उंदीर आजपण मुक्त संचार करतच होते. आज त्यांचा गोंगाट आधीपासून चालू होता. म्हणजे आता त्यांना त्याची पुरेपूर सवय झालेली दिसत होती. कंदिलाच्या टप्प्यातून बाहेर कोपऱ्यात अंधारात काहीवेळा एखाद दुसऱ्या उंदराचे डोळे चमकून जायचे. पण का कोणास ठाऊक , सुनीलला सारखं वाटत होतं की या उंदरांचे डोळे काल भेटलेल्या त्या लठ्ठ्यासारखे दुष्ट नाहीत, खेळकर आहेत. उंदीर आज अधुनमधुन सुनीलच्या अगदी जवळ येऊन बसत होते आणि त्याने श्शू! केल्यावर परत तात्पुरते दूर पळत होते. त्याचं लक्ष काही तास अभ्यासात नीट लागलं. आणि परत एकदा तो थांबला. कारण काल रात्रीच्या प्रसंगासारखाच उंदरांचा आवाज परत पूर्ण थांबला होता. कसलाही आवाज नव्हता. अक्षरशः स्मशानशांतता पसरली होती. आणि नकळत त्याची नजर परत आरामखुर्चीकडे गेली आणि तो शहारला. परत तो मोठा उंदीर खुर्चीवर बसून खुनशी नजरेने त्याच्याकडे पाहत होता.आपसूकच त्याने हाताला लागेल ते पुस्तक उंदरावर फेकून मारलं. नेम चुकला आणि ते उंदराला लागलं नाही. परत आदल्या रात्रीसारखा सुनील काठी घेऊन त्याच्यावर धावून गेला तेव्हा उंदीर घंटेच्या दोरावर चढून दिसेनासा झाला. आश्चर्य म्हणजे कालच्यासारखंच तो मोठा उंदीर पळून गेल्यावर इतर उंदरांचा आवाज परत सुरू झाला. जवळजवळ मध्यरात्र होत आली होती. सुनीलने उठून कडक चहा बनवला आणि कंदिलात रॉकेल घातलं. चहाचा कप आणि सिगरेट घेऊन तो त्या आरामखुर्चीवर जाऊन बसला. सिगारेटचे झुरके मारता मारता तो उंदीर नक्की कोणत्या भागात गायब होतो याचा विचार करत होता. त्याची लपण्याची जागा नीट कळली म्हणजे उंदराचा सापळा लावायला बरं पडलं असतं. त्याने उठून दुसरा एक कंदील खोलीच्या डाव्या कोपऱ्यात ठेवला.मग घंटेचा दोर उचलून टेबलावर ठेवला आणि त्याचं टोक कंदिलाखाली दडपलं. जवळ चार पाच जाड पुस्तकं फेकण्यासाठी तयार ठेवली. दोर हातात घेताना विचित्र वाटत होतं. जुना आणि कित्येक वर्षं वापरात नसला तरी दोर अगदी दणकट होता. "याने तर कोणाला तरी फासावर पण आरामात चढवता येईल." सुनील पुटपुटला आणि परत अभ्यासाला लागला.
काही वेळाने परत त्याला कसलीतरी जाणीव झाली. सगळा आवाज परत थांबला होता. घंटेचा दोर किंचित हालला होता आणि त्याच्यावर ठेवलेल्या कंदिलाचा आवाज झाला. सुनीलने तयार ठेवलेल्या पुस्तकांच्या चळतीवर नजर टाकली आणि तो आरामखुर्चीकडे बघायला लागला.तो मोठा उंदीर दोरावरून उडी मारून आरामखुर्चीवर उतरला होता. सुनीलने पुस्तक हातात घेतलं आणि यावेळी नीट नेम धरून त्या उंदरावर मारलं. उंदीर चपळाईने बाजूला पळाला आणि त्याने पुस्तक चुकवलं. सुनीलने परत दोन पुस्तकं उचलली आणि एकामागून एक उंदरावर फेकून मारली. पण उंदीर प्रत्येक वेळी नेम चुकवत होता. आणि आता सुनील चौथं पुस्तक हातात धरून फेकण्याच्या तयारीत उभा होता तेव्हा त्याला जाणवलं. उंदराच्या डोळ्यात घाबरल्याचे भाव होते आणि तो अंग चोरून बसला होता. सुनीलला आणखी आवेश आला आणि त्याने जोरात नेम धरून पुस्तक फेकून मारलं.
