ह्यासोबत
थोड्या वेळाने तो रस्त्याला आला, व त्या नेहमीच्या गर्दीत त्याला स्वतःपासून सुरक्षित वाटले. चौकात तो नेहमी जेथे पुस्तके घेत असे, तो बुकस्टॉल होता. सहज जाता जाता त्याने शोकेसमध्ये 'पेटन प्लेस' हे पुस्तक आहे की नाही पाहिले. होय, ते अद्याप तिथे होतेच. ते त्याला फार दिवसांपासून विकत घ्यायचे होते. पण पूर्वीचे दहा रुपये दिल्याखेरीज पुन्हा उधारी मिळेल की नाही याची त्याला शंका होती. त्या पुस्तकाचा विचार करीत असतानाच त्याने कपाळावर हात मारला, व सुटकेचा मार्ग कुठे आहे की काय हे तो हताशपणे पाहू लागला. पण आता फार उशीर झाला होता. ......पुढे
तिने त्याला आधीच पाहिले होते. खांद्याला अडकवलेली पिशवी हिंदकळत वसंतकुमारी साठे मांसाच्या हप्त्याहप्त्याने दुकानातून खाली उतरली. " वा, छान, बरी भेट झाली!" तिने खुळ्यासारखी टाळी वाजवली व पोते फिसकल्याप्रमाणे ती हसली."मी तुम्हाला मुद्दामच भेटणार होते". दत्तू हसला. उगाचच नाईलाजाने. वाटीभर पेजेसारखा. पण त्याच्या मनावर विषण्णतेचे शिंतोडेही उडाले. वसंतकुमारी कॉलेजमध्ये फार स्मार्ट दिसायची, व्हरांड्यातून ती टकटक सँडल्स वाजवीत चालली की दत्तूसारख्या पोरांच्या मनात आयंबिक पेंटमिटरमध्ये आडपडदा नसलेली इच्छासुनिते उमटायची. ती कशीबशी बी.ए. झाली. तोपर्यंत तिच्या प्रत्येक भागाला स्वायत्तता मिळाल्यामुळे ते मांसमोकाट वाढून बसले. तिच्याकडे पाहून आता दत्तूला शरमल्यासारखे वाटले. तिच्यासाठी. त्याला वाटले, पुरुषाने जगावे पैसा असेपर्यंत व स्त्रीने तारुण्य असेपर्यंत. ज्यूलिएट, लैला ही नावे सुगंधी होऊन बसली याचे एकच कारण. त्यांना जगावे कसे हे समजले होते की नाही, कुणास ठाऊक, पण मरावे केंव्हा हे नक्की माहीत होते. चार रडक्या पोरांचा लबेदा घेऊन एखाद्या फंड गोळा करायला निघालेल्या ज्यूलिएटची नुसती कल्पना तरी करून पहा! खरे आयुष्य सुरु झाले की त्यातील काव्य आधीच खलास होऊन गेले असते.
"तर काय?" दत्तू म्हणाला. वसंतकुमारी त्याला काहीतरी सांगत होती. पिशवीतून एक पुस्तक काढून त्याला दाखवीत होती. तो तिच्या कवितांचा संग्रह होता. भर दुपारी पिंपळ सळसळतो, हृदयातील कळ लाल जागवते, आभाळाच्या निळ्या स्मशानी भूत पहाते मी भविष्याचे, महात्मा गांधींचा मृत्यूदिन, ये सुभाष राजसा इत्यादि. मोठ्या सामाजिक विषयांपासून आपण अलिप्त नाही हे दाखवण्यासाठी दोनचार असले विषय. नद्यांना दिलेल्या आमंत्रणाप्रमाणे. बाकीचे नाजूक शब्द शिंप्याच्या दुकानात गोळा केलेल्या रेशमी चिंध्या. आकर्षण पण रिकामे, परंतु ते क्षणभर लक्ष वेधीत. झकपक पोषख केलेल्या चार बायका कुठे जात आहेत हे माहीत नसताही क्षणभर त्यांच्याकडे वळून पाहतो त्याप्रमाणे व तेवढेच.
