माणूस नावाचा बेटा-३

दत्तू ताबडतोब शाळेतून निसटला. बाहेर आकाश पिवळ्या काजूप्रमाणे दिसत होते. घरे, सतत हालचाल करीत चालणारी गर्दी, माडीच्या खिडक्यांची तावदाने ही सारी पिवळ्या फिल्टरमधून पाहिल्यासारखी दिसत होती. त्या पिवळसर तरल वातावरणात पाचदहा मिनिटे चालल्यानंतर दत्तूच्या मनावर एका आकर्षक अलिप्ततेची छाया पडली. जणू काही त्याने आपले लागेबांधे गुंडाळून कोपऱ्यात ठेऊन टाकले. हे सारे काय आहे? रस्त्याने तेलाची पिंपे घेऊन एक बैलगाडी जात होती. एक बैलाची हाडे कातडयावर स्पष्ट टचटचीत दिसत होती व मानेवर लालसर मास दाखवणारे आवाळू होते. गाडीवाल्याने पाठीच्या कण्यावर खटदिशी चाबकाची काठी मारली, की बैल सारे अंग धनुष्याप्रमाणे वाकवी, हाडांचा भाता पिंजारे व जू जास्तच त्या ओलसर मासात रुतत असे.  रस्त्याच्या कडेला विलायती चिंचांचे चार ढीग मांडून बसलेली म्हातारी, गळ्याभोवती टेप टाकून कात्रीचा आवाज करीत कापड कापणारा शिंपी, हातावर पातळाचा पोत पहात असतानाच पायाच्या अंगठ्याने पिंढरी खाजवणारी कापडदुकानातील तरुणी, नवीन फ्रेम घातलेला फोटो हातात घेऊन रस्त्यातच पहात उभा असलेला माणूस, गाडीखाली झोपलेले कुत्रे, एका परसात कुंपणाला उमललेली द्राशाळाची लाल फुले, देवळाच्या कोपऱ्यात एकटीच बसलेली, लाल नेसलेली विधवा स्त्री, गटारातून वहाणारा पाण्याचा काळा पाट आणि साऱ्यावर विशाल वस्त्राप्रमाणे दिसणारा पिवळसर गुजरी प्रकाश -काय आहे हे सारे? आणि हे पाहात असलेला दत्तू तरी कोण? त्याचा कोट आखूड आहे, त्याच्या खिशात दोनचार आणेही नसतील. त्याचे मन आंबले आहे. तो हे सारे पहातो आहे. तो हे पाहात आहे हे कुणी तरी पाहात आहे, आणि तो हे पाहात आहे हे कुणी पाहाते, हे पाहाणारे कुणी...
पण ही भावना फार वेळ टिकलीच नाही. वाऱ्याने दूर गेलेले ओलसर वस्त्र पुन्हा येऊन अंगाला चिकटल्याप्रमाणे सारे जीवन त्याला चिकटले. त्या गुंतवळ्यात तो सापडला. त्याला प्रथम आठवण झाली ती चहाची.त्याने चहासाठी गड्याला पाठवले होते हे खरे, पण त्या मदलूरापासून सुटण्यासाठी तो धावत सुटला होता. पण चहाची कळ विरली नव्हती. नकळत खिसा चाचपीत तो बाजूच्या हॉटेलमध्ये शिरला. आत शिरत असतानाच कुणीतरी त्याच्या पाठीवर थाप मारली, व चोरी करत असता पकडल्याप्रमाणे तो उगाचच वरमला, आणि त्याने बाजूला पाहिले. फोडाफोडाच्या तोंडाचा, बोटभर दाढी वाढवलेला नाईक तोंडात एकेक शेंगदाणा टाकीत त्याच्याकडे पहात होता. त्याने खिशात हात घालून फक्काभर दाणे दत्तूपुढे केले व तो घेणार की नाही याची वाट न बघता पुन्हा खिशात ठेवून दिले.
"काय जोशीबुवा, आज रमी नाही वाटतं? " त्याने विचारले. शब्दाबरोबर शेंगदाण्याचा  वास बाहेर आला.
"कुठली रमी नि काय! काल आमचं झालं ना चर्र!" गळ्यावरून बोट फिरवीत दत्तू म्हणाला. "अहो, काय साली पानं आली. बदाम राजाजवळ किलवर राणी, तर चौकट अठ्ठ्याजवळ इस्पिक दुरी! यात काय सीक्वेन्स होणार कपाळ? साडेचार रुपये गेले काल धस्सकन. तेंव्हा म्हटलं बाई रमी! हीच तू सोडचिठ्ठी समज." दत्तू हसला. "बरं काही चहा घेणार?"
उदासपणे नाईकाने मान हलवली, व बाजूला उभ्या असलेल्या आपल्या अल्सेशिअन कुत्र्याकडे पाहिले. जवळजवळ तीन फूट उंच असलेला त्याचा धिप्पाड पण अशक्त कुत्रा त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत असल्याप्रमाणे उभा होता.
"आता प्रकृती कशी काय आहे?" दत्तूने विचारले. गेले कित्येक महिने नाईकचा सासरा आजारी होता. नाईक आपल्या सासऱ्याचा किती मिंधा आहे हे दत्तूला माहीत होते. त्याच्यामुळे त्याला नोकरी मिळाली होती, रहायला घर होते. सासऱ्याने घालायला शर्ट घेतला की बटणे लावायला लाचारीने नाईक पुढे होत असे. किंग हा नाईकचा अल्सेशिअन व नाईक सासऱ्याचा! पण बिचारा फार चांगल्या स्वभावाचा. सर्वांना शेंगदाणे द्यायचा, फुकट सिगारेट वाटायचा, गाढवासारखे खेळून पैसे देऊन जायचा. क्लबमध्ये रोख पैसे देणारे लोक फारच थोडे होते.
