घोडा आणि ओझे

दूर कुठेशी धूळ उडवतो  घोडा माळावरती
टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती

नवीन जीवन, नवीन मानव,  सृष्टीही नवनवती
नवीन आतुन मनही - सारे  नवीन अवतीभवती

सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती
देवेंद्राचे सूक्त गाऊनी  वज्रच होई छाती

करित पाठ ऋग्वेदऋचांचा  कुणी आहुती देती 
मनामनातुन गुंजन करते  'ॐ शांती शांती '

आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ?
- मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती

ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती
कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती
***

***
जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती 
आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती    

आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती
आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती 
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

वाद घालतो "नव्हेच तुमची, ही तर आमची माती
वेगवेगळी आता लिहावी तुमची आमची खाती"

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यांवरती...