शरीर नेताय...

मुशायऱ्याची शमा पुढे ठेवलीच नाही
जगास माझी कथा कधी झेपलीच नाही

खिशात नाणी, उरात आगी, दुकान चालू
मनास होता उपास, मी घेतलीच नाही

नशीब आले कडेवरी जोजवून घ्याया
विसंबुनी मान आपली टेकलीच नाही

बघून सारे अवाक झाले तिची अवस्था
तुझ्यापरी जिंदगी कुणी फेकलीच नाही

विचार-पंखे नवे किती लावले मनाला
तुझीच वाहे हवा, नवी खेळलीच नाही

पुन्हा कधी ओळ धुंदशी मी रचेन जाणे
पुन्हा तशी वेदना मला खेटलीच नाही

जुनीच इच्छा नवी तयारी करून घेते
पुन्हा अशी भेटते जशी भेटलीच नाही

तपासले ना कधीच मी नेमका कसा ते
अजून माझ्यात भीड ती, चेपलीच नाही 

पुन्हा तशी पोर्णिमा कुठे व्हायला अताशा
पुन्हा तशी भावना तिने नेसलीच नाही

कटाक्ष, हासून बोलणे, भेटण्यास येणे
तुझ्यावरी चूक एकही शेकलीच नाही

म्हणायचे ते म्हणून गेले कधीच डोळे
रजेवरी जीभ राहिली, रेटलीच नाही

उगाच आला उगाच गेला म्हणोत सारे
कशास सांगू सजा पुरी फेडलीच नाही?

शरीर नेताय शायरी ठेवताय मागे?
म्हणू नका की चिता तुझी पेटलीच नाही