"प्रकृती होय? काही विशेष सुधारणा नाही हो," चिंबलेल्या आवाजात तो म्हणाला, "दररोज दवाखान्यात न्यावं लागतं, पोटातलं पाणी काढावं लागतं. टिकेलसं वाटत नाही."
दत्तू दचकला. त्याने आश्चर्याने विचारले,"पाणी काढावं लागतं? पण तुम्ही तर म्हणत होता की सासऱ्याला ब्लडप्रेशर आहे म्हणून!"
"सासरे गेले खड्ड्यात!" तो वैतागाने म्हणाला, "मी माझ्या किंगविषयी बोलत होतो. मटन घातलं, फिश दिलं, सारं करून झालं. आता तो येतो, माझ्याबरोबर हिंडतो फिरतो. पण महिना दीड महिन्यात खलास होणार. जोशीबुवा, तुला आश्चर्य वाटेल, लहानपणी आमच्या घरी एक वेडसर मोलकरीण होती. तिच्यानंतर मला जवळ करणारा हा किंगच-"
त्याने सुस्कारा सोडून किंगकडे पाहिले. जणू आताच त्या उमद्या भव्य कुत्र्यावरून कातडे मास गळून फक्त सांगाडा उभा होता! आपली पहिली मुलगी भारती तीन वर्षे घरदार नाचली. नंतर तिचे निळसर डोळे, मऊ केस, नितळ एवढीशी पावले नाहीशी झाली. किंग, भारती, खड्ड्यात जाणारा सासरा, उघड्या पडलेल्या छातीचे दादा, लाल पातळाची सुलभा - सगळाच एक सांगाड्यांचा प्रचंड घोळका आहे. सगळेच जण शेवटी सांगाड्याचे पोस्टडेटेड चेक्स.
नाईकाला सोडून दत्तू आत शिरला. साऱ्या स्पेशल खोल्या भरल्या होत्या. म्हणून तो बाहेरच एका टेबलावर बसला.त्याच टेबलावर दाढी वाढलेला एक माणूस ब्रेडचे कचाकचा लचके तोडून उसळीत बुचक बुडवून खात होता. ठिकठिकाणी मचामचा हलत असलेली निरनिराळ्या आकाराची तोंडे होती. बावळट, अधाशी, कंटाळलेली, उंदरासारखी, उंटासारखी, हजार ठिकाणी चेपलेल्या कचरापेट्यांसारखी; पोरे मध्येच हातात प्लेटी घेऊन त्यामधून सरळ खरकल्याप्रमाणे हिंडत, वेदनेप्रमाणे ओरडत. ती पाचपन्नास तोंडे बकाबका खात असता, त्या किडक्या, वेड्यावाकड्या, पिवळसर दाताच्या मचमचगिरणीने दत्तूची भूक पार मेली. मानवता, मानवता म्हणून आपले प्रेम ज्या वेळी ओतू जात असते त्या वेळी बहुदा आपण प्लॅटफॉर्मवर किंवा टेबलाजवळ असतो. शंभर माणसे काहीतरी खात असता त्यांच्याकडे पहा किंवा एका दुपारी थर्डक्लासमधून घामट मासाच्या ढिगाऱ्याबरोबर दोन तास प्रवास करा. उतू जात असलेले प्रेम एकदम पोट उमळून बाहेर येते. या सगळ्यावर एका झटक्यात बंधूप्रमाणे प्रेम करायचे? सारे आपले बंधू? कंबर खाजवीत, तोंडात चिवडा भरीत असलेला तो कोपऱ्यातील माणूस? स्पेशल खोलीत जेवताना भात मळून, बोटांच्या फटीतून बाहेर काढणारा, कोपऱापर्यंत हात राड करून अन्नाचे गोळे धपाधपा तोंडात टाकणारा, काळा माणूसही? छ्ट! दत्तूने मान हलवली. हे काही आपल्याला जमणार नाही. काय साम्य आहे असल्यात आणि आपल्यात? निव्वळ ऐंद्रिय आवडीतही सारखेपणा नाही. एकाच्या उग्र अत्तराने डोके भणभणते, एकाची लालभडक आमटी पाहून घेरी येते, एकजण थुलथुलीत, ढिसाळ बाई पाहून विरघळतो, तर दुसऱ्याला तिचामुळे वैराग्य वाटते! एकाच पित्याची लेकरे. बॅह! आणि बुद्धिवंतांचे ते बिनहाडामासाचे भूतपोर विश्वमानव - त्याला तर आपल्याकडून एक नया पैसाही मिळणार नाही. सॉमरसेट, चर्चिल, अर्नेस्ट, अहमदअली, ओंकारप्रसाद, नारायणस्वामी, चँग फू चुंग ही माणसे आपल्याला आवडतील, न आवडतील, पण या रक्तमांसरहित विश्वमानवावर प्रेम काय करायचे डोंबल! मग लेको, त्याप्रमाणे विश्वस्त्रीशी संभोग करा! छप्पन्न इंच ऐसपैस पन्ह्याचा हा विश्वप्रेमाचा तागा काखोटीस मारून देशादेशात लंगोट्या वाटीत हिंडणे हे काही आपल्याला जमणार नाही. त्याबद्दल पुन्हा विचारच नको, अशा अर्थाने दत्तूने पुन्हा मान हलवली.