डोरियन ग्रे

डोरियन ग्रे

"बिग बॉस मधून एकाचे पलायन"
कॅमेराच्या झगझगाटात   
प्रश्नांची सरबत्त्ती..
सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत

तिथेच  आशाळभूतपणे उभी असणारी
पोट खपाटीला गेलेली, झिपऱ्या केसाची कोवळी मुले ..
कुणालाच दिसली नाहीत?

नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा
आणि बघण्याचा हट्ट
वाढतोच आहे...
एक कॅमेराचा झोत गेला की
मागे उरलेल्या अंधारात
अनेक जण सामावतात....
अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात

निवडक काहींना कधी कळणार? 
कधी कळणार आम्हालाही?
की वलयामागे
अंधारात
असंख्य 'डोरियन ग्रे' चाचपडत राहतात..
चालतेबोलते- हाडामासाचे .. प्रतिमेतले नाही!
कोणाच्यातरी पापाच परिमार्जन करत
जन्मभर ...

- सोनाली जोशी