केले कैद मला तिने मजकडे पाहून एक क्षण
'वेळापत्रक'ही किती बदलले माझे तिला भेटण्या
होतो झाकत मी तिला न दिसण्या शर्टावरीच्या चुण्या!
झालो मी भलताच चांगुलपणाचा दास निष्कारण
ती येता किति काळजी कधिकधी लागे करावी मला
तोंडी ये न चुकून शब्द भलता - ना जीभ द्यावी दगा!
माझ्याबद्दलचे तिचे मत नको वाईट व्हाया उगा,
ह्यासाठी कलिजास घोर मम ह्या होता किती लागला!
रात्री झोप नसे, न चैन दिवसा, तब्येत खालावली.
सारे सांगुन आज मी तुटकसे जेंव्हा विचारी तिला,
"संदिग्ध प्रतिसाद पाहुन तुझा, आली गुलामी मला.
आशा मी करु का तुझी?" नि हृदयी हीऽऽ स्पंदने वाढली!
निःसंदिग्धपणे "नको" म्हणुन ती जाण्यास तेंव्हा वळे.
सारे साखळदंड पार तुटले -- वाटे कसे मोकळे!!
मुंबई १९८३