काहीतरी आवाज काढून उंदीर अक्षरशः जिवानिशी धूम टाकून दोरावर पळाला. उंदीर पटकन भिंतीवरच्या दोन चित्रांच्या मधल्या फटीत गेला होता. आज कंदील नीट त्या दिशेला उजेड पडेल असा ठेवल्याने सुनीलला ते स्पष्ट दिसलं. "मी उद्या नीट शोधून काढीन तो उंदीर कुठे लपतो ते. डावीकडून तिसरं चित्र..लक्षात राहील माझ्या. " सुनीलने मनाशी विचार केला आणि तो फेकलेली पुस्तकं गोळा करायला लागला. "कमाल आहे.लठ्ठ्या उंदीर "फायबर ऑप्टिक्स" फेकून मारलं तर दाद देत नाही.."इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स" ला घाबरत नाही.."डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग" ने पण डळमळत नाही..आणि चौथं पुस्तक फेकल्यावर मात्र घाबरून पळून जातो.." सुनील पुटपुटत चौथं पुस्तक उचलत होता. चौथं पुस्तक पाहिलं आणि तो जरा हबकला. आईने दिलेला(आणि सुनीलने कधीच न वाचलेला) दासबोध होता तो. सुनीलने परत अभ्यास सुरू केला. आता छोटे उंदीर परत गोंगाट करत होते. पण सुनीलला त्यांचा आधार वाटत होता. अभ्यासात त्याचं लक्ष लागेना. तो झोपायला गेला. झोप आली, पण खूप चित्रविचित्र स्वप्नं पडत होती. सकाळी गंगूबाई काम आवरून जाताना त्या उठवून गेली तेव्हा त्याला क्षणभर आपण कुठे आहोत तेच कळेना. आणि त्याने गंगूबाईना सांगितलं, "मला आज रात्रीपर्यंत ती भिंतीवरची चार चित्रं साफ करून हवी आहेत. मला ती बघायची आहेत." गंगूबाई आपल्या अभ्यासू मालकाची जुनाट चित्रांमधली रुची बघून आश्चर्यचकित झाली आणि मग निघून गेली.
सुनील नाश्ता करून बाहेर पडला आणि त्याच्या कालच्याच जागी अभ्यास करत बसला. काही तास त्याचा तिथे चांगला अभ्यास झाला आणि अभ्यास मनासारखा उरकल्याच्या आनंदात मग तो परतीच्या वाटेवर कावेरीमावशींच्या खानावळीकडे वळला. आज खानावळीच्या पडवीत कावेरीमावशीबरोबर आणखी एक अपरिचित गृहस्थ होता. "डॉ. देशमाने" अशी ओळख करून दिलेला तो मनुष्य सुनीलला ज्या प्रकारे एकामागून एक तब्येतीबद्दल प्रश्न विचारत होता ते आणि कावेरीमावशीचा गंभीर चेहरा पाहून सुनीलला कळलं की हा डॉक्टर आता आपण येण्याच्या वेळी इथे असणं हा घडवून आणलेला बनाव दिसतोय. तो म्हणाला,
"डॉक्टर देशमाने, मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं देतो पण मला एक गोष्ट खरी सांगा. मला भेटा आणि तपासा हा कावेरीमावशींचा सल्ला आहे ना?"
कावेरीमावशीने मान खाली घातली. पण डॉक्टर शांतपणे म्हणाले, "हो. त्यांनीच मला इथे बोलावलं. आणि मी जरा माहिती मिळवण्याची घाई केल्याने तुम्ही ते पटकन ओळखलं. मावशींना मी तुम्हाला भेटावं अशी इच्छा होती. तुम्ही त्या घरात एकटेच राहता हे त्यांना जरा घाबरवतं. आणि तुम्ही जरा जास्तच कडक चहा पिता असंपण त्या म्हणाल्या. मीपण विद्यार्थी होतो तेव्हा रात्र रात्र जागून अभ्यास करायचो, पण हेही सांगतो की जागरण आणि कडक चहा हे काँबिनेशन तब्येतीला अजिबात चांगलं नाही. मला विचाराल तर मी तुम्हाला जागरणं आणि कडक चहा दोन्ही टाळण्याचा सल्ला देईन."
