नायक :
सांग गौरांगी मला, तू कोठल्या भागातली?
... ... तू कोठल्या भागातली? ।
बघत असता तुजकडे मी, ठेच मजला लागली
... ... तू कोठल्या भागातली? ।ध्रु।
नायिका :
लेउनी उपवस्त्र रक्तिम, चैत्र पल्लवतो वनी
नायक :
धग कपोलांची तुझ्या गं आग लावी मन्मनी
नायिका :
पडतसे छाया तुझी जेथे जिथे
मार्ग माझा वळतसे तेथे तिथे
नायक :
वेशभूषा कोठली ही त्वां अशी परिवर्तली ।१।
... ... तू कोठल्या भागातली?
नायिका :
मार्ग सारे फिरुन, जाणे प्रियकराच्या केतनी
नायक :
गौरकांती, साद देती नुपुर तव दर वर्तनी
नायिका :
ऐकुनी मम पैंजणांचे गुंजन
नभतळी करते धरित्री नर्तन
नायक :
लपतसे मुखबिंब तव श्यामल विहरत्या कुंतली ।२।
... ... तू कोठल्या भागातली?
नायिका :
कर प्रियाचा शोधते मी नेत्ररंजन घालुनी
नायक :
रात्र ना, ना दिवस थांबे, मेघ व्योमग पाहुनी
नायिका :
दाटतो कोठे तिमिर; आभा कुठे
होतसे कोठे उषा; संध्या कुठे
नायक :
स्थान निश्चितसे विमुक्तांचे नसे या भूतली ।३।
... ... तू कोठल्या भागातली?
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे. (भाषांतराची अर्थपूर्णता (मला उमजलेल्या) मूळ गाण्याशी मिळती जुळती ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुधारणांच्या सर्व सुचवणींचे स्वागत आहे)
चालः भाषांतराची चाल मूळ गाण्याप्रमाणे नाही. भाषांतराचे वृत्त :
कडव्यातील छोट्या ओळी :
गालगागा गालगागा गालगा (मेनका)
इतर सर्व ओळी :
गालगागा गालगागा गालगागा गालगा (देवप्रिया)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...अली असे जमवा बरका (...तली असे जमवलेत तर फारच धमाल येईल.
यमकाची जागा ठळक केलेली आहेच.