सर्व मनोगत सदस्य व प्रशासक यांना विजयादशमीच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा.
दसरा आला की मला आठवण होते ती पाटीपूजनाची. माझे बाबा पूर्वी क्लास घेत असत. त्यात ते सर्वांना पाटी वापरण्याचा आग्रह करीत. आधी पाटीवर गणिते सोडवा, मग वहीत. क्लासला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक नियम असायचा की येताना पाटी घेऊन येणे. पाटी आणली नाही, विसरली, अशी कारणे सांगून भागत नसे. जो कोणी पाटी आणायचा नाही त्याला आमच्याकडून पाटी पुरवली जायची, कारण आमच्याकडे १०-१५ पाट्या होत्या. लहानपणी दरवर्षी आणलेल्या पाट्या जपून ठेवल्या होत्या. त्या सर्व पाट्यांची दसऱ्याला पूजा होत असे. पाटीवर लिहायला रूळ असायचे. भुसा घालून भरलेले १०० रूळ एका खोक्यात असायचे. मग एक रूळ तुटला की दुसरा घे, दुसरा तुटला की तिसरा घे असे करता करता रुळाचे असंख्य तुकडे जमा व्हायचे.
आईच्या घरापासून चतुः श्रृंगी चालण्याच्या टप्यात होती आणि नवरात्रात खूप गर्दी, त्यामुळे देवीचे दर्शन आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर घ्यायचो. आईच्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मुली म्हणजे आमच्या मैत्रिणी अशा आम्ही सर्व पहाटे ४ ला सर्व आवरून घराच्या बाहेर पडायचो आणि चालत चतुः श्रृंगीला जायचो. त्यावेळेला पुण्यातली हवा स्वच्छ शुद्ध असायची. त्यमुळे खूप प्रसन्न वाटायचे. तिथून रिक्षा करून कसबा पेठेतल्या देवीचे दर्शन. मंडईत त्यावेळेला नुकतेच उजाडलेले असायचे. मग बांगड्या भरायचा कार्यक्रम. नंतर बसने घरी परत. त्या वयात साडी नेसण्याचे खूप आकर्षण होते, त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी आईच्या साड्या नेसून आईचेच ब्लाऊज टाचून घालायचो. साडी नेसण्याचा उत्साह पाहून नंतर आईने आम्हाला एक काळा व एक पांढरा असे दोन ब्लाऊज शिवून दिले होते.
पुढे नोकरी लागल्यावर ऑफीसमध्ये दसऱ्याच्या दिवशी जेवणाच्या सुट्टीनंतर "पूजा मूड" असायचा. त्या ऑफीसमध्ये purchase, sales, accounts अशी departments होती. मग प्रत्येक department ला पूजेनिमित्त भेट व वेगवेगळी खादाडी. त्या कंपनीचे मालक मराठी असल्याने सगळीकडे मराठमोळे वातावरण होते.
इथे अमेरिकेत आल्यावर दसऱ्याची एक मजेशीर आठवण आहे. आम्हाला पहिल्यांदाच एक मराठी मुलगा भेटला. त्याची ओळख झाल्यावर त्याला आम्ही दसऱ्याला जेवायला बोलावले. त्या शहरात एक थायी दुकान होते. तिथे क्वचित भारतीय भाजी दिसायची. तेव्हा कधी नव्हे ते छोटी हिरवीगार कार्ली दिसली. मग दसऱ्याच्या मुहूर्तावर भरली कार्ली व शेवायाची खीर केली. कार्ल्याच्या नादात मात्र शेवयाची खीर बिघडली. कार्ल्याची भाजी बघितल्यावर तोही खुष झाला.
तुमच्या सर्वांच्या अशाच काही खास दसरा आठवणी असतीलच, त्या वाचायला आवडतील.
रोहिणी