गावोगावी
अगदी पहाटे पहाटे आम्ही दिल्ली मध्ये पोहोचलो होतो. रात्रभराच्या प्रवासाचा शीण तर होताच, त्यातही आमची ट्रेन ठरलेल्या वेळेपेक्षा अनेक तास उशीरा निघाली होती, त्याचा वैताग जास्त होता.
प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर काही कूली धावत आले होते. इतर प्रवासी पण होतेच. त्या सर्वातून वाट काढून, जरा गर्दी कमी असलेल्या जागी सर्वजण जमा झाले. मी कुतूहलाने तिथले दृश्य बघत होते. आमच्या पुण्याच्या मानाने सारेच भव्य होते. भाषा परकी, आणि माणसे पण वेगळीच वाटत होती. पहाटेची वेळ, हवेत चांगलाच गारठा होता. वेगवेगळे स्टॉल्स होते आणि त्याभोवती तुरळक गर्दी. काही वर्तमानपत्रे, मासिके घेत होते. काही जण चहा घेत होते, तर काहींचा नाश्ता चालला होता. एके ठिकाणी तर पानाच्या द्रोणातून चक्क जिलबी विकत होते. पिवळ्या केशरी, साखरेच्या पाकात माखलेल्या, रसदार जिलब्या, दिसत तर छान होत्या. परंतु लग्न, मुंजी इ. सारख्या कार्यात किंवा सणासुदीला केला जाणारा तो पदार्थ, असा रेल्वेच्या फलाटावर विकला जाताना पाहून, मला मात्र कसेतरीच झाले.
प्रत्येक पदार्थाची चव तर असतेच, पण त्याचे एक स्थान असते, आणि वेळही. ते पदार्थ तिथेच आणि त्यावेळीच शोभतात. जसे पावभाजी कितीही आवडत असली तरी, दसरा, दिवाळीला ती नाही चालत. त्यावेळी श्रीखंड, बासुंदीच पाहिजे. पालकपनीर, छोलेभटुरे कितीही चवदार असले, तरी गणेश चतुर्थीला, उकडीच्या मोदकांच्या जागी त्यांची कुणी कल्पनाही करू शकत नाही.
आग्र्याचा ताजमहाल बघून परत दिल्लीकडे प्रवास चालू होता. मध्येच काही कारणाने बस थांबली. सगळेजण खाली उतरले होते. बस सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. म्हणून तिथल्याच बाजाराची सैर करायची असे ठरले. विकत काहीच घ्यायचे नव्हते. बांगड्या, माळा, रंगीबेरंगी ओढण्या, रुमाल अशा काही वस्तू होत्या. अत्यंत स्वस्त परंतु उत्कृष्ट दर्जाच्या कातडी पर्सेस, आणि पादत्राणे देखिल होती. तिथे एकजण हातगाडी घेऊन उभा होता. "पकोडे लो .. पकोडे लो, " असे काहीतरी ओरडत होता. भजी, हा काही माझ्या आवडीच्या पदार्थांच्या यादीतला पदार्थ नाही. पण बरोबर असलेले सगळे जण म्हणाले, "चलो पकोडे ले लेंगे". मग मी पण एक पाकीट घेतले. तर काय? ते चक्क फिश पकोडे होते. आणि चव तर केवळ अप्रतिम. मनात म्हटलं " बरं झाले, इथे बस थांबली ते... " त्या भज्यांसारखी भजी, नंतर कधी, कुठेही मिळाली नाहीत, अगदी आजतागायत. घरी करून पाहिली, पण नाहीच.
तशी माझ्या पायाला काही चक्रं लागलेली नाहीत. म्हणजे मी सतत प्रवास करते असे काही नाही. किंबहुना मला प्रवासाचा योग फारच क्वचित येतो. म्हणजे वर्षातून फार तर एक किंवा दोन वेळा, आणि ते देखिल फक्त काही दिवसांसाठीच. परंतु जो काही थोडाफार प्रवास केला, किंवा घडला, त्यात काही खरोखरीचे अविस्मरणीय असे क्षण होते. पण त्याबद्दल मी लिहिणार नाहीये. गावोगावी अकस्मितपणे मिळालेल्या, अनवट चवींच्या पदार्थांविषयी काही सांगायचा मानस आहे.
