......................................
... नंगेपणा हा नेसला मी!
......................................जन्म होता रुक्ष माझा; रुक्षतेने रेटला मी!
मी न गुणगुणलो कधी की सूर नाही छेडला मी!मीच मांडामांड केली; मीच मोडामोड केली...
खेळ होता एकट्याचा; एकट्याने खेळला मी!मी फिका पडणार नाही... मज न टवक्यांची क्षितीही
चेहऱ्याला रंग नाही कोणताही लेपला मी!मारते आकाश हाका... अन् धरित्रीही खुणावे...
येथला की तेथला मी? तेथला की येथला मी?भोवती फेऱ्या तुझ्या मी मारल्या वर्षानुवर्षे...
स्पर्श ओझरताच झाला... दूर गेलो फेकला मी!ज्या क्षणी दुनिये तुझ्या मी मुक्त कैदेतून झालो...
त्या क्षणी माझ्यावरी माझा पहारा नेमला मी!मोठमोठ्यांच्या खुणाही कागदी नावेप्रमाणे...
चेहरा पाण्यात पाण्यानेच माझा रेखला मी!वाटले आयुष्य गंधासारखे उधळून द्यावे....
श्वास पण एकेक काटाकाळजीने वेचला मी!
अर्थ जो काढायचा तो काढ तू यातून आता
जो दिला नव्हता तुला तो शब्द मागे घेतला मी!आतल्या गोटात नाही मी कधी गेलो कुणाच्या....
सोबत्यांच्या संशयाला वाव नाही ठेवला मी!
सभ्यतेची सभ्यतेने फेडली जातात वस्त्रे...!
मी असभ्यासारखा! नंगेपणा हा नेसला मी!!- प्रदीप कुलकर्णी
......................................
रचनाकाल ः १३ मार्च २००९
......................................