नाहीत मेघ जेथे, ते आसमंत नाही...
का जीवनी तसा ह्या दुःखास अंत नाही!
बहरून वृक्ष-वेली आल्या इथे तरीही
का सांग माणसांच्या हृदयी वसंत नाही?
कित्येक गणितवर्षे जग हे असेच आहे...
कोणी इथे अनादी अथवा अनंत नाही
विश्वास ठेवण्याचा येतोच प्रश्न कोठे
जे सांगतो तुम्हांला, ते मनघडंत नाही
देऊ नकोस माझ्या प्रश्नास उत्तरे तू
हा प्रश्न जीवघेणा अथवा ज्वलंत नाही!
रंगू कसा तुझ्या मी रंगांत सांग सूर्या?
असशील सूर्य तू, पण- मी आसमंत नाही...
अज्ञातवास हा मी उपभोगतो खुशीने
का वाटते जगाला की मी जिवंत नाही?
- कुमार जावडेकर