थैली बघून माझी गळतात सर्व बाणे
सुटती सुरेल ताना जाता फटीत नाणे
लावून पैज मारे घोकीत ग्रंथ होते
ऐकून नांव माझे ते झोपले उताणे
केकाटतात कोणी, कोणी सुरात गाती
सार्याच पोपटांना मी फेकतोय दाणे
कुंथून कैक वर्षे केला रियाज त्यांनी
वा! मैफलीत त्यांच्या मी घालतो उखाणे
का कौतुके जुईला त्या मूर्ख मोगर्याची?
सार्या वनस्पतींचे विकतात बीबियाणे
चुचकारुनी प्रजेला गोठ्यात बंद केले
ते घालती महात्मे माझीच पायताणे
तो ध्यास! ती सचोटी! ते कष्ट! स्तोत्र चाले
तिसर्या पिढीत आता आहे बसून खाणे