"सध्याच्या या यंत्रयुगात संस्कृतीप्रेम, कलासक्ती टिकवण्याचं काम आपल्या मध्यमवर्गीयांवर आहे, असं नाही तुम्हाला वाटत?" वसंतकुमारीने लाडीकपणे डोळे मोठे केले. रेनकोटच्या बटणाप्रमाणे. नखरा पूर्वीचा, पण तो या मासाच्या ढिगावर ठेवला होता. तो कवितासंग्रह दत्तूने विकत घ्यावा ही तिची इच्छा. दर पुस्तकामागे तिला सहा आणे मिळणार होते. त्यावर कणकेच्या गोळ्यातील अळीप्रमाणे जगून तिचा आत्मा कलाप्रेम पसरवणार होता. कव्हरवर दहा वर्षे व पन्नास पौंड यामागचा आकर्षक फोटो छापला होता. तिच्या तारुण्याचा तो गुळगुळीत प्रिंटवरील मृत्यूलेख होता.
दत्तूने काव्यसंग्रह विकत घेतला नाही. वसंतकुमारीने पुस्तक पिशवीत ठेवले व ती त्याच्याबरोबर चालू लागली.
"यानंतर मी एक चरित्र लिहायला घेणार आहे. नंतर कादंबरी. त्यांची वर्गणी आजच भरली तर ती अर्ध्या किमतीला मिळतील.अशोक प्रकाशनची ती नवी योजना आहे." चालता चालता ती सांगू लागली. "आपल्या हाती आहे, तेवढं कार्य करायचं"
तिच्याविषयी वाटणाऱ्या अनुकंपेमुळे दत्तू फार चिडला व फाडदिशी तिच्या मुस्कटात द्यावी असे त्याला वाटले. ओबडधोबड आयुष्य जिला कधी बोचले नाही, खुपले नाही ती मानभावीपणाने समाजाला जीवनदर्शन घडवणार! आईच्या अंगाशी चिकटून बसलेल्या त्या छोट्या मुलीच्या मूकपणात दहा पुस्तके भरून राहिली आहेत!
त्याने कसाबसा तिचा निरोप घेतला. आणखी कुणा एका गणा रामा पंच्याहत्तरीचे चरित्र म्हणताच त्याच्या पोटात ढवळू लागले. मराठीतील चरित्रे पाहिली की महाराष्ट्रात सगळे सद्गुणांचे राक्षसच जन्माला आले की काय असे वाटावे! आमच्या साऱ्या मोठ्या लोकांना सद्गुणाची एक जाडजूड व्हेरिकोज नर्व्ह झालेली. सारे आयुष्य साफ गिलावा केलेली चिरेबंदी. बनावट. कुठे फट नाही, खळगा नाही. आताच दत्तूला वसंतकुमारीच्या चरित्राचे स्वरूप स्पष्ट दिसू लागले.
आमचा चरित्रनायक लहानपणी फार हूड ( केवढे कौतुक! लहानपणी बेडरपणे करवंदे शोधणारा, किंवा गटारात होड्या सोडणारा पोरगा चक्क पुढे रावबहादुर झाला, गावातील प्रत्येक टमरेल ज्याच्या कारखान्यात तयार झाले असा मोठा टिनपाट कारखानदार झाला इ.). बरे, ते पोर लहानपणी अगदीच बावळट असेल, आपल्या बरोबरीच्या मुलींची पोलकी ताठ तटाटू लागलेली पाहून त्यांनी सॅनफोराईज्ड कापड वापरावे असा सल्ला देण्याइतके मद्दड असेल तरी लेखकाचे जेहत्ते ह्यॅ ह्यॅ असतेच! ' पुढील मोठेपणाची बीजे लहानपणी दिसलीच. शेजारच्या कावेरीच्या बाहुलीचे लग्न असता त्याने नि:स्वार्थीपणे आपली सोवळ्याची लंगोटी लुगडे म्हणून देऊन टाकली. नंतर वडीलांसमोर उभे राहून अत्यंत धैर्याने त्यांनी ती गोष्ट मान्य केली. वडीलांना या गोष्टीचे इतके कौतुक वाटले की त्यांनी दुसरी लंगोटीदेखील खिडकीतून बाहेर फेकून दिली. पान अट्ठेचाळीसवरील मुंजीत काढलेल्या फोटोत ती लंगोटी स्पष्ट दिसत आहे.' मग अशाच वाती तीनशे पान वळल्या जातात. नंतर चरित्रनायकाचा आत्मा अनंतात विलीन होत असतानाचा हंबरडा मी पामर काय वर्णन करणार? आणि एकंदरीने फलांश काय तर गावाच्या लायब्ररीत किंवा म्युनिसिपालिटीत झुंड मिशा असलेला एक फोटो, त्याच्या नावे मुळींचा शाळेत दर वर्षी वाटल्या जाणाऱ्या गीतेच्या पाच प्रती, पुस्तकांच्या यादीत एक नाव आणि रद्दीच्या ढीगात एक मणभर रद्दी! ही आपली चरित्रे!
