फाउंटनहेड - कथा ३

हेन्री रोर्कला अत्यंत भावविव्हल होऊन त्याच्या आडमुठ्या, आत्मघातकी स्वभावाला आणि तारुण्यसुलभ अशा दांडग्या उत्साहाला आवर घालण्यासाठी स्वतःच्या जीवनाची झालेली दुर्दशा आठवतो. आणि हा वेगळेपणाचा, व्यक्तीवादाचा आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहण्याचा हेका सोडून दे अशी गळ घालतो.


रोर्क त्याला निर्विकारपणे विचारतो "मला उपदेश करतो आहेस, विन्मुख करण्याचा प्रयत्न करतो आहेस, तू स्वतः तसं केलंस का?" हा प्रश्न ऐकून हेन्री अत्यंत रागावतो. पण रोर्कने हा प्रश्न का आणि कशासाठी, किती तळमळीने विचारला ह्याची त्याला जाणीव असते.


तो रोर्कला सांगतो "तू किती चांगला स्थापत्यविशारद आहेस हे मी तुला सांगायची गरज नाही, पण तुझ्या डोक्यात हे जे खूळ भरून घेतलं आहेस, त्याने तुझं नुकसानच होणार आहे. माझे अनुभवाचे बोल ऐक, मी ज्या चुका केल्या त्या तू करू नकोस. समाज तुला तुझ्या कलेची कदर न करता तुला तुझ्या कलेचा, तुझ्या गुणांचा शाप असल्यासारखं वागवेल. पोटाची खळगी भरायला केवळ उच्च विचार आणि तत्त्वं पुरत नाहीत.


चारचौघांमध्ये तुझा पदोपदी अपमान होईल, तुझेच विचार, कल्पना चोरून तथाकथित प्रथितयश व्यक्ती समाजासमोर, त्यांच्या कंपूत तुला शिवीगाळ करतील. स्थापत्यशास्त्रातील अबकड ही माहित नसलेली माकडं महान स्थापत्यशास्त्रावर भाषणं झोडतील आणि तू ह्या सगळ्याचा असहाय्य, मूक साक्षीदार बनून राहशील.


वेळेवर जागा हो, तुझा मार्ग बदल, नाहीतर तुझा शेवट माझ्यासारखा होईल."


हे सगळं ऐकून रोर्क त्याला म्हणतो "माझा मार्ग बारा वर्षांपूर्वीच मी नक्की केलाय, त्यात आता बावीसाव्या वर्षी मी नाही बदल करणार. आणि जर मी तुझ्या जवळपासही पोहोचू शकलो तरी माझा प्रवास, माझा लढा यशस्वी झाला असं मी समजेन. त्यातच मला धन्यता वाटेल."


मित्रांनो, वाचायला हा प्रसंग खूप सोपा आणि भारलेला वाटतो. पण त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर दोन समविचारी माणसांची एक वैचारिक झुंज इथं पहायला मिळते. एकाने समाजाच्या हिंस्त्र श्वापदापुढे हार पत्करली आहे, तर दुसऱ्याला त्या श्वापदाच्या अस्तित्त्वाचीही फिकीर नाहीये. त्याला आपल्या मार्गात काही अडथळे निर्माण होऊच शकत नाहीत असं वाटतंय. आलेच तर काही तात्पुरते व्यत्यय येऊ शकतील, पण त्यांना घाबरून मार्ग बदलण्याची त्याची अजिबात तयारी नाहीये. समाजाच्या यशापयशाच्या मापदंडांवर त्याला स्वतःची किंमत करून घेण्याची इच्छा नाहीये. इथंच रोर्कचं व्यक्तीमत्व हेन्रीला ओलंडून पुढे जातं.


ह्याउलट पीटर सतत कपटं करून, इतरांविरोधी कामं करून, त्यांचं, त्यांच्या भोळेपणाचं, दुबळेपणाचं भांडवल करून, अहित करण्यात आणि त्यात स्वतःचं हित साधण्यात गर्क आहे. फ्रँकनच्या कार्यालयात कामाला लागल्यापासून स्वतःला इतरांच्या आकर्षणाचं केंद्र बनवून घेण्यात तो यशस्वी झालाय. त्या कार्यालयातील सगळ्यांबरोबर त्याचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहेत, अर्थात स्वार्थासाठीच.


जेणेकरून इतरांचे दोष साहेबाला नीट कसे दिसतील, आणि त्या दोषांचं निराकरण आपण कसं सहज आणि निःस्पृह पणे केलं हे साहेबाला दाखवून देता येईल ह्यावर त्याचं लक्ष आहे. कार्यालयातला मुख्य ड्राफ्टसमन टिम डेव्हिस हा त्याचं पहिलं लक्ष्य आहे. आपल्या कारकीर्दीतला पहिला अडथळा ह्या रूपात तो त्याला पहातोय, आणि त्याचा काटा कसा काढता येईल ह्यासाठी त्याची बुद्धी खर्च होतेय.


टिमशी त्याची एकदम खास मैत्री आहे. टिमचं नुकतंच लग्न झालंय, त्यामुळे त्याचं कामात फारसं लक्ष नाहीये. पीटर अगदी भाबडेपणाने त्याची कामं स्वतःच्या अंगावर घेतो, अगदी साळसूदपणे. सुरूवातीला ही गोष्ट लपून छपून होत असते, पण पुढे पुढे कार्यालयातील क्लॉड स्टेंगेलही सरळसरळ टिमची कामं पीटरकडे सोपवू लागतो. ह्या सगळ्यात पीटर ओझ्याचं गाढव असल्याचा आव आणतो, आणि त्याला भुलून टिमही त्याचं कौतुक करतो. पीटर त्याच्या साहेबाशी एकदम जवळीक साधून आहे, त्यामुळे टिम त्याला अधून मधून आपली मखलाशी बॉसजवळ कर असं सांगत असतो.


पीटर अर्थातच त्याच्या स्वभावाप्रमाणे साहेबाला सांगतो "हे काम ना? खरं तर टिमने करायला हवं होतं वेळेवर, पण काय करणार? त्याला त्याच्या नव्या नवरीमधून वेळ मिळेल तर ना?" असं बऱ्याच वेळा होतं, आणि पीटरवर जवळपास पूर्णपणे अवलंबून असणारा गाय फ्रँकन शेवटी टिमला कामावरून काढून टाकतो. टिमला खरी गोष्ट कधीच कळू न देण्याची काळजी घेऊन उलट पीटर त्याच्यासाठी एका दुय्यम दर्जाच्या कार्यालात नोकरी मिळवून देतो. आणि त्याच्या ह्या दिलदारीवर खूश होऊन टिम त्याचे गोडवे गात राहातो!


अर्थातच टिमची रिकामी झालेली जागा भरण्यासाठी गाय फ्रँकनला पीटरच्या योग्यतेचा दुसरा कोणी मिळत नाही हे सांगणे न लगे!


अशा प्रकारे पीटरची वाटचाल समाजाची मान्यता प्राप्त करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा विश्वासघात करून, दगाफटका करून सुरू होते.


ह्याउलट रोर्क, ज्याला समाजाकडून सर्वाधिक धोका आहे, त्याला समाजाची आणि त्यातल्या खलनायकांची अजिबात फिकीर नसते...


क्रमशः.....