यासारखे वाटले. हे नाव फारच ओळखीचे वाटत होते. नुसते ओळखीचे नव्हे, कुठेतरी हळुवार मोरपीस फिरल्यासारखे वाटत होते. ती खुदूखुदू हसत सुटली.
शाय चमकली. त्या हसण्याने अनाहिताच्या दीनवाण्या लक्तरांमधूनही मूळची अनाहिता अचानक चमकून उठली. हा स्कूप आपल्याला ऍस्ट्रा न्यूजमध्येच नव्हे, तर इंडस्ट्रीत नाव मिळवून देईल...आता हिला कव्हर करत तास दोन तास फूटेज मिळवावे. ही अशी भणंगावस्थेत हिंडण्याचे शॉटस एकदम 'हटके' होतील. मग काहीही करून हिला आपल्याबरोबर स्टुडिओत घेऊन जावे. Yess, Shy, you have made it! तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कॅमेरामन भौमिकला तिने पटापट शॉटस समजावून सांगितले.
समोर पानाची टपरी बघून अनाहिताला तिने किती दिवसात अखंड सिगरेट ओढली नाही याची चरचरून आठवण झाली. ही आपल्याला काहीतरी विचारणारी मुलगी एक सिगारेट देईल का? विचारून बघावे म्हणून ती पुढे झाली.
शाय आजूबाजूला शोधक नजरेने पहात होती. आता रिऍक्शन शॉटसाठी कोण कोण पकडावे? राजू तर एक हक्काचा होताच, फक्त त्याची रिऍक्शन हिंदीत घ्यावी लागणार होती. तशा सगळ्या रिऍक्शन हिंदीतच घ्याव्या लागणार बहुतेक. या भणंग भागात इंग्लिश येणारे कोण सापडणार?
एवढ्यात तिला समोरून सुधाताई चालत येताना दिसल्या. येस्स. या घाटी आंटीची रिऍक्शन घ्यावी. ती तर शिव्या देणार हे नक्कीच होते. असल्या बेताल, बेभान पोरींना चपलेने बडवायला हवे असे काहीतरी बोलणार ही. मागे एकदा सलमान खान प्रकरणात सुदीपने अशाच एका आंटीची रिऍक्शन मिळवली होती. "मेल्याला केरसुणीने बडवायला हवा" ही ती रिऍक्शन जबरदस्त हिट झाली होती. दोन दिवस रिपीट करावी लागली होती. आताही असेच काहीतरी मिळेल तर...
सिगरेट मागायला आलेल्या अनाहिताला ढकलून शाय पुढे झाली.
==========
शायला सिगरेट विचारायला पुढे झालेली अनाहिता अचानक ढकलून दिल्याने गोंधळली. परत तिला राजूच्या जागी कर्नल कपूर दिसू लागले. भेदरून ती अंग चोरून आपल्या कोषात जाऊ लागली.
शाय जरी सुधाताईंच्या दिशेने जात असली आणि भौमिकला तिने खूण करून आपल्यामागे यायला सांगितले असले, तरी भौमिक हा अस्सल आणि स्वयंभू कॆमेरामन होता. अनाहिता हळूहळू अंग चोरून रडायला सुरुवात करणार हे जाणवल्याबरोबर त्याने कॆमेरा तिच्यावर रोखला आणी रोल करायला सुरुवात केली.
==========
आपल्याच तंद्रीत चाललेल्या सुधाताई माईकची काळा स्पंज गुंडाळलेली दांडी समोर आल्यावर दचकल्या. बावचळून त्यांनी आजूबाजूला बघितले. शाय पुढे झाली, "आंटी, ही जो लडकी आहे ती रॉक स्टार थी. ड्रग्जने तिची वाट लगा दी. आपको काय वाटते?"
सुधाताईंची नजर भेदरून रडायच्या तयारीत असलेल्या अनाहितावर गेली. तिच्यावर कॆमेरा रोखून असलेला तो पोनीटेल बांधलेला बुटका कॆमेरामन. आणि ही आटलेल्या कपड्यातील नटवी.
