शेती, शेतकरी, आत्महत्या आणि भारत.

गेल्या वर्षी (आणि सद्ध्याही) शेतकरी आत्महत्यांचा विषय चर्चेमध्ये होता. मला वाटते सामान्य वाचकांमध्ये या विषयीची सखोल माहिती पोचणे ज़रूरीचे आहे. आखून घेतलेल्या कालखंडात झालेल्या सर्व आत्महत्या आणि त्याच विवक्षित कालावधीमधल्या शेतकऱ्यांच्या (फक्त कृषीविषयक कारणांमुळे झालेल्या) आत्महत्या यांचे गुणोत्तर तपासावे लागेल. आपल्या देशात प्रेमभंग, शैक्षणिक अपयश, मानसिक असंतुलन, घरगुती बेबनाव, नवऱ्याची व्यसनाधीनता ही आत्महत्येमागची प्रमुख कारणे राहत आलेली आहेत. त्यातले मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णता हे कारण सर्वाधिक दुर्लक्षित आहे. मनाचे असे काही आजार असू शकतात हेच अजूनही लोकांना माहीत नाही. मनोरुग्णांना सावरणे, धीर देणे दूरच, उलट त्यांना अत्यंत निष्ठूर, निर्दयतेने वागवले जाते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जितके विचारमंथन झाले त्याच्या निम्म्यानेही लक्ष मनोदौर्बल्याकडे वळले असते तर खूप काही साधले गेले असते.

अलीकडे बाबा आमटे यांच्या आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ या ठिकाणी वरचेवर जाणे झाले. गटचर्चांमध्ये भोवतालच्या विदर्भातल्या आत्महत्यांचा विषय निघणे अपरिहार्यच होते. झडलेली बोटे, गळलेले पंजे यांसह बहुविध शारीरिक विकलांगतेवर मात करीत शिस्तबद्धतेने आपापली कामे अत्यंत कुशलतेने पार पाडताना आम्ही इथल्या रुग्णांना पाहिले होतेच. विकास आमटेंच्या बोलण्यातही हा मुद्दा आला. ते म्हणाले त्याचा सारांश असा : समाजाने झिडकारलेली, आई, वडील, पत्नी,, मुले, यांना कायमची दुरावलेली ही माणसे. क्वचित कोणी भेटायला आले तर लांब उभे राहून भेट म्हणून आणलेली कपडा वगैरे वस्तू दुरूनच अंगावर फेकतात. या रुग्णांना ना मत देता येत, ना त्यांना रेल्वेने प्रवास करता येत, ना त्यांच्या मुलांना शाळा कॉलेजांत जाता येत. त्यांच्या अस्तित्वाचा अधिकृत पुरावाही राहिलेला नसतो. ती जिवंत आहेत की नाही ह्याची कुणालाही फिकीर पडलेली नसते. असे अपमानास्पद,कळाहीन,अस्तित्वहीन जीवन ते जगत असतात, पण आनंदवनाच्या इतिहासात गेल्या साठ वर्षात एकही आत्महत्या घडलेली नाही. कुठे तो देवाने दिलेले आयुष्य छोट्या छोट्या कारणांसाठी मिटवून टाकण्यामागचा पलायनवाद आणि कुठे ही चतकोर आणि कोरडी का होईना, पण स्वश्रमाची भाकरी खाऊन जगण्यातली विजिगीषा. बाबा आमटेंचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी  या दुर्दैवी लोकांमध्ये दुर्दम्य आशावाद जागवला. त्यांच्या जगण्याला प्रयोजन  दिले.   

विदर्भामध्ये अशा प्रकारचे कार्य अपेक्षित आहे. मध्यंतरी श्रीश्री रविशंकर महाराज यांनी आपली आर्ट ऑफ लिविंग ची काही शिबिरे या भागात घेतली होती. परंतु ते पुरेसे तर नाहीच, शिवाय  पूर्णपणे भौतिक मार्गांनी असे प्रबोधन व्हायला हवे. आध्यात्मिक मार्ग सर्वांच्या पचनी पडेल असे नाही. आणि केवळ विदर्भातले शेतकरीच नव्हे, तर अन्य आत्महत्याप्रवण समाजघटकांमध्येही असे प्रबोधन झाले पाहिजे. नुसती पॅकेजिस जाहीर करून आणि अर्थसाहाय्य देऊन हा प्र्श्न सुटणारा नाही.