नको आयुष्यभर कामातली आखीव लाचारी

नको आयुष्यभर कामातली आखीव लाचारी
भले जन्मास आलो फक्त मी घेऊन बेकारी


कशाला यौवना राहू तुझा आजन्म अभिलाषी?
उद्याला वासनाही आजची होणार म्हातारी


कसा खोळंबलो मी उंबऱ्यापाशीच भीतीने
तपासाने किती भांबावलो मृत्यो तुझ्या दारी


कुठे ती पुण्यकर्मे आणि गोष्टी चित्रगुप्ताच्या
कसे हे भेटले नरकामधे सारे सदाचारी?


सजा भोगून तू सुटलास देहा मी कुठे सुटलो?
तुला उःशाप मृत्यूचा व मी आजन्म आजारी


जरी शब्दाळलेल्या काव्यपंक्तींचे हसे झाले
कवी मी कोडगा राहीन शब्दांच्याच आहारी


- माफी


नीलहंस ह्यांच्या नको आयुष्यभर नात्यांतली घोटीव लाचारी वर आधारित