एक इरादा हसण्याचा अन विरोधात दुनिया सारी
आणि नभाशी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी
आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी?
काय कुणाचा खजिना माझ्या उरामधे दडला आहे
एक आठवण "तिळा तिळा" घोकते पापण्यांच्या दारी
दोन अपत्ये पोटाला अन जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी
काळ असा आहे की रात्री भिंत भिंत दचकत असते
कसे कळेना सगळे झाले अतिरेक्यांचे शेजारी
परवा परवा गुणगुणायची.. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी
कुठल्याशा आजाराने तोंडाची चव गेली आहे
शब्दांच्या वासानेही मौनाला येते ओकारी
एक इरादा निघण्याचा अन विरोधात ह्या दिशा दिशा
पाय ठेवतो ज्यावर त्या त्या वाटा फिरती माघारी