जंजाळ

दिवस आले भरत पुन्हा जणू गर्भार सांबाचे
पुराण्या यादवीला आजचे संदर्भ कोणाचे

कुरुक्षेत्रे पुन्हा भरली तिच्या तृष्णेस शमवाया
भराया वैष्णवी लागे पुन्हा घट आज रक्ताचे

कुणाचे हात मागू मी*, दिसे दातृत्व दात्यांचे
जसे देणे अनिच्छेने कुणा भेगाळ हौदाचे

सहाणीवर अपेक्षांचे किती चंदन उगाळावे
किती चर्चू तरी पुसणार नाही लेख भाळाचे

नको ढाळूस नक्राश्रू अशी माझ्या चितेवरती
पुरे ही आग जाळाया, नको वर दाह थेंबाचे

जिव्हारी लागले माझ्या तिच्या शब्दातले काटे
तिच्या नजरेतल्या ज्वाळा, तिचे हत्यार मौनाचे

कशाने लाजरीची ह्या मिटाया लागली पाने
नको वाटे तिला बहुधा पुन्हा जंजाळ स्पर्शाचे

* - संदर्भ - विंदा ह्यांची 'देणाऱ्याने देत जावे..'