आज उतरतेवेळी दोन कामं करायची ठरवलं होतं. निसर्गाच्या कृपेमुळे मनसोक्त फोटोग्राफी करता आली आणि दुसरं काम होतं हादडण्याचं. गरमा गरम तंदुरी आलू पराठा त्यावर बटरची वडी. अहाहा! सहही! लाजबाब! पोटोबा व मनोबा दोन्ही तृप्त झाले होते. तृप्तीची ढेकर देतच बसमध्ये चढलो. एक वाजताचं गेट मिळेल ह्या हिशोबाने चालायचं ठरवलं होतं पण आज सगळेच निसर्गाचा आनंद लुटण्याचा मूडमध्ये होतेच शिवाय मस्तीच्याही.
गोविंदघाट ते बद्रीनाथ अवघ्या एक तासाचा पण अवघड प्रवास! एका बाजूला खोल दरी दुसऱ्या बाजूला डोंगरकपारी मध्ये अरुंद रस्ता. रस्ता सोडून बस थोडीशीही डावी-उजवीकडे झाली तर थेट स्वर्गाची वाट. इथली धर्मशाळा खूप पॉश होती आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे बाल्कनीत उभं राहिलं की थेट समोर दिसणारं बद्रीनाथाचं देऊळ. इथल्या कँप लीडरने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची माहिती सांगितली व त्यांच्या बरोबर असलेल्या पांड्याने बऱ्याच आख्यायिका सांगितल्या. त्यांच्या हळू आवाजातली एकही आख्यायिका ऐकायला आली नाही पण ही पुजा केली तर एवढी ती पुजा केली तेवढे रुपये हे स्पष्ट ऐकायला आले. असो. काही जण तप्त कुंडात तर काही जणांनी तप्त कुंडातलं पाणी मागवून, स्वच्छ देहाने दर्शनासाठी सज्ज झाले. काही जणींनी तप्त कुंडात उमाभारती बरोबर सहस्नानाचा अनुभव घेतला. ह्या वेळेला देवळात बदललेली दर्शनाची व्यवस्था बघून प्रसन्न वाटले. आता मुख्य गाभाऱ्यात जाता येत नाही. मी ह्यापूर्वी २००२मध्ये गेले होते. गारठून टाकणाऱ्या थंडीत पाच वाजल्यापासून रांगेत उभे राहिलो तेव्हा कुठे आठ वाजता क्षणभरासाठी देवदर्शन झाले होते. पायदळी पडणारा प्रसाद व तुळशीच्या माळा, अभिषेकाच दूध पाणी सांडून निसरडा झालेला गाभारा, हे सगळं बघून, देवदर्शनामुळे मन प्रसन्न व्हायच्या ऐवजी अप्रसन्नच झालं होतं. देवदर्शन दूरून पण छान झालं. थोडं बाजारात हिंडलो. हिंग, रुद्राक्ष विकणारे खूप होते पण शुद्धतेची खात्री नसल्यामुळे विकत घेतले नाही.