क्षणभर काळ थबकला. काही चक्रे उलटसुलट फिरली. अनाहिताच्या जागी त्यांना भेदरून रडणारी प्राजक्ता दिसू लागली. गणिताच्या मास्तरांनी शाळा सुटल्यावर थांबवून घेतले होते म्हणून ती घरी उशीरा परत आली होती. सुधाताईंनी तिला रात्रभर घराच्या पायरीवर उभे केले होते. नातेवाईक कोणी नव्हतेच. म्हणजे, सुधाताईंशी वाकडे घेऊन प्राजक्ताला आश्रय देतील असे हिंमतवान कोणी नव्हते. शाळेच्याच ठिगळ लावलेल्या स्कर्ट-पोलक्यातली ती भेदरलेली नववीतली मुलगी, गणिताच्या मास्तरांनी आपल्या अंगावर त्यांचे केसाळ हात आणि मिशाळ ओठ फिरवले होते हे सांगावे का असा विचार करत घरी आली आणि रात्रभर पायरीवर मांजरासारखी मुरून बसली. डोळ्यातले पाणी परतवत कठोर नजरेने किलकिल्या खिडकीतून तिच्याकडे पहात सुधाताईही रात्रभर जाग्या होत्या. दारुड्या नवऱ्याला हाकलून घालण्याचे धारिष्ट्य दाखवून जगताना कुणाचे एक बोटही आपल्यावर रोखले जाणार नाही याची त्यांनी कसोशीने काळजी घेतली होती. आणि बाईच्या वाट्याला कायकाय भोग असतात, हे काचेचे भांडे घेऊन निसरड्या जमिनीवरून चालताना कितीजण धक्का द्यायला तत्पर असतात हे प्राजक्ताला कळायलाच हवे होते. त्यात दयामाया नव्हती. त्यांनी दाखवली असती तर जगाने दाखवली नसती.
"बोलिये ना आंटी" शायने माईकचे बोंडूक अजून पुढे खुपसले.
सुधाताईंच्या मस्तकात तिडीक गेली. पुढे होऊन त्यांनी खाडकन शायच्या मुस्काटीत भडकावली. शाय तिरमिरून खालीच बसली आणि रडायला लागली.
भौमिकचा कॆमेरा थरथरणाया अनाहिताचे शॉटस टिपतच होता. त्यात कसला आवाज आला म्हणून त्याने वळून बघितले तर शाय खाली रडत बसलेली. "वो आंटीने थोबाड फोड्या उसका" रेकॊर्डर गळ्यात अडकवलेल्या भरतने हळूच सांगितले. अरेरे! तो शॉट मिळाला असता तर.... भौमिक चुकचुकला.
==========
काय करावे हे राजूला उमगेना. आपली माजी स्वप्नसुंदरी लक्तरांत उभी आहे आणि आजी स्वप्नसुंदरी थोबाड फुटल्याने हमसून हमसून रडत आहे अशा परिस्थितीत काय करायचे असते हे त्याला कुणीच सांगितले नव्हते. तरीही पुढे होऊन त्याने शायच्या पाठीवर हात फिरवण्याचा विचार केला. पण त्याची सावली पडताच शायने चेहरा वर उंचावला आणि हुंदकत I don't want to do it... this is it.... I am going back to Chennai... Papa was right.... this is not a field for humans.... it is a field for vultures..... vultures who are cannibals..... I won't.... I won't अशी फैर झाडली. आणि हुंदक्यांचे आवर्तन जोमाने सुरू ठेवले.
आपली शेवटची वाटलेली स्वप्नसुंदरी शेवटची नाही, दुसरी बघायला लागेल एवढेच राजूला कळले.
==========
सुधाताईंना काय वाटले कोण जाणे. त्या तशाच पुढे झाल्या आणि अनाहिताचा हात धरून चालायला लागल्या.
आपल्या दोन खोल्यांच्या घरात तिला नेऊन त्यांनी आतल्या अर्ध्या मोरीत आधी तिला खसखसून धुतले. तिच्या अंगावरच्या ओरबाडल्याच्या, सुया टोचल्याच्या, चटके दिल्याच्या खुणा पाहून त्या हळहळल्या. त्यांनी निगुतीने त्यावर तेलहळद घातली. मग कित्येक वर्षांनंतर माळ्यावर चढून त्यांनी ट्रंक काढली. प्राजक्तासाठी शिवलेला शेवटचा जोड नवीनचा नवीनच होता. त्याची घडी मोडली.
अनाहिताला झकास बसला तो.
