हळू हळू दूर जात आहे मनातली एक एक व्यक्ती
हळू हळू झेप घेत आहे मनास व्यापायला विरक्ती
व्यसन मनुष्यास लागले की असाच त्याचा विनाश होतो
नको मला तू हसूस आता, करायचो मी तुझीच भक्ती
बरीच वर्षे निघून गेली, बरीच आहेतही अजूनी
शरीर चालेलही कदाचित, मनात राहील काय शक्ती?
मरायचे जर असेल तर मी स्वतःच सांगेन की नशीबा?
'तुला जसे वाटते तसे मी जगायची' का उगाच सक्ती?
नवीन दिलदार ओळ सुचता तुझ्या सुगंधात नाहतो मी
अजूनही चालते म्हणा तर तुझ्यावरी ही जुनीच युक्ती!
खरे म्हणावे तसा अताशा मनावरी आपला न ताबा
उडायचे चालकाविना ते, करून टाकू तुझी नियुक्ती
तुझ्यामुळे ते असेल याचा विचार नाही कधीच सुचला
अभाव खपली धरायचा वाटला मला आपल्याच रक्ती
तुझ्यामुळे सर्व हेलपाटे, पुन्हा पुन्हा जन्मतो इथे मी
असाच आहे विचार सध्या, मिळेल तेव्हा मिळेल मुक्ती
तुझ्या हयातीमधे मिळो वा नको मिळो ते महत्त्व भूषण
करू तयारी अशी, तुझा शेर शेर नंतर बनेल उक्ती