न आकळलेलं काही... ४

शास्त्रीय नाही, पण तोच पक्का आधार असलेली दोन गाणी आहेत. "हे सुरांनो चंद्र व्हा..." आणि "रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी..." दोन्हींना माझ्या माहितीप्रमाणे संगीत आहे ते अभिषेकींचंच. एक 'ययाती'मधलं आणि दुसरं... ठाऊक नाही. इतकंच कळतं की ही गझलेच्या अंगानं जाणारी रचना असावी. शंकर रामाणी यांची कविता. माझ्याकडं "हे सुरांनो..." बहुदा अर्चना कान्हेरे यांच्या आवाजातलं आहे. राग बहुदा चारुकेशी. जीवघेणी पेशकारी. कमालीची आर्तता आणि विनवणी. सूर साक्षात उभे राहिले आणि ती आर्तता त्यांनी ऐकली तर कदाचित त्या आर्ततेपोटीच प्रियकराकडं धावत जाऊन चांदण्यांचे ते कोष पोचवतील. "रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी..." आवाज बुवांचाच. हे गीत सरळसरळ विरहानं व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या आक्रोशाचं आहे, हे माझं आकलन. अर्थ वेगळाही असू शकेल. पण माझं या गीताशी जुळलेलं नातं "हे सुरांनो" सोबतच येत गेलं. कारण संगणकावर ऐकताना एका फोल्डरमध्ये ते त्याच क्रमानं येत गेलं. त्यामुळं तो अर्थ. आता या गाण्यातले शब्द समजतात आणि अर्थ लागतो असं म्हणणं इतक्या काळानंतर सोपंच आहे. पण सुरवातीला माझं ध्यान त्या शब्दांकडं फारसं नसायचंच. अनेकदा तर 'हे सुरांनो'मधील "वाट एकाकी तमाची..." याऐवजी मी "वाट एकाकीच माझी..." असं घेऊन बसायचो. कारण मनात घर केलं होतं ते त्यातल्या सुरांच्या आर्ततेनं. मग शब्दांकडे ध्यान जायचंच नाही. तीच गोष्ट 'रंध्रात'ची. त्यातली आर्तता अनुभवायची असेल, आक्रोश समजून घ्यायचा असेल तर प्रेमविरह हवाच का? नाहीच. ती पोचतेच त्याविनाही. त्या, आपण स्वतः नसलेल्या, प्रेयसी आणि प्रियकराच्या भूमिकेत हे सूर नेतातच. 
आणखी एक. राग भूप. किशोरीताई. "सहेला रे". केवळ अनुभवण्याची चीज (हा शब्द त्या अर्थानं नाही. एक गोष्ट या अर्थानं). 'सहेला'सोबत सप्तसूर, त्यांचं ज्ञान करून घेणं. मुळात कल्पनाच जीवघेणी. त्यातल्या "आ मिल गाये" मधल्या "आ" मधला पुकार... वेगवेगळ्या धर्तीचा. मघाचे ते "चांदण्यांचे कोष" पोचवणारे सूर आता इथं प्रियकरालाच समोर आणून उभे करतात. शब्दच नाहीत, असा हा अनुभव येतोच.
कशामुळं घडतं हे? काय करतात हे सूर नेमकं आपल्याला?
दाखले असे द्यावेत तरी किती? एकेक रचना, मनात जाऊन बसलेल्या, बाहेर काढायच्या ठरवल्या तरी प्रश्नांचं स्वरूप तेच राहतं. मग ते रागदारी गायन असो, शुद्ध रागदारी किंवा फ्यूजन प्रकारातलं वाद्यसंगीत असो, ठुमऱ्या असो, दादरा तालातल्या रचना किंवा अनंत गझला. भावगीतेही आहेत. त्यातलीही एखादी जागा अशी मनात जाऊन बसलेली असते. सोबत तिच्या अशा खास आठवणी असतात.
