राहू नकोस गाफिल की अंगणात आहे
आहे तरू तुझा पण तो पारिजात आहे
साऱ्या परीकथांचा शेवट सुखान्त नसतो
संसारसौख्य कोठे राणीवशात आहे
आकाश-सागराचा क्षितिजी मिलाप जैसा
आभास तोच अपुल्या सहजीवनात आहे
फेकून वास्तवाला स्वप्नाश्व उधळवावा
हा अश्वमेध ज्याच्या-त्याच्या मनात आहे
एकेक ओळ येते फोडून ऊरपर्वत
बेबंद भावनांचा लहरी प्रपात आहे
हल्ली कमीच होते काव्यात व्यक्त मानस
सूर्यास्त लेखनाचा दृष्टीपथात आहे
ठेवून शब्द मागे अस्तास 'भृंग' जाऊ
एका मुक्या तमाची काळी प्रभात आहे