दुसऱ्या दिवशी होता शेवटचा ट्रेक 'वसुंधरा फॉल्सचा'. नेहमीप्रमाणे नाश्ता करून जेवणाचे डबे भरून निघालो. फक्त चार किमी बसचा प्रवास. एखादं किमी जात नाही तो एका वळणावर रस्त्यात दरड कोसळलेली पण रस्ता साफ केलेला. दरड कोसळल्यामुळे रस्ता दबून खड्डा तयार झाला होता. वाटलं आता पायीच जावं लागणार पण ड्रायव्हरने 'जय बद्री विशाल की' म्हणत नेली बॉ कशी बशी बस. पंधरा मिनिटात पोचलो माना बॉर्डरला. तिथून वसुंधरा फॉल्स पाच किमीवर. सगळ्यात स्वच्छ सुंदर ट्रेक. निसर्गदेवताही आमच्यावर मेहेरबान होती. ना खूप थंडी ना खूप ऊन. रस्ताही दगडांनी जरा बऱ्यापैकी बांधलेला. पायात बूट असल्यामुळे चालायला त्रास होत नव्हता आणि विशेष म्हणजे ना घोडेवाले होते ना पिट्टुवाले ना ही धाबेवाल्यांची गर्दी. माणसांची गर्दी अगदी तुरळक. सरस्वती नदीचं उगम स्थान इथेच आहे. पांडव इथूनच पुढे स्वर्गाला गेले. इतका सुंदर रस्ता! एका बाजूला हिरवे गार डोंगर मधून वाहणारी नदी, नितांत सुंदर निसर्ग, अत्यंत शुद्ध निर्मळ हवा. खरोखर स्वर्गाला जाण्यासाठी इतर दुसरा कुठला रस्ता असूच शकत नाही. आमच्यासाठी तर हाच स्वर्ग होता. द्रौपदीला सरस्वती नदी ओलांडता येईना म्हणून भीमाने नदीवर भला मोठा दगड ठेवून पूल बांधला तो 'भीम पूल' बघून पुढे निघालो. हा रस्ता जरी खूप चढावाचा नसला तरी लांबच लांब. एक डोंगर, दोन डोंगर.... पार करतोच आहे, करतोच आहे, आता ह्या डोंगरापलीकडे रस्ता संपतोय असं वाटत नाही तो परत दुसऱ्या डोंगराला वळसा घालून जाणारा रस्ता दिसायचा. असे कितीतरी डोंगर पार करत पुढे जात होतो. सकाळचा नाश्ता केव्हाच पचला होता. आज जवळच्या डब्याला पर्याय नव्हता. पुरीभाजी खाऊन पुढे वाटचाल सुरू केली. आज मला चालायचा कंटाळाच आला होता त्यात दोन परदेशी पाहुण्यांनी हवामान बिघडल्यामुळे धबधबा न बघताच माघारी फिरल्याच सांगितलं त्यामुळे पुढे जायचा विचार सोडूनच दिला. निसर्गाच्या सान्निध्यात गप्पा मारत निवांत बसलो. माना गावात हातमागावर सुंदर गालिचे विणताना बघितले. कुठे मळ्यांतली कीटकनाशके न फवारलेली ताजी गोभी विकत घेऊन बकरी सारखी चरत बसलो तर कुठे बटाट्याच्या व मटारच्या मळ्यातले मटार तोडून खात बसलो, भारताच्या आखरी चायच्या टपरी चहा पीत बसलो अश्या तऱ्हेने यथेच्छ खादाडी, पिदाडी, फोटोग्राफी, मटरगश्ती करत बाकी लोकांच्या परतण्याची वाट बघत बसलो. काही मंडळी गणेश गुंफा, व्यास गुंफा (जिथे व्यासांनी गणपतीला महाभारत सांगितले) बघून परतली. वसुंधरा फॉल्स खूपच छान आहे, आम्ही खूप मजा केली तुमच्यापेक्षा आम्ही जास्त मजा केली अशी मटरगश्तीचा आनंद तुम्ही पायपिटीत उगीचच घालवला, अशी चिडवाचिडवी करण्यात मग्न होतो तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागला. बस 'त्या'वळणावर येऊन पोचलेली. आमचा जीव मुठीत. चालकाने घातली होती बस त्या गड्ड्यात. बस पुढे जाईना की मागे.. आपुले मरण पाहिले म्या डोळा. एका क्षणात कोट्यवधी देव आठवले. चालका जवळ बसलेली मंडळी बाकीच्यांना शांत राहण्याची खूण करत होते. दिवसभरात गड्डा अजून दबल्या गेला होता. एका बाजूला कोसळून खाली आलेले मोठं-मोठाले दगड व धबधबा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. खलाशाने उतरण्याची खूण करताच क्षणात बस रिकामी झाली. भीतीने पाय लटलटा कापायला लागले होते. थोड्यावेळ बस निघायची वाट पाहत बसलो होतो. पायी चालत जाण्यासारखे अंतर होते त्यामुळे आम्ही सगळ्याजणी पायी निघालो व पुरुष मंडळी मदतीकरिता थांबली. बीआरोच्या मदतीने बस बाहेर काढून पुरुषांना पोचायला दोन तास लागले.
