..........................................
भान
..........................................
दुःखाचे ज्याला गाणे करता आले!
त्यालाच सुखाने जगता-मरता आले!
मोजून भलेही ताऱ्यांइतका पैसा....
आकाश कुणाला खिशात भरता आले?
विसरून कधीचा स्वतःसही गेलो मी...
- अद्याप कुठे पण तुला विसरता आले?
इतकेच फक्त मी गृहीत धरले आहे...
काही न कधीही गृहीत धरता आले!
मी रोज मनाच्या काठी जातो; येतो...
मज आत आजही कुठे उतरता आले?
त्यानेच जाणला समुद्र वरती-खाली...
बुडताही ज्याला तरता-तरता आले!
शब्दांचे जंगल तिने सोडले जेव्हा...
कवितेला माझ्या मुक्त बहरता आले!
ती स्वयंवरातच वृद्ध होउनी मेली...
नाहीच व्यथेला सुखास वरता आले !
सारीच रीत ही चुकली सांगायाची...
- हे भान कहाणी सरता-सरता आले!
- प्रदीप कुलकर्णी
...........................................
रचनाकाल ः ३० मे २०१०
...........................................