व्यर्थ...

व्यक्त व्हावे वाटले की लेखणी सरसावते
'व्यर्थ' या शब्दात सारे शेवटी सामावते

मी जिथे नाही अशी जागा दिसावी एकदा
आपल्याला आपले अस्तित्वही भंडावते

वाटते थट्टा अताशा प्रेम ते माझे तुझे
आजही थट्टेमुळे पण पापणी ओलावते

ओसरी, वाडा, बिऱ्हाडे, लाघवी भाडेकरू
हे पुणे नाहीच माझ्या आठवांचे गाव ते

द्विपदींचे ढीग संपावे तरी उरते कधी
अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते

दांडगाई भावनांची पाहतो परक्यापरी
जिंकते ती भावना हृदयास आगी लावते

संमती लाभायच्या आधीच ती जाते अता
सारखे पाहून माझे स्वप्नही सोकावते

मानले नाहीस भूषण, बोललो होतो तुला
बास हा त्रागा तुझा की जिंदगी हुलकावते