चहा-नाश्ता करून बद्री-विशाला धन्यवाद द्यायला गेलो. आज व्यवस्थित दर्शन झाले. आज सगळेच सुस्तावले तर होतेच आणि घाबरलेले पण. उद्या लवकर उठून निघायचे होते. सहालाच निघालो. आतापर्यंतचा सगळा अवघड प्रवास सुरळीत पार पडला होता, शेवटचाही पार पडू देत बद्रीविशालला साकडं घालून बस मध्ये बसलो. साधारण एक तासानंतरच एका ठिकाणी थांबावं लागलं. आमच्या बसच्या पुढे पंचवीस एक बस असतील. खाली उतरून दरड कोसळणे म्हणजे काय हे पाहून पाचावर धारण बसली. पन्नास-साठ फुटा वरून मोठ-मोठाले दगड वेगाने घरंगळून खाली येत होते. चार-पाच तासाची निचींती होती. ह्या सगळ्याची कल्पना होती म्हणून आदल्या दिवशी भरपूर खायला घेऊन ठेवले होते म्हणून बरे झाले. पाच तासाने पुढे निघालो. काही अंतर जात नाही तो परत बसेसची मोठ्ठी रांग. आता काय झाले? एका वळणावर एक टँकर उलटलेला. प्रत्येक वेळी चालकाने बस थांबवल्यावर खलाशी मान वर करून पाहायचा आपली बस सुरक्षित ठिकाणी थांबली आहे ना. रस्ता वाहतुकीपुरता साफ झाला होता. वाहने जाऊ शकत होती. पण प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई. सगळा गोंधळ. काही तरुण पुढे सरसावले व नियंत्रण करू लागलेले बघून बरं वाटलं पण गंमत अशी ते आपलं वाहन निघाल्या बरोबर त्यात बसून निघून गेले. मग इतर काही मंडळी नियंत्रण करायची. बसमध्येच भरून आणलेले जेवणाचे डबे खाऊन वाट बघत बसलो. जवळचे पाणीही संपत आले होते. जवळपास एकही हॉटेल नव्हते. एका डोंगरावर एक छोटासा झरा होता. वर चढून रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या. चार तासाने कुठे पुढे सरकलो. अगदी पंधरा मिनिटं चहासाठी एका ठिकाणी बस थांबवली. संध्याकाळी सातच्या आत देवप्रयाग पार करू नाही शकलो तर मध्येच कुठेतरी मुक्काम करावा लागणार होता पण ती वेळ आली नाही. रात्री दहा वाजता ऋषीकेशला पोचलो. व्ही१२नी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. सोळा तासाच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळाला. जेवून, अंथरुणात पडलो ते सकाळी सहालाच जाग आली. आज निरोप समारंभ. वियोगाचा क्षण. एकमेकांचे पत्ते फोन नंबर मेल आयडी घेऊन एक ग्रुप फोटोही काढून घेतला. दहा दिवसांपूर्वी एकमेकांची ओळख मुंबैकर, नागपूरकर, जळगावकर अशी न राहता आज ती झाली होती ' व्ही१'. हिमालयात विलक्षण आकर्षण आहे. परत परत आपल्याला भेटायला बोलावतो. हिमाचल, गढवाल, कुमाऊ प्रत्येक ठिकाणच निसर्ग सौंदर्य अनोखं. 'साद देती हिमशिखरे'. पुढचा ट्रेक कैलास मानसरोवर की एव्हरेस्ट बेस कँप चे मनसुबे रचतच परतीची वाट धरली.