कोंकणात गेलो होतो आम्ही सगळे. बरीच वर्षे झाली. त्या काळात खाजगी बस सेवा अजून फारशी विकसित झालेली नव्हती. प्रवासाची मुख्य साधने राज्य परिवहन किंवा रेल्वे. त्यावेळी कोंकण रेल्वे नव्हतीच. त्यामुळे एसटीचाच प्रवास.
गणपतीपुळ्यामध्ये एका घरात राहण्याची सोय केलेली होती. व्यवस्था अगदी साधीच पण चांगली होती. स्वैपाक नेहमीसारखाच. पण थोडेफार वेगळेपण जपणारा. लाल साळीचा भात, आमसूल घालून केलेली आमटी आणि गोड पदार्थ म्हणजे भरपूर साजूक तुपात न्हायलेले उकडीचे मोदक. आणि हे सगळे मोजून वगैरे नाही. जेवणारा 'पुरे' म्हणे पर्यंत यजमान आणि त्यांच्या सौ, वाढपाची पात्रे घेऊन तिथे थांबत असत. मग जेवण झाले की जेवणारा आपसूकच म्हणणार, "अन्नदाता सुखी भव".
गणपती दर्शन वगैरे करून तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही सगळे गेलो. अजिबात गर्दी नसलेला, शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा. दुपारची वेळ होती. उन्हामुळे समुद्राचे पाणी चमकत होते. किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या लाटांचा फेस उन्हात आणखीनच शुभ्रं दिसत होता. आम्हाला लगेच पुढच्या प्रवासाला निघायचे असल्याने फारसा वेळ नव्हता. पण समुद्रकिनाऱ्यावर येऊन कोरडेच परत फिरायचे, हे काहीतरीच. मग थोडावेळ तिथे घालवला. बंदिस्त, सुरक्षित तलावामध्ये पोहणे, आणि अगदी अनोळखी आणि अथांग अशा समुद्राच्या पाण्यात उतरणे, यात खूपच फरक आहे. परत यायला निघालो. पायाखालची वाळू चांगलीच चटके देत होती. परत येताना एक छोटेसे खोपटे दिसले. तिथे एकदोन पदार्थ, चहा वगैरे मिळत होते. मी पोहे घेतले. उकडलेले बटाटे घातले आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी दिलेले... अगदी नेहमीसारखेच. पण त्याची चव काही न्यारीच होती. त्यानंतर लहानशा पांढऱ्या रंगाच्या कप बशी मधून दिलेला लालसर चहा ... खरोखरीच अमृततुल्य.
रत्नागिरीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एक लहानशा क्षुधाशांती गृहाची आठवण अशीच मनात कोरलेली आहे. रस्त्याचे नाव वगैरे आठवत नाही. पण बऱ्यापैकी वाहता रस्ता होता. आणि आम्ही बसस्टॅंडकडे निघालो होतो हे आठवते. डगमगणारी लाकडी मेजे, आणि लाकडी बाक, थोड्याफार पत्र्याच्या खुर्च्या -- असे एकंदरीत स्वरूप आठवते. एक लहानच पण उभट स्टीलचा ग्लास, जरा पसरट तोंडाच्या स्टीलच्या बसक्या ग्लास मध्ये उपडा केलेला, असा तिथल्या एकाने मेजावर आणून ठेवला.
".... पण मला कॉफी हवीय. हे काय आहे ? " मी त्रासून म्हणाले.
"कॉफीच आहे ती", असं उत्तर मिळालं .
मी तो ग्लास उचलायचा प्रयत्न केला, तर गरम वाफेमुळे खालच्याला चिकटलाच होता. शेवटी निघाला. गरम फिल्टर कॉफी होती ती. त्या कॉफीचा स्वाद काही औरच होता. नंतर सिंगापूर मध्ये ' आनंद भवन' मध्ये साधारण तशीच कॉफी मिळाली . पण रत्नागिरीमध्ये घेतलेल्या कॉफीचा स्वाद, अजून आठवणीत आहे. पांढुरका फेस असलेली, ताजा ताजा दर्वळ असलेली, कडवट-गोडसर चवीची कॉफी कायमची आठवणीत राहिली आहे.
तशी मी कॉफीवर्गातील बाई नाही. चहा अतिप्रिय. परंतु काही वेळा कॉफी चांगली वाटते.
