आठवणींचे झाड

माणसे जगात येतात, संपर्कात येतात , आयुष्यात येतात आणि एके दिवशी निघून जातात. मागे रहातात फक्त आठवणी. या आठवणी म्हणजे माणसांनी दुसऱ्याच्या मनात मिळवलेला एक छोटासा कप्पा वा कोपरा. जगातील प्रत्येक मनुष्य एकदा तरी मनात ही अपेक्षा करतोच की माझ्यानंतर माझीही कुणी तरी आठवण काढावी. प्रत्येकातील 'मी' ची हीच धडपड असते.


आठवणींचे झाड


ऊन- सावलीचा खेळ पाहीला


आनंदाचा लुटला ठेवा


मी जेव्हा जाईन येथून


आठवणींचे झाड लावा



आठवणींचे झाड रोज


उठत नाही लहरुन


कधी तरी एकांतात


अचानक येते बहरुन


मनाच्या मातीमध्ये


हे झाड रुजते


जिव्हाळ्याच्या पाण्यानेच


याचे मूळ भिजते



ऋतू नसतो फुलण्याचा


याचे प्रत्येक फुल वेगळे


बहर कधी संपत नाही


जरी आयुष्य संपते सगळे


आठवणींच्या झाडावर


काही पक्षी येतात असे


ठेवून जातात मागे


आपल्या अस्तित्वाचे ठसे



करतात घरटे झाडावर


काडी काडी सावरुन


उडून जातात एके दिवशी


खेळ आपला आवरुन


बहरासारखे येतात पक्षी


निघून जातात दूर गावा


परतून पक्षी येण्यासाठी


आठवणींचे झाड लावा


                                      -(आवरणारा ) अभिजित पापळकर