खंत वाटावी असे काहीच नाही
पोचलो तेथे, जिथे मी 'मी'च नाही
प्रेम, हेवा, मोह, भीती, राग, चिंता
दे असे मन, ज्यात हे काहीच नाही
'काळ' कोणी शोधला आहे न जाणे
सुधरण्याची एकही संधीच नाही
पोकळी आहे म्हणे हे विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही
त्या मिठीचा गंध येतो आजसुद्धा
सांगतो की, ती तुझी झालीच नाही
रोज निर्देशांक मृत्यूचा वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही
प्रेम माझे जेवढे आहे तिच्यावर
जिंदगीचे तेवढे नक्कीच नाही