---
ही एक अशीच गोष्ट. मध्यंतरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला काही अनुवाद करण्याची एक संधी मिळाली होती. त्यातून माणसासमोर चिरंतन काळापासून असलेले काही मूलभूत प्रश्न समजत गेले. हे सारं गद्यातून लिहिलं गेलेलं. कधी कल्पनाही केली नव्हती की त्यातील काही पायाभूत प्रश्न संगीताच्या रूपानं आपल्या डोक्यात थोडा प्रकाश टाकून जातील. संतांच्या रचना आहेतच. त्या ऐकल्याही होत्या. पण तशा अर्थानं ते प्रश्न आत जाऊन पूर्ण भिडलेले नव्हते. उदाहरणार्थ, "वृक्षवल्ली आम्हा सोयरे..." यात किंवा "पसायदान"मध्ये वैश्विक मुद्यांचीच हाताळणी झाली आहे. त्या अर्थानं ते तत्वज्ञानच. आणि त्या संताच्या संपूर्ण कृतींचा विचार करून त्या रचना पाहिल्या तर पूर्ण तत्त्वज्ञान असंही म्हणता येतं. पण माणसापुढं वैयक्तिक स्वरूपातला प्रश्न असतो त्याची मांडणी माझ्या ध्यानी आली ती जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलेल्या एका भैरवीतून. रचना कबीरांची आहे. "मेरा तेरा मनवा कैसा एक होय रे..." बास्स. या एका प्रश्नात खरं तर कबीरांनी सारं काही सांगून टाकलंय, पण ते ज्यानं थोडं तत्त्वज्ञान वाचलंय त्याच्यासाठी. इतरांचं काय? पुढचा दोहा आहे, "मैं कहता अखियन देखी, तू कहता कागजकी लिखी..." हेही उत्तर पुरत नसेल तर पुढच्या एका दोह्यात कबीर अगदी अंतिम स्वरूपाचा पर्याय सांगून जातात. म्हणतात, "मै कहता तू जागत रहीयो, तू रहता है सोयी रे...!" अभिषेकी आणि बहुदा शौनक या दोघांनी त्यात 'जागत' आणि 'सोयी' या दोन शब्दांवर जो काही स्वरांचा - सुरांचा खेळ केला आहे काही क्षणांसाठी, तो तिथंच मनाचा प्रवास थांबवतो त्या काळासाठी. पुढं सरकावंसं वाटू नये असं काय आहे त्या शब्दांमध्ये? आहे ते, त्या शब्दांच्या अली-पलीकडील शब्दांतून येतंच. पण तरी मन तिथंच थांबू पाहतं. थांबत असलं तरी, त्या दोह्याचा अर्थ पक्का सांगून जातं. मग विपश्यना म्हणजे काय हे समजू लागतं, ध्यान म्हणजे काय हे समजू लागतं. ध्यान किंवा विपश्यना भले जमणार नाही, पण त्याचं तंत्र समजल्यानं एकदम बुद्धाला क्वांटम फिजिक्स कळलं असेल का, असा भलताच प्रश्न डोक्यात जागा होऊन जातो. ही केवळ त्या 'जागत' आणि 'सोयी' या दोन शब्दांवर झालेल्या सूर-तालाच्या करामतीची किमया आहे का? पुन्हा इथं तेच. इतर काही रचनांतून न भावलेलं वैश्विक सत्य इथं या रचनेतच का भावावं? रचना भैरवीत आहे. पण भैरवी तर मला ओळखताही येत नाही. पण मग शब्दांचा अर्थ एरवी जितक्या ताकदीनं संप्रेषित होत नाही तितका इथंच का होतोय? सुरांची ताकद हे उत्तर ठीक. पण म्हणजे काय?
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून म्हणे, खरं तर कोणत्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठं थांबवायचा याचं प्रत्येकाचं आकलन त्यातून तयार होतं. हे असंच संगीताचं असावं बहुदा...
