सुनील घरी पोहचला तेव्हा गंगूबाई साफसफाई करून निघून गेली होती आणि कंदील वगैरे नीट पेटवून ठेवले होते. आज वारा बाहेर सोसाट्याने घोंघावत होता आणि वादळाची लक्षणं दिसत होती. हवेत गारवा होता. उंदरांचा गोंगाट चालू होता. त्याला हल्ली तो आवाज आवडायला लागला होता. त्याच्या एकटेपणात ते उंदीरच काय ते त्याचे साथीदार होते. परत त्याला आठवलं की हे उंदीर फक्त तेव्हाच शांत बसतात जेव्हा तो मोठा उंदीर येतो. तो विचार झटकून तो जेवायला बसला. पोटभर जेवून आणि एक सिगरेट संपवून तो अभ्यासाला बसला. आज मन कशानेच विचलित होऊ द्यायचं नाही असं तो ठरवत होता. देशमान्यांना त्याने सांगितलं होतं की तो एक च्या पुढे जागत बसणार नाही आणि त्याला ते वचन पाळण्यासाठी एक वाजेपर्यंत जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण करायला हवा होता. एक तासभर त्याने चांगला अभ्यास केला असेल, पण नंतर त्याचं मन परत भरकटायला लागलं. त्याच्या मनातले विचार भरकटत होतेच, आणि बाहेरचं वातावरण पण या अस्वस्थतेला खतपाणी घालत होतं. वादळ वाढलं होतं आणि ढगांच्या कडकडाटाने घर मुळापासून हादरत होतं. दारंखिडक्या आपटत होती. बराच वारा असावा बाहेर, कारण एकदोनदा घंटेचा दोर पण कोणीतरी घंटा हालवत असल्यासारखा उचलला गेला आणि परत खाली पडला. त्या दोराकडे पाहताना सुनीलला देशमान्यांचे शब्द आठवत होते. "तो फाशीचा दोर आहे. जज्जाने अनेक अपराधी आणि निरपराधांना फाशीची क्रूर शिक्षा सुनावल्यावर चांडाळाने याच दोराने सर्वांना फाशी दिली.." सुनीलने वाकून तो दोर हातात घेतला. त्याच्या मनात वेगळेच विचार यायला लागले..कोणाकोणाला फाशी झाली असेल? सगळेच अपराधी असतील का? मरताना त्यांना काय वाटलं असेल? त्यांच्या मागे कोण कोण रडलं असेल? दोराला परत एकदोनदा हिसका बसला. आता दोर थरथरत होता. दोरावरून कोणीतरी चालत असल्यासारखा..त्याने वर पाहिलं तर तोच मोठा उंदीर दोरावरून खाली येत होता. सुनील दचकून ओरडला आणि मागे सरला. उंदीर मागे वळला आणि दोरावरून दिसेनासा झाला. परत सुनीलला जाणवलं की थांबलेले उंदरांचे आवाज परत चालू झाले आहेत. आणि त्याला एकदम आठवलं की काल तो त्या मोठ्या उंदराचं उगमस्थान शोधणार होता. कंदील घेऊन तो डावीकडून तिसऱ्या चित्राकडे वळला आणि कंदील अगदी जवळून त्याने ते चित्र पाहिलं..