सुनीलने आश्वासक हास्य केलं. डॉक्टरांशी हात मिळवत तो म्हणाला, "आपल्या आस्थेबद्दल आणि सल्ल्याबद्दल आभारी आहे. मला पटतंय. मी शक्यतो रात्री १ वाजेपर्यंतच अभ्यास करेन आजपासून. चालेल?"
"होय. आणि आता मला सांगा की तुम्हाला त्या घरात काय जाणवलं?" डॉ. मुद्द्याकडे वळले. सुनीलने जास्त आडवळणं न घेता त्यांना तो मोठा उंदीर, इतर उंदरांची शांतता, मोठ्या उंदराची नजर, दासबोध फेकल्याचा किस्सा हे सर्व सांगून टाकलं. तो सांगत असताना कावेरीमावशी भीतीने पांढऱ्या पडत चालल्या होत्या. आणि दासबोधाबद्दल ऐकल्यावर त्यांना क्षणभर भोवळ आली आणि त्या खुर्चीवर बसल्या. देशमानेपण ऐकून गंभीर झाले. पाणी दिल्यावर आणि कावेरीमावशी जरा सावरल्यावर देशमान्यांनी विचारलं, "उंदीर दरवेळी त्या घंटेच्या दोरावरूनच पळाला का?"
"हो."
"तुम्हाला माहिती आहे, तो दोर कशाचा आहे?"
"कशाचा?"
"तो फाशीचा दोर आहे. जज्जाने अनेक अपराधी आणि निरपराधांना फाशीची क्रूर शिक्षा सुनावल्यावर चांडाळाने याच दोराने सर्वांना फाशी दिली."
परत कावेरीमावशींना भोवळ आली. यावेळी त्या लवकर शुद्धीवर आल्या नाहीत. सुनीलने घड्याळात पाहिलं. रात्र बरीच झाली होती म्हणून तो कावेरीमावशी शुद्धीवर येण्याआधीच घरी निघून आला.
तिथे कावेरीमावशींनी देशमान्यांना बरंच सुनावलं. तिचं म्हणणं होतं की सुनीलला आधीच घाबरण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.त्याला बिचाऱ्याला त्या घरात एकटं राहायचंय. त्याला या अशा गोष्टी सांगून आणखी भीती दाखवायला नको होती.
देशमाने शांतपणे म्हणाले, "मी त्याला मुद्दाम सांगितलं कारण मला त्याचं लक्ष त्या दोराकडे आणि पर्यायाने घंटेकडे वेधायचं होतं. तो त्या घरात एकटा राहतो. जरी धडधाकट तरुण माणूस असला तरी ते उंदीर..मोठा उंदीर.. हे सर्व मला ऐकायला ठीक नाही वाटलं. खरं तर मी त्याच्याबरोबर रात्री सोबत करू का विचारणार होतो पण त्याला ते आवडलं नसतं. मला खात्री आहे आज रात्री त्याला काहीतरी विचित्र अनुभव येणार. आणि अशा वेळी एखाद्या प्रचंड भीतिदायक प्रसंगातून जावं लागलं तर त्याने त्या घंटेच्या दोराची आठवण होऊन ती घंटा तरी वाजवावी असं मला वाटतं. मी आज रात्री उशीरापर्यंत जागणार आहे. तो त्या घरात एकटा असला तरी त्याच्या इशाऱ्यासरशी आपण त्याच्या मदतीला तरी धावून जाऊ शकतो. घाबरू नका, पण मला खात्री आहे उद्या सकाळी कवठदरीच्या लोकांना काहीतरी वेगळं बघावं लागणार आहे."
कावेरीमावशी थरकल्या. "म्हणजे काय , देशमाने? मला नीट सांगा!!"
"म्हणजे इतकंच की कदाचित...अं... बहुतेक आपल्याला आज रात्री जज्जाच्या कोठीवरची घंटा ऐकू येणार आहे!" कावेरीमावशींना तसंच चकित अवस्थेत सोडून देशमाने निरोप घेऊन निघून गेले.