जेव्हा जेव्हा श्रद्धा - अंधश्रद्धा हा विषय चर्चेला येतो तेव्हा तेव्हा, जमेल तेवढे कटू शब्द वापरून साईबाबा/गजानन महाराज/स्वामी समर्थ आदी लोकांचा उद्धार करणे म्हणजे आपण फ़ार मोठे विज्ञान वादी असा काहीसा गैरसमज सगळीकडेच दिसतो...मनोगतावर ते आहेच.
लोकांनी श्रद्धा की अंधश्रद्धा जोपासावी हे काही साईबाबा किंवा गजानन महाराजांनी सांगितले नाही... त्या लोकांनी काही चमत्कारही करतो असा दावा केला नाही ... हा सगळा समाजातील इतर लोकांचा दोष की त्यांनी या लोकांच्या भोवती अशा रंजक कथा / चमत्कार गुंफ़लेत...
जीवनभर जो माणुस फ़क्त साधी कफ़नी घालून राहीला, किंवा स्वामी समर्थ, गजानन महाराज जे एक वस्त्रात वावरले आज त्या लोकांच्या समाधी पूजास्थाने हे भारतातील सर्वात श्रीमंत संस्थाने आहेत, या सगळ्यात या मूळ लोकांचा काय दोष आहे?
साईबाबा : समाजात जातपात धर्म यापेक्षा सगळ्यांनी एकोप्याने नांदावे हेच शिकवले.
समर्थ : त्यांचे ही असेच, शिवाय कोणत्याही क्षणी न घाबरता जीवनाला सामोरे जाण्याचाच संदेश देतात.
इतर संतांनी ही, आपली कामे पूर्ण श्रद्धेने/ मनापासुन करा. एकमेकांशी बंधुत्वाने वागा , जातीपाती मानू नका असलेच विचार समाजत रूजवण्याचा यत्न केलाय.
कोणत्याही संताने, लिंबू मिरच्या बांधा, आमवस्यापौर्णिमेला कोंबडं कापा असले बुवाबाजी प्रकार नाही सांगितले.
त्यांच्या शिकवणीकडे आपण व्यवस्थित डोळेझाक करतो, जी त्यांनी त्यांच्या आचरणातून दिली/जोपासली...
आणि आपल्यासारखी विज्ञानाचे गोडवे गाणारी मंडळी काय करतो, तर इतर लोकांनी त्या देवगुणी लोकांच्या भोवती रचलेल्या चमत्काराचे यांना धनी ठरवून, त्यांना वाटेल ते बोलून रिकामे होतो.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अगदीच पुसटशी सीमा आहे, ती सांभाळणे हे ज्याचे त्याचे काम आहे. विज्ञानाचे कितीही बाळकडू पाजले तरी माणसाला कुठेतरी श्रद्धा ही ठेवावीच लागते. त्याशिवाय त्याचे जगणे म्हणजे, तुफ़ानात भरकटलेल्या होडी सारखीच होईल.
अहो, साधे बीजगणीत सोडवताना सुद्धा आपण जी अस्तित्वात नाही ती 'क्ष' संख्या "मानतो", त्याशिवाय एक पायरीही पुढे जाणे शक्य होत नाही, मग जीवनात तुम्ही असे दिशाहीन चालूच शकणार नाही.
विज्ञान विज्ञान म्हणजे तरी काय? जे आत्ता पर्यंत प्रयोगांती सिद्ध झालेय तेच तुम्ही खरे मानता ना... आणि जगात अशा कित्यक गोष्टी आहेत ज्या आजही विज्ञानाला सुटल्या नाहीत त्याचे काय?... म्हणजे त्या गोष्टी खऱ्या नाहीतच असे मानायचे का?
माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते ? असे काय आहे जे त्या शरीरातून गेले की आपण तो माणुस गेला असे म्हणतो? हे आजही समजत नाही विज्ञानाला...
म्हणजे लगेच विज्ञान म्हणजे फ़ुकाचे असे होत नाही/ की मी म्हणत नाही
आजही मोठमोठे डॉक्टर, जेव्हा त्यांना ज्ञात असलेले प्रयत्न करूनही रुग्णात काही फ़रक पडत नाही तेव्हा म्हणतात की यापुढे सगळे "त्याच्या भरवशावर" (देव) ... असे का?
उत्क्रांती ... डार्वीनबाबा ने सांगितले की माणुस आधी माकड होता आणि त्याची उत्क्रांती होत होत तो माणुस झाला...
मग इतकी वर्षं झाली ह्या उत्क्रांतीचे पुढे काय झाले? माणसाच्यात आजुन बदल घडून पुढे दुसरा प्रगत मानव /प्राणी का तयार झाला नाही... का आजुन माणसाचा एखादा अवयव या उत्क्रांती मध्ये गळून पडला नाही की जो फ़ारसा उपयोगी नाही / की नवीन अवयव आला नाही जो आजच्या जगात वावरण्यासाठी/जगण्यासाठी अधिक सोयीचा असेल?
तरी ठेवतात ना अशा सिद्धांतावर विश्वास ... अजुनही हेच शिकवतात ना आपल्या शाळेत !
कुठे तरी सुवर्णमध्य साधणे आवश्यक आहेच की. का आपले नेहमीच एकांगी विचार करायचा... विज्ञान सगळ्या शक्यता पडताळण्याला महत्त्व देते ना... ते "असे काही घडूच शकत नाही" असे माणुन पुढे जात नाही तर, "असे घडू शकेल/शकते" या विचारने पुढे जाते असे मला वाटते.
एक नक्कीच, श्रद्धेशिवाय माणुस जगूच शकत नाही.. कोणाची देवावर श्रद्धा असते, कोणाची स्वतःवर, कोणाची स्वतःच्या आईवडीलांवर ...तर कोणाची विज्ञानावर...
बऱ्याचदा आपल्याला ज्या क्षेत्रातले ज्ञान नाही त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तिंच्या बोलण्यावर / कृतीवर आपण विश्वास/श्रद्धा ठेवतो. यात फ़ारसे गैर नसावे.
माझी विज्ञानावर श्रद्धा आहे, म्हणुन बाकी सगळ्यांची त्यावरच असली पाहीजे आणि जर तशी नसेल तर मग ती लगेच अंधश्रद्धा असा अट्टाहास कशासाठी?
आणि लोकांच्या अंधश्रद्धेला नावे ठेवताना, वर उल्लेखीत लोकांना की ज्यांनी आपले सारे आयुष्य इतर लोकांच्या चांगल्यासाठी खर्ची घातले, त्यांना नावे कशासाठी ठेवायची? ...
--सचिन