सुनील इतका दचकला की त्याच्या हातून कंदील जवळजवळ खालीच पडला. पुसून साफ केलेलं चित्र जज्जाचं होतं. लाल कफ्तान आणि बुटांसहित. जज्जाचा चेहरा क्रूर होता आणि नाक पुढे बाकदार. सुनीलची नजर त्याच्या डोळ्यांकडे गेली आणि तो आणखी दचकला. त्या उंदराचेच डोळे त्याला तिथे दिसत होते. क्रूर, खुनशी आणि दुष्ट. अचानक तो उंदीर चित्राच्या कोपऱ्यातून डोकावला आणि परत लपला. सुनीलने कंदील सावरला आणि तो परत चित्राचं निरीक्षण करू लागला. चित्रातला जज्ज भिंतीला टेकून ठेवलेल्या मोठ्या आरामखुर्चीत बसला होता आणि त्याच्या शेजारी घंटेचा दोर लटकत होता. त्याने ती खोली ओळखली. हीच खोली चित्रात होती. अचानक सुनील मागे वळला आणि त्याने खोलीभर नजर फिरवली. काहीतरी दिसणार असं त्याच्या मनाला वाटत होतं. त्याची नजर आरामखुर्चीवर पडली आणि तो किंचाळला. खुर्चीवर तोच मोठा उंदीर बसला होता. आज त्याच्या डोळ्यात तिरस्कार आणि संताप धगधगत होता. बाहेरचा हवेचा आवाज सोडल्यास बाकी सर्व शांत होतं. सुनीलला पडलेल्या कंदिलाने भानावर आणलं. कंदील व्यवस्थित बंद केलेला असल्याने सुदैवाने त्यातलं तेल सांडलं नव्हतं. कंदील उचलताना तो बराच सावरलेला होता. तो स्वतःशी म्हणाला, "छ्या! मी जास्तच कडक चहा पितोय. डॉक्टर म्हणाले ते बरोबर आहे. जागरण आणि चहा दोन्ही माझ्या डोक्यावर परिणाम करतायत. मला दोन्ही बंद केलं पाहिजे." त्याने एक सिगरेट शिलगावली आणि परत अभ्यासाला लागला.
तासाभरात परत त्याने पुस्तकातून मान वर काढून इकडेतिकडे पाहिलं. शांतता पसरली होती. पण अगदी बारीकसा आवाज येत होता. सुनीलने कान टवकारले आणि त्याचं लक्ष घंटेच्या दोराकडे गेलं. तोच तो मोठा उंदीर घंटेचा दोर कुरतडत होता. त्याचं काम बराच वेळ चालू असावं, कारण सुनीलने पाहिलं तर तो दोर बराच कुरतडला गेला होता. आणि दोर पूर्ण कुरतडला गेला. थाड! आवाजासरशी दोरखंडाचं टोक जमिनीवर पडलं. उंदीर दोरीच्या उरलेल्या टोकाला लोंबकळत होता. सुनीलच्या पोटात भीतीचा गोळा उठला. आता घंटा वाजवून बाहेरुन मदत मागवणं पण अशक्य होतं.. भीतीची जागा रागाने घेतली आणि त्याने वाचत असलेलं पुस्तक नेम धरून उंदरावर फेकून मारलं. यावेळी नेम अगदी अचूक होता पण उंदीर त्या आधीच जमिनीवर पडला आणि पळून कुठल्यातरी कोपऱ्यात गायब झाला. सुनीलचं मन आता अभ्यासातून पुरतं उडालं होतं आणि त्याने आताच्या आता त्या उंदराला शोधून काढून संपवण्याचा निश्चय केला. कंदील घेऊन तो चित्रांच्या भिंतीकडे आला आणि डोळे फाडून पाहतच राहिला. चित्र तेच होतं.तीच खोली, तोच दोर, तीच आरामखुर्ची..पण खुर्चीवर बसलेल्या जज्जाच्या चित्राच्या ठिकाणी मात्र फक्त एक ताजा काळा डाग होता!