साखरपुडा झाला होता, आणि लग्नाला अजून ३-४ महिने अवकाश होता. त्यावेळी कर्वे रस्त्यावर एकेजागी फ्रूट ज्यूस, मिल्कशेक असे काही मिळत असे. लहानसेच दुकान. आणि त्याच्यासमोर दोन चार टेबले असत, इतकेच. तिथे आम्ही दोघे कधीकधी कोल्डकॉफी घेत असू. कॉफीचा मग भलामोट्ठा. मला संपता संपायचा नाही. तिथे १/२ चा पण पर्याय असे. पण तरी मग अर्ध्यापेक्षा पुष्कळच जास्त भरलेला असे. संध्याकाळच्या वेळी ती थंडगार, फेसाळ कॉफी खूपच छान वाटायची.
अशीच एक छान कॉफी मिळाली होती, इटली मधील फ्लोरेन्स शहरात. तिथल्या अरुंद गल्लीबोळात, आपल्या तुळशीबागेसारखीच लहान लहान दुकाने होती. रस्ते डांबरी नाही, तर चक्क तासलेले दगड वापरून केलेले. फिरून फिरून पायाचे तुकडे पडतील की काय असे वाटत होते. एक अगदी लहानसे रेस्तरॉ होते तिथे. म्हटलं इथे आपल्याला एकदम ऑथेंटिक इात्तालियन पिझ्झा मिळेल. पिझ्झाबरोबर आम्ही एस्प्रेसो कॉफी मागवली होती. तिथल्या वाढपीण बाईंनी आमच्या समोर, अगदी भातुकलीच्या खेळात शोभतील असे छोटे, पांढरे कप ठेवले. जेमतेम निम्मे भरलेले. अगदी काळीकुट्ट, आणि दाट कॉफी होती त्यात. म्हटलं हे असं काय आहे? ही कशी प्यायची. पण आता घेतलीच आहे, त्यामुळे 'आलीया भोगासी'.. म्हणत एक घोट घेतला. चक्क चांगली लागत होती. खात्री करण्याकरता दुसरा घोट घेतला. खरोखरीच अप्रतिम चव होती. मग मी तिथे असताना, जिथे कुठे जाऊ तिथे बाकी काही असो नसो, एस्प्रेसो नक्की घ्यायची.
तशी स्टारबक्स मधली कॉफी देखिल मला आवडते. जेव्हा भरपूर हिंडून फिरून दमायला झालेले असते, पाय दुखत असतात, उगीचच केलेल्या, निरुपयोगी (इति - पतिदेव) खरेदीचे ओझे झालेले असते, अगदी "पाऊल थकले... हातातले जड झाले ओझे", अशी अवस्था असते. अशावेळी गरम कॉफी (स्टारबक्स ची), एखादी लहानशी ब्राउनी,पेस्ट्री असे काही मिळाले की बरे वाटते.
आमच्या आधीच्या घराजवळ 'कॉफीबीन' नावाचे कॉफीशॉप होते. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी, आणि केक्स, ब्राऊनीज वगैरे मिळतात. आम्ही बऱ्याचवेळा तिथे जायचो. उंच, बुटके असे मग्ज चे प्रकार आणि त्यात वर डिझाइन केलेली कॉफी. कधी कधी, घरी देखिल मी गरम कॉफी करते. त्यावर फेस येण्यासाठी मग पासून जरा उंचावरून कॉफी ओतायची. किंवा मग मध्ये करायची असेल तर आधी साखर, कॉफी त्यावर थोडे गरम पाणी घालून भरपूर ढवळायची, आणि त्यावर उकळते दूध घालायचे. त्यावेळी कॉफीचा जो दरवळ येतो, त्याने ती कॉफी प्यायच्या आधीच ताजेतवाने वाटायला लागते.
तर असे हे कॉफी पुराण अजून बरेच लांबवता येईल... पण थांबते. पुढच्या गावी जायचे आहे ना?
