मला आवडलेले काही मृत्यू

या ना त्या कारणाने मृत्यू हा विषय ' मनोगत' वर घोटाळत आहे.


चित्रपटातले मृत्यू हा एक मनोरंजक विषय आहे. मला आवडलेले चित्रपटातील काही मृत्यूः


१.'आनंद'  - स्वतः मृत्यूच्या दारात असताना इतरांना जगायला शिकवणारा आनंद. नकळत त्याच्यात गुंतत गेलेला बाबूमोशाय. आपला मृत्यू बाबूमोशाय सहन करू शकणार नाही म्हणून आयुष्याची भीक मागणारा आनंद. तर्क विसरून काही 'मिरॅकल' घडेल म्हणून वेड्यासारखी धावपळ करणारा बाबूमोशाय. हताश, असहाय डॉ. प्रकाश कुलकर्णी. गरगर फिरणारी टेप. 'बाबूमोशाय....' आनंदची शेवटची आर्त हाक. आनंदच्या मृत शरीरावर पडून गदगदून रडणारा बाबूमोशाय....


२. 'नमकहराम' - भयाण वास्तव पचवता न आल्याने दारूचा आश्रय घेतलेला शायर. पाऊस. दोस्तीची कसम निभावणारा त्याचा दोस्त. अखेरचं गाणं - मैं शायर बदनाम.. 'ऍन्ब्युलंस आ गयी'... शायराचा शेवटचा श्वास...


३. 'विरासत' - पंचायतीत अपमानित होऊन ताडताड घरी चालत येणारा मुखिया. छातीत अस्वस्थ वाटतंय...भेदरून बघणाऱ्या नाती... मुखिया हळूहळू निवळतो.. नातींना जवळ घेऊन गोष्ट सांगू लागतो.. नाती त्याचं अंग चेपताचेपता गाणं म्हणू लागतात.... मुखियाच्या छातीतून जबरदस्त कळ येते.. पायाशी ठेवलेलं भांडं खणखणत खाली कोसळतं...लाडक्या मुलाची शेवटची हाक....'बाबूजी......'


असे आणखी काही मृत्यू वाचायला आवडतील.....


सन्जोप राव