अरण्यरूदन

सूर्य उगवतो, रोज आणतो, दहशत ताजी
अद्रुश्याशी युद्ध, कशी जिंकावी बाजी?

माणुस विणतो स्वप्न जरी तागेच्या तागे
दूर अचानक ठिणगीमधला वणवा जागे
राखच होती स्वप्ने, विस्कटतेही घरटे
एक भितीचा पापुद्रा जगण्याला चिकटे

भयभीतांना धर्म नसे मंदिरमशिदीचा
बसे तडाखा सर्वांना अंदाधुंदीचा
जाळा किंवा पुरा,प्रेत काहीच न बोले
'बळी कशासाठी' विचारती थिजून डोळे

डोळे झाकुन देव, तरी त्याचाच पुकारा
व्रत, वैकल्ये, नवस, कपाळावर अंगारा
घरात यावे सुखरुप म्हणुनी रोज साकडे
सैतानाला हसू फुटे, जग असे भाबडे

कधीतरी दहशतीविणा उगवेल सूर्य का?
की, रंगाने लालच भिजतिल नव्या तारखा?
माणुसकीला मानव का होतोय पारखा?
हतबलतेचा क्रूरपणाला प्रश्न सारखा