आम्ही मद्रास (आताचे चेन्नई) मध्ये मध्ये थांबलो होतो. सगळंच नवखं होतं. भाषा तर कळतच नव्हती. खाणाखुणा आणि मोडकेतोडके इंग्लिश, या आधारावर जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न होता. ' सर्व मद्रासी (त्या काळात सर्व दक्षिण भारतीयांना सरसकट मद्रासीच म्हटले जायचे. ) इंग्रजी चांगली जाणतात, या आमच्या समजाला चांगलाच तडा गेला होता. आमचे राहण्याचे ठिकाण हे मुख्य रस्त्यापासून थोडे आत मध्ये होते. एक लहानशी गल्ली होती ती. ती जिथे संपत होती, तिथेच मुख्य रस्ता लागत होता. त्या गल्लीच्या टोकाला, एक टोपली, आणि काही डबे.. बहुदा पितळेचे असावेत, घेऊन एक माणूस इडली विकत होता. आम्ही पुण्याहून आलेलो. त्या काळी पुण्यात उडपी हॉटेलांचा इतका सुळसुळाट झालेला नव्हता. आणि जी थोडीफार असतील, तिथे आम्ही जायचोच नाही. कारण बाहेरच खाणे त्या काळी त्याचे "अप्रूप वाटावे", इतके क्वचित असे. पण आता बाहेरगावी, घरापासून दूर असल्याने, इडली घ्यायला हरकत नाही असे ठरले. इडली विकणारा, अगम्य भाषेत सतत काहीतरी बोलत होता. मग आम्ही खाणाखुणा करून "आम्हाला इडली हवी आहे," हे त्याला कसेबसे सांगितले. त्याने एका लहान ताटलीत, पांढऱ्या शुभ्र, गरम गरम इडल्या दिल्या, त्यावर अगदी पातळ सांबार आणि कसलीतरी चटणी होती. इडल्या इतक्या मऊसूत, अगदी रेशमी म्हणाव्यात अशा, आतपर्यंत जाळी असलेल्या आणि चांगल्या मोठ्या होत्या. चव देखिल सुरेख. सांबार, चटणी. सारेच चवदार. आमची त्या दिवसाची सुरुवात अशी रुचकर झाली.
दक्षिण भारतीय लोकं इडली, डोसे, उत्तपा, मेदूवडा वगैरे करतात त्याला खरोखरीच तोड नाही. वरवर बघणाऱ्याला वाटते, " किती सोप्पे आहे सगळं? नुसतं पीठ भिजवायचे. डोसा असेल तर तव्यावर, इडली असेल तर इडली पात्रात घालायचे की झाले. " पण तसं नाहीये ते. ते पीठ किती पातळ करायचे, त्यात उडीद डाळ, आणि तांदुळाचे प्रमाण किती असले पाहिजे. त्यातही तांदूळ विशिष्ट प्रकारचा असायला हवा. डोसा करताना एकावेळी किती पीठ तव्यावर घालायचे, म्हणजे योग्य त्या जाडीचा डोसा होईल, तवा किती तापलेला पाहिजे? इडली करताना पण, एकावेळी किती पीठ, ते किती दाट अथवा पातळ हवेेे? इ. तंत्र जमायला पाहिजेत. आजकाल मी घरी पण हे पदार्थ करते, पण दक्षिण भारतीयांची जी एक खास चव असते, ती त्यांनाच जमते. पूर्वी पुण्यात, बाजीराव रस्त्यावर " व्याडेश्वर भुवन" होते. अजूनही आहे ते. पण त्यावेळी अगदी साधेसेच होते. कधी कधी ( बहुदा रविवारीच) सकाळी, तिथल्या इडल्या घरी आणल्या जायच्या. नंतर नंतर बाहेरचे खाणे तितकेसे अप्रुपाचे राहिले नाही. पण ती मद्रासची इडली अजूनही मला आठवते.
अशा वैविध्यपूर्ण, रुचकर पाककृती, त्या सिद्ध करण्यासाठी करावे लागणारे कष्ट, करणारे स्वयंपाकी, आचारी, गृहिणी या सगळ्यांची संपूर्ण प्रक्रियेमध्ये असलेली गुंतवणूक, हे सर्व पाहिल्यावर "अन्नं हे पूर्णब्रह्म" असे का म्हणतात, ते समजून येते. आणि म्हणूनच भोजनाचा प्रारंभ करताना आधी परमेश्वराचे आभार मानायचे, आणि मग म्हणायचे "उदर भरणं नोहे - जाणिजे यज्ञकर्म".
(क्रमशः)