सावकाश तो वळला आणि समोर पाहिल्यावर एकाच जागी खिळून उभा राहिला. पळून जाण्याची इच्छा असली तरी तो तसाच जमिनीला चिकटवल्यासारखा उभा होता. त्याच्यासमोर आरामखुर्चीवर प्रत्यक्ष चित्रातला जज्ज बसला होता..जज्जाच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. जज्जाने टोपी काढली. सुनील मेणाच्या पुतळ्यासारखा डोळे टक्क उघडे ठेवून जागच्या जागीच उभा राहिला होता. त्याला पळून जाण्याचं भानही नव्हतं आणि हातापायात त्राणही नव्हतं. घड्याळात बाराचे टोले पडले. जज्जाच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून स्पष्ट झालं. टोले संपले आणि जज्जाने टोपी परत घातली. जज्ज (किंवा जे काही समोर होतं ते!) सावकाश उठला आणि त्याने खाली पडलेला घंटेच्या दोराचा तुकडा उचलला. सुनील टक्क उघड्या डोळ्याने बघतच होता. जज्जाने तो दोर प्रेमाने कुरवाळला आणि त्याला गाठ मारू लागला. दोराचा एक फास बनवला आणि तो आपल्या पायाभोवती आवळून गाठीची खात्री करून घेतली. परत फास सैल करून तो सुनीलकडे रोखून पाहत दाराच्या दिशेने सरकू लागला. आणि चपळाईने दारापुढे उभा राहिला. आपले सुटकेचे सर्व मार्ग बंद झालेत हे सुनीलला कळत होतं पण तो हालू शकत नव्हता. जज्जाच्या नजरेत अशी काही जरब होती की तो हालू शकत नव्हता आणि नजर चुकवू पण शकत नव्हता. जज्ज हळूहळू सुनीलच्या दिशेने सरकत होता. त्याने आपल्या हातातला दोर घट्ट पकडला आणि फास पुढे फेकला. सुनील कसाबसा तो फास चुकवून बाजूला उभा राहिला. परत जज्जाने आपले खुनशी डोळे रोखत फास फेकला आणि सुनीलने छोटीशी उडी मारून तो चुकवला. जज्ज परत परत फास फेकत होता..हतबल होऊन सुनीलने खोलीत आसपास नजर टाकली. बघतो तो काय, सगळीकडून छोटेछोटे उंदीर पळून छपरावर जमत होते आणि घंटेच्या दोरावर चढत होते. घंटेचा दोर पूर्ण भरून गेला होता आणि जड होत होता. सुनीलच्या मनात परत सुटकेची पुसटशी आशा जागी झाली. घंटेचा लोलक अलगद हालला आणि अगदी हलकासा आवाज आला. थोडा अजून हिसका बसून घंटा चांगली वाजली असती.
घंटेच्या आवाजासरशी जज्जाने वर दोरखंडाकडे पाहिलं आणि त्याचे डोळे संतापाने त्या अंधारात निखाऱ्यासारखे लालभडक झाले. त्याने जोरात जमिनीवर पाय आपटला. बाहेर ढगाचा मोठा गडगडाट झाला..उंदीर आता घाबरून दोरावर वरखाली पळत होते. जज्ज आता फास न फेकता सुनीलच्या जवळ आला. त्याच्या नजरेत असं काही होतं की सुनील एखाद्या प्रेतासारखा थिजून उघड्या डोळ्यांनी जागीच उभा राहिला. त्याच्या मानेला जज्जाच्या बर्फाळ हातांचा स्पर्श जाणवला. जज्जाने फास सुनीलच्या गळ्याभोवती टाकला..घट्ट केला..पुतळ्यासारख्या उभ्या सुनीलला आरामखुर्चीपाशी आणलं. आरामखुर्चीवर उभं केलं आणि घंटेचा दोर वर लोंबकळणाऱ्या दोरखंडाला बांधला. त्याचा हात दोरखंडाला लागताच सर्व उंदीर दोरावरून पळाले आणि लपले. जज्जाने आरामखुर्ची सरकवली....
जेव्हा जज्जाच्या कोठीवरची घंटा जोरजोराने वाजू लागली तेव्हा सर्व गावकरी काठ्या, कंदील आणि विजेऱ्या घेऊन धावत आले. त्यांनी दार जोरात ठोठावलं. पण दार उघडलं नाही. धक्के मारून त्यांनी दार फोडलं आणि आत प्रवेश केला. डॉ. देशमाने सर्वात पुढे होते.
घंटेच्या दोरखंडाला सुनीलचं प्रेत लोंबकळत होतं आणि चित्रातल्या जज्जाच्या चेहऱ्यावर खुनशी हसू होतं!
अनु
('ड्रॅक्युला' कार ब्रॅम स्टोकर च्या 'द जजेस हाऊस' या लघुकथेचं स्वैर रुपांतर)