---
संगीत समजून ऐकणं आणि न आकळताही संगीत ऐकणं हे द्वंद्व माझ्या मनात कायमचं घर करून बसलंय. मन आणि मेंदू यातलं हे द्वंद्व आहे का? असावं बहुदा. ऐकताना कुठंही काहीही कमी वाटत नाही. तरी जे ऐकतोय त्यातून निर्माण होणाऱ्या अनुभूतीचा अर्थ लावण्यासाठी मनाला पुरेशी ताकद लागते ती मिळत नाही. ती बुद्धीची ताकद असं तर नाही? तिथं मेंदू कामाला येतो का? म्हणजे तो सूर, ताल, लय, स्वर वगैरेंचं विश्लेषण करून मनापर्यंत पोचवत असावा का? गुरू केल्याशिवाय हे झेपणे नाही हे उत्तर देऊन तात्पुरतं मनाचं समाधान होतं, पण तो प्रयत्न होत नाही आणि मग पुन्हा असं काही ऐकलं की जिवाची घालमेल होतेच. अशी अनुभूती चित्रगीत, भावगीत यासंबंधात होते का? माझा अनुभव असा आहे की, होतो; पण तेथे त्याचा गहिरेपणा अपवादात्मकच असतो. अपवादाचीच गोष्ट सुरू आहे म्हणून त्यापैकी दोन गीतांचा उल्लेख करावा लागेल. एक आहे चित्रगीत "कभी तनहाईमें यूँ", संगीत स्नेहल भाटकरांचं; आणि दुसरी आहे गुलाम अलींच्या (थोरल्या नव्हे; छोट्या) आवाजातली एक ठुमरी, "गोरी तोरे नैना..." पारंपरिक पद्धतीनं पेश केलेली आणि सोबत तिचा दादरा. या दोन्ही रचनांमध्ये काय भिडतं आत जाऊन? सांगणं शक्य नाही. पण वेडावतात या दोन्ही रचना. यातली पहिली अनेकांना आवडत असेल. "गोरी तोरे नैना" ही ठुमरी सगळ्यांनाच भावते की नाही ठाऊक नाही.
अशाच एका चर्चेत माझ्या मित्रानं सांगितलं होतं, या अपवादाचा नियम करावयाचा असेल तर थोडं शास्त्रीय संगीत शिकून घ्यावंच लागेल तुला. त्यासाठीचा दाखला साधा सरळ होता. आमच्याच संवादातला. मी म्हणालो होतो, अनेकदा सुरेश वाडकरांच्या 'ओंकार स्वरूपा'मधल्या काही रचना सकाळी ऐकल्या की खूप प्रसन्न वाटतं. त्यानं ताडकन सांगितलं होतं, "कारण त्या सकाळच्या रागांमध्ये बांधलेल्या आहेत."
पुन्हा संगीत, सूर, लय, ताल आणि काळाचं नातं...
म्हणजे काय, तर प्रश्नच.
त्या मित्रानंच पुलंच्या एका दाखल्याचा आधार घेत सांगितलं, "न समजताही संगीत ऐकणं आणि त्यातला आनंद मिळवणं, शोधणं हे ठीक. पण ते कसं आहे की आंधळ्या शिल्पप्रेमीसारखं. तो आपला शिल्प चाचपडत राहतो, त्यातलं शिल्प त्याच्या हाती लागतंही. पण ते त्याला दिसत नसतं. शिल्पाचा आनंद त्याच्यालेखी स्पर्शाचाच असतो. तो असेलही त्याच्यापुरता पूर्ण; पण नेत्राच्या पातळीवर तो येत नाही. तसा आला नाही की हे असे प्रश्न येतात. तसंच हे तुझं." पुलंच्या बंगचित्रंमध्ये या चित्रकाराचा दाखला असावा. अंध असूनही तो हातानं दाखवत चित्र करून घेतो असा काहीसा. तसं हे माझं. तो चित्रकार तिथं चित्र काढतानाचा आनंद जरूर मिळवतो. पण तयार चित्रकृतीचा दृष्टीसुखाला मात्र तो तसा पारखाच असतो.
हे द्वंद्व असं सुटणार नाही हे नक्की.
पटतं की, गुरूच हवा.
प्रश्नांच्या उत्तराचा शोध इथंच थांबवावा काय?
हाही एक प्रश्नच...
- पूर्ण -