कधी या नायकांना माणसांची दु:खे भोगायची पाळीच आली नाही. डोळ्यांना एखादी गोष्ट धडधडीत सत्य दिसत असता कसल्यातरी दडपणामुळे ती दिसत नाही,असे मासाच्या दुर्बलतेमुळे सांगण्याची पाळी आली नाही! आणि त्या शरमेने मन आयुष्यभर पिचले नाही? कुणालाच गॅलिलिओचा मनस्ताप नव्हता? निव्वळ वासनेने कधीच शरीर उळले नाही? रागाच्या भरात एक शब्द गेला व अत्यंत जिव्हाळ्याच्या जागी जखम झाली या पश्चातापाने मन कधी कुरतडले गेले नाही? कधी मोहाने, कधी महत्त्वाकांक्षेने कुणाचातरी विश्वासघात करून पापक्षालनासाठी आयुष्यभर वणवण हिंडायची कुणावर पाळी आली नाही? भेकडपणामुळे प्रिय व्यक्तीचा बळी द्यावा लागला, द्वेषाने मन पेटले, असे कधीसुद्धा घडले नाही? खड्ड्यात गेले ते सत्कार, ती भाषणे, तो तुरुंगवास. तुमच्या चरित्रात हा जिवंत माणूस आहे कुठे?
आणि या चरित्रात कुठे पाप नाही, गुन्हा नाही, शरम नाही. सारा 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' गुळगुळीतपणा. म्हणजे या लोकांना जीवनाचे पदरच दिसले नाहीत की या पुजाऱ्यांनी सारी बिळेच लिंपून टाकली आहेत, त्यातील काळे पिवळे नाग झाकून ठेवले आहेत? मग ही चरित्रांची बुळबुळीत, घोटीव एकसाची सहस्त्रलिंगे वाङ्मयात मांडून ठेवायची, त्यासमोर भाविकपणे बसायचे, एकमेकांना 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असा डोळा मारून जल्लोष करायचा ही आपली संस्कृती! आणि आडपडदा न ठेवता लिहिलेल्या चरित्रांकडे बोट दाखवून धक्का बसलासे करीत म्हणायचे,' नाहीतर तो पहा कानकाप्या व्हॅन गॉफ, जुगारी डोस्टोव्हस्की आणि लिंगपिसाट मोपासाँ-'
आणि पुष्कळदा आपले चरित्रनायक निघतातही तसेच रुक्ष एकमार्गी! राजकारणी मनुष्याला ललित वाङ्मय - नाट्याची आवड नाही, कवीला क्रिकेट माहीत नाही आणि संशोधकाला रंग माहीत असतात ते फक्त दोन - काळा व पांढरा! महाराष्ट्राची प्रकृतीच तशी आहे का कोणास ठाऊक. तेथील जीवनावर विलासाची कळा कधी आलीच नाही. परवडत असताही दुकानात जाऊन अत्यंत टिकाऊ, मळखाऊ गद्य कपडे घेणारा माणूस मराठीच असण्याची जास्त शक्यता. भाषेत दरबारी आदब आली नाही. ऐन भरभराटीच्या काळातही दिवाण-ई-खाससारखी शिल्पपुष्पे उमलली नाहीत. कलासक्त धुंदी तर येथे रोगाचाच प्रकार ठरेल. गायनामागे लागून आयुष्य विसकटणाऱ्या कलावंताला कणकवलीचा किराणा दुकानदारही वेडपट व्यसनी ठरवील. तर