मग त्यांनी गुरगुट्या भात केला, वरती तुपाची धार सोडली, मेतकूट कालवले आणि आपल्या उभवलेल्या गुडघ्यावर तिचे डोके घेऊन थोपटत थोपटत त्या तिला भरवू लागल्या.
"स्त्री देहाचे भोग बाई हे, आपणच भोगायचे असतात. आपणच आपली लाज झाकायची. वेळेला अंगावर झाकायला कुणी रुमालदेखील टाकत नाही, पण अंगावरचे वस्त्र फेडायला हजार दुर्योधन असतात कायम आसपास. आणि करून सवरून नामानिराळे रहाण्याची तर निसर्गानेच त्यांना सूट दिलेली ना. पण लक्षात ठेव, आपण कितीतरी ताकदवान आहोत त्यांच्यापेक्षा. देहभावना आवरून ठेवण्याची कितीतरी मोठी शक्ती आहे आपल्यात. त्यांच्यात ती नाही. देहभावना आवरता न आल्याने त्यांच्यातला पशू कायमच जागा असतो. मग तो नवरा म्हणा, प्रियकर म्हणा की आप्त-परिचित म्हणा. पण आपण संयम बाळगला तर तर मग जगाच्या नाकावर टिच्चून टुकीत जगता येते. कुणाला हिंग लावून विचारायची गरज पडत नाही.
"'कुंकवाचा धनी' म्हणून मी सुरुवातीला गप्प राहिले. पण मग माझ्या देहाची होणारी विटंबना मलाच सोसवेना. का हे सगळे सहन करावे मी? दर रात्री तेच.... तो दारूचा आंबूस वास, माझ्या शरीराशी घेतलेल्या त्या ओंगळवाण्या झट्या, कायमची गलिच्छ करून टाकणारी ती भावना.... धमक होती माझ्यात ती जागवली. लाकडाने सडकून त्याला रस्त्यावर फेकून दिले. स्त्रीला जगण्यासाठी विकायला फक्त देहच असतो असे मानणाऱ्या या जगात आज मी चांगला आब राखून आहे.
"प्राजा.... तिला नाही तोल संभाळता आला.....त्या गणिताच्या मास्तरड्याने फसवले तिला आणि स्वत: कुठे पळून गेला.... प्राजाने विहीर जवळ केली..... आईला ओळखले नाही गं प्राजानं.... तिनं फक्त माझ्याशी मोकळेपणानं बोलायला हवं होतं.... जगाच्या नाकावर टिच्चून मी तिचं मूल वाढवलं असतं, आणि आनुवंशिकता वगैरे सगळं झूट, असलीच तर ती आईची आनुवंशिकताच असते हे सिद्ध केलं असतं. ते बाळ मुळीच त्या मास्तरड्याच्या वळणावर गेलं नसतं... पण प्राजाला नाही भरवसा वाटला आईचा....
"तिची तरी काय चूक म्हणा. दोन तिथे चार रट्टे देऊन मी तिला धारेवर ठेवली होती. घरात खाणारे एक तोंड कमी व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी सावत्र आईच्या मानलेल्या भावाशीच माझे लग्न लावून दिले होते. पण प्राजाकरता मी आकाशपाताळ एक करून कुणीतरी माणसातला नवरा शोधला असता. हैवानातला नाही. नाहीतर माझ्यासारखंच ताठ मानेने तिला जगायला शिकवले असते. शरीर संबंध, मातृत्व हे सगळे देहाचे भोग आहेत, आणी ते भोगणे वा न भोगणे आपल्या हातात आहे हे तिला लख्ख उमजले असते तर तीही आपल्या अटींवर जगली असती.
"माझ्यामागे कोण असा भोचक प्रश्न विचारणारे नाहीत असे नाहीत. पण हा प्रश्न विचारणाऱ्यांच्या मागे जे कोण आहेत ते बघितले की विचारणाऱ्यांची कीव येते. असले दिवटे मागे असण्यापेक्षा कुणी नसलेलेच बरे."
आयुष्यात पहिल्यांदाच सुधाताई मोकळेपणाने भडाभडा बोलत होत्या. त्या बोलतच राहिल्या.
अनाहिताला काहीही कळत नव्हते, आणि सगळे कळत होते.
हूं हूं करत ती हळूहळू त्यांच्या कुशीत शिरली.
किंचित जाणवणाया गारव्यात मायलेकी एका चादरीत गुरगुटून झोपल्या.