हुकुमी नकोस आणू डोळ्यात पावसाळे
पाहून सर्व झाले खोटे, खरे उमाळे
वश कंकणांस फासे, वश पैंजणांस चौसर
प्रीती जुगार जेथे पुरुषा तुझे दिवाळे
प्यालो मदीर नजरा, प्यालो अधरसुधाही
झोकू अता कसे मी, साकी, शिळे उकाळे ?
आहेस तीच तू अन् माझाच हात आहे
रोमांच आणणारा मग स्पर्श का विटाळे ?
जो पारधी न झाला, होईल खास पारध
रानात माणसांच्या घडते कुठे निराळे ?
घाला नव्या फुलांचे कंठात हार माझ्या
निर्माल्य होत आले सारे जुने जिव्हाळे