बैरागी वैशाख चाले
त्याचे अग्नीमय पाय
अंगी राख फासलेली
जाळीत आभाळा जाय
आग ओततो भास्कर
त्यात वैशाख झळाळे
पिंपळाच्या लाल पानी
चमचमती उन्हाळे
वैशाख ज्वाळा केशरी
लवलव होती जिभा
लाल फुलांनी पेटती
रानभर दिसे आभा
असा वैशाख लागला
मिळे कुठून ओलावा?
कसा लांब बांधावर
एक पावशा बोलावा?
भुई भाजून काढते
किरणांची ऊन सेना
पाणी आटून चालले
जरा गारवा मिळेना
ऋण वैशाखाचे थोर
थेंबाथेंबाने फिटते
येत्या मृगाचे ग्रहण
याच थेंबांनी सुटते
तशी गंध मोगऱ्याची
रोज उघडते पेठ
रोज राणा विशाखेचा
खुडतो कोवळे देठ
असा वैशाख सरतो
क्षण क्षण होती रिते
वाटे यावे नभातून
तुझे श्रावण-खलिते
--अदिती
(१० मे २००७
वैशाख वद्य अष्टमी
शके १९२९)