शिकण्यापेक्षा गुरे हाकणे पसंत करणाऱ्या पोरांसाठी दीडदमडी खेडेगावात शाळा घालून बसणारा ध्येयवादी ठरतो! जंत झालेल्या पोटांसारखी असह्य अवजड (काय लिहितो देव जाणे!) पुस्तके लिहिणारा उगाचच भाव खातो, पण नर्गिसला पद्मश्री मिळताच सात्त्विक संतापाचा वणवा पेटतो. एखाद्या गायकाविषयी लिहिताना त्याचे गायन राहिले बाजूला - 'पण गायक असूनही खाँसाहेब निर्व्यसनी होते' ही आमची सर्वात मोठी स्तुती! अहो, एखाद्या गावात कॉलऱ्याने पन्नास माणसे मेली तर त्यातली चाळीस माणसे निर्व्यसनी असतात. पण स्वरांची स्वर्गीय देणगी असणारा लाखात एक जन्मतो. जरा कुठे थाटामाटात एखादा समारंभ झाला की त्यासाठीच टपून बसलेले कळकळीचे कार्यकर्ते ताबडतोब वर्तमानपत्रांकडे धावतात. "हा सारा पैसा गोरगरिबांसाठी खर्च करता आला नसता का?" बरे, इतके करूनही गोरगरिबांचे लचांड एकदा कायमचे निकालात निघाले असते तरी हरकत नव्हती. ते अनादिकालापासून आहे, अनंतापर्यंत रहाणारच. गोरगरिबांना मदत करायलाच आपण जन्मलो, तर मग ते गोरगरिब कशासाठी जन्मले आहेत? आमची मदत घ्यायला! छान, म्हणजे छातीत खुपसायला सुरी, व सुरी खुपसण्यासाठी छाती! त्यात आपण अत्यंत बुद्धीवादी अशी आपली समजूत. खरे म्हणजे आमच्यासारखे भाबडे कुणी नसतील. कुणीतरी 'शिवाजी महाराज की जय' असे म्हटले की त्याने डोळ्यात टाकलेली धूळ आपण डोक्यावर घेतो. ती पवित्र घोषणा ऐकून आपण दीडदमडीची भाषणे वेदवाक्ये मानली, तिच्यामुळे आपण दिवाळखोर राजकीय पक्षांवर ऐपतीची वस्त्रे टाकली. एखाद्या मंगल देवालयात पुजाऱ्यांनी खाजगी मालमत्ता करावी त्याप्रमाणे त्या पवित्र छायेत अनेकांनी स्वार्थ तृप्त केले; आपले आसन स्थिर केले. ज्या युगप्रवर्तक नावाने सूर्योदयदेखील नैसर्गिक वेळेपेक्षा एक तास आधी व्हावा त्याला ग्रामपंचायती-म्युनसिपालटीच्या कवडीमोल निवडणुकीत आम्ही खेचून आणायला मागेपुढे पहात नाही. रविवर्म्याने आपल्या चित्रांसाठी महाराष्ट्रीय पोषाख निवडला, म्हणून आमच्या मते तो फार श्रेष्ठ चित्रकार! एक मराठी माणूस एक अबोल माणूस. दोन = बाह्मण -ब्राह्मणेतर अथवा कोकणस्थ देशस्थवाद व तीन माणसे-एक शाळा! ज्या ठिकाणी बाकीचे करपून गेले असते, तेथे महाराष्ट्र निंबाच्या झाडाप्रमाणे ताठ व चिवट राहिला, आणि काही विशिष्ट गुणांचीच जाणीव घेऊन जीवनाच्या एका अरुंद पट्टीवर नीट नाकासमोर चालला आहे...
(क्रमशः)