![]() |
पार्वतीकाकू कोर्टाच्या व्हरांड्यात भिंतीला टेकून बसल्या होत्या. जवळच त्यांची एक जुनी पुराणी पिशवी होती. त्या कापडी पिशवीत होत्या त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांच्या प्रती. सुरुवातीच्या काळात नवीन शिवलेल्या त्या पिशवीचा मूळ रंग, रूप आता पार बदललं होतं. पिशवीचंच काय पण त्या काळातल्या, पन्नाशीतल्या ठसठशीत, पार्वतीकाकूही स्वतः आज, सत्तरीत, शरीराने विदीर्ण आणि मनाने उसवलेल्या दिसत होत्या. दुधावर साय जमावी तशी चेहऱ्यावर कातडी जमली होती. पूर्वी हौसेने नीटनेटक्या राहणाऱ्या काकू आज नाईलाजाने, कोर्टात जायचे म्हणून, नवीन लुगडं नेसून आल्या होत्या. |