माझ्या पराभवाचे ते दाखलेच होते
सोडून हात गेले ते आपलेच होते
झाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले
डोळे वटारलेले- ते धाकलेच होते
नावाजले जगाने सांगू तरी कुणाला
की नाव आपल्यांनी तर टाकलेच होते
झाली पहाट,झाला बभ्रा कसा कळेना
की कोंबडेहि सारे मी झाकलेच होते
मागावयास माफी ते पाय मी धरोनी
गेलो,नि हाय दैवा ते माखलेच होते
दु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले
शोधीत आसरा ते मजसारखेच होते
हे काय आज त्यांना आले हसू नव्याने
माझे फजीत होणे तर कालचेच होते