"अरे प्रथम कुठे चाललाएस रे"?
राज यांचं भाषण ऐकून माझं तरुण रक्त खवळलं होतं, मराठी माणसांवर आणि पर्यायाने मराठी जनांवर होणाऱ्या अन्यायाचा मला साक्षात्कार झाला होता अन त्या तिरमिरीतच मी घरातून बाहेर पडत होतो.
आता आईला कसं सांगू काय चालू आहे ते माझ्या संवेदनशील मनात? तिला तर हेही नाही समजत की मी मराठी नेत्यांना का मानतो.
ती बसून असते तासन तास त्या समोरच्या गुजरातीणीबरोबर, मोडक्या हिंदीत गप्पा मारत. कुठून समजणार तिला मराठी अस्मिता?
रस्त्यावर आलो, जिकडे बघावं तिकडे बाहेरचे लोक, बाहेरची भाषा. असा संताप आला मला.
सरळ घरी निघून यावं आणि मराठी सक्तीकरणाची मोहीम आईपासूनच चालू करावी असा विचार मनात आला. ती गुजरातीणीबरोबर हिंदीत बोलतेच कशी?
आईशप्पत कोण केकाटत आहे?
रस्त्यावर एक भिकारडीचं तिच्याहून भिकारडं पोर रडत होतं.
मी घाईत होतो, नाहीतर त्याला मराठीतूनच रडायला लावलं असत.
त्यासाठी मला त्या भिकार जागेवर बसून रडायला लागलं तरी बेहत्तर.
ती मुंबईत भीक मागू दे आणि तीच पोर भोकाडू दे. मला काय त्याचं, त्याचा मराठी आणि महाराष्ट्राशी काय संबंध?
फक्त रडणं आणि भीक मागणं मराठीतून 'च' झालं पाहिजे. मग मला मराठीचा अभिमान वाटेल.
पण मी काही त्या फंदात पडलो नाही, मी भिकारणीला मराठी शिकवण्यापेक्षा तिनेच मला भीक मागायला शिकवण्याचा योग अधिक वाटला.
घरी आलो तर आई मुंबईत होणारं गुलाम अलींचं "लाईव कोनसर्ट" बघत होती. गाणं चालू होतं "चुपके चुपके रात दिन......"
माझं आणि आईचं आवडतं गाणं, पण आज मी "मराठी अभिमानाने भारलेला". आत जाऊन बिछान्यावर पडलो. विचार करत होतो, ह्या गाण्याऐवजी
"चोरून चोरून दिवस रात्र" कसं वाटेल? खूप अस्वस्थ वाटत होत, झोपच येत नव्हती.
कितीही प्रयत्न केला पण काय करू,
मला गुलाम अलींचं चुपके चुपके रात दिन...... "च" आवडतं. त्याच्यावर मराठीची सक्ती करणं,
माझ्या सळसळत्या मराठी बाण्यालाही नाही जमलं.
शेवटी जुनी कॅसेट काढून ते गाणं पूर्ण एकलं, "राज" ची मनोमन माफी मागितली,
आणि भरल्या पण शांत मनानं झोपून गेलो.