![]() |
पांढऱ्या शुभ्र ढगांच्या दुलईवरून चालणारी एक परी. परी आहे का ती? छे, मीच तर आहे. किती सुंदर दिसतेय मी? पांढरी शुभ्र साडी, त्याला काळी किनार, अगदी दिसेल न दिसेल इतकीच. गळ्यात मोत्याची माळ. अगदी हलकासा मेक अप. मला जास्त आवडतच नाही. थोडाच चांगला दिसतो. आणि माझ्या बरोबर कोण आहे? निषाद? शक्यच नाही. निषाद असा नाहीच मुळी. कुणी का असेना? मला आहे का त्याची पर्वा? मी माझ्याच धुंदीत आहे. |
अगदी नेहमी असते तशीच. अगं पण जरा सांभाळून. नाचत नाचत ढगाच्या कडेला पोचलीस बघ. आई गं. पडले, कोसळले. ढगामागून ढग, विश्वामागून विश्व, काळामागून काळ मागे सोडत मी पडत चाललेय एका खोल खोल गर्तेत. वाचवा मला.... निषाद कुठे आहेस तू.....मी....आई गं...
स्वप्न. ओह...... स्वप्नच होतं ते. घामाने डबडबलेय मी. किती वाजले? सकाळचे साडेचार? आता झोप येणं कठीण आहे......
स्वप्न तर नेहमीच पडायची मला. डोंगर दऱ्या, सुंदर सुंदर बागा. अगदी बागेतल्या फुलांचा वास पण यायचा. धुंद होऊन जायचे मी. शरीराची धुंदी मनात उतरते म्हणतात. तशी धुंद स्वप्न पडायची तेव्हा निषाद असायचा शेजारी. त्याची भरदार छाती, बलदंड हात, खांदे, सरळ नाक, लहान मुलासारखा निरागस चेहरा. दचकून उठायचे मी एकदम. त्याला कळायचं मी स्वप्न बघतेय म्हणून. हळूच तो मला जवळ ओढायचा. किती आश्वस्त वाटायचं त्याच्या छातीवर डोकं ठेवलं की. केसातून हात फिरवत मला तो शांत करायचा. त्याचा तो स्पर्श. वेडं करायचा मला.
नेहमी म्हणायचा मी पंचम आणि तो निषाद. खरंच निषाद होता तो. भीमपलासीतला निषाद. कोमल. यमनातला नाही. माझा आवडता......
किती गंमत असते ना? दोन एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती भेटतात काय, एकमेकांना आवडतात काय? आणि एकमेकांत गुंततात काय?........ मी मेडिकल कॉलेजला होते तेव्हा मला माझा निषाद सापडला. तोपर्यंत फक्त भीमपलास म्हणायचे. बिरजमें धूम मचायी श्याम.....कैसे कैसे जाऊ अपने धाम.....त्यातला "नि" मनाला भिडला तो निषाद भेटल्यावर.
जिमखान्यावर रोज यायचा. कशी आमची ओळख झाली तेही आठवत नाही. समोरचा समुद्र दोघांनाही आवडायचा. मुळात मला तो "नि" आवडायचा भीमपलासीतला. समुद्र तर एक बहाणा होता, त्याला आळवायचा. तो अंधेरीला, मी ग्रँट रोडला. मी खरंतर घरी चालत जाऊ शकत होते, पण मी त्याच्याबरोबर जायचे, चर्चगेटपर्यंत, आणि मग ट्रेनने घरी. घर कसलं? पेइंग गेस्ट म्हणून राहायचे तेव्हा.
मला गर्दी आवडायची नाही. वीट यायचा त्या गर्दीचा. किळस वाटायची. त्या नजरा, ते विकारी स्पर्श, नको वाटायचं मला त्या गर्दीत. पण त्याला गर्दी खूप आवडायची. मग मी आवडून घ्यायचे. शेवटी तडजोडी करायलाच लागतात ना आयुष्यात. शक्य होत्या तेवढ्या केल्या. गर्दी ही त्यातलीच एक तडजोड......
....Cancer is a disease characterized by a population of cells that grow and divide without respect to normal limits, invade and destroy adjacent tissues.....
कॉलेजात शिकायचे हे मी तेव्हा. तेव्हा वाटायचं ही गर्दी म्हणजे एक कॅन्सर आहे. माणूस म्हणजे कॅन्सर ची पेशी. कोणत्याही मर्यादा न पाळता, स्वतःचा वंश वाढवणाऱ्या पेशी. आजूबाजूच्या पेशींना उध्वस्त करीत आपलं अस्तित्व तेवढं टिकवणाऱ्या, वाढवणाऱ्या. मला व्हायचं नव्हतं त्या गर्दीचा एक भाग. पुनरुत्पादन, आणखी पुनरुत्पादन आणखी विध्वंस ह्या चक्रात अडकायचंच नव्हतं मला. नव्हतं व्हायचं मला त्या कॅन्सरची एक पेशी, लबाड, वाईट, हिंस्र.
जाऊ दे. प्रत्येकाची मतं असतात तशी माझीही. पण ते दिवस मात्र सुंदर होते. समुद्राच्या पाण्याप्रमाणेच. भरती आलेले. अजूनही विसरू शकत नाही निषादचा चेहरा, जेव्हा त्याला मी म्हटलं आपण एकत्र राहूया. बघतच राहिला माझ्याकडे.
खरं सांगते शारीरिक आकर्षण होतं. नव्हतं असं नाही. पण ओढ होती त्याच्याबरोबर अख्खा दिवस घालवण्याची. रात्री जागवण्याची आस नंतरची. मग दादरला भाड्याने घेतलेलं घर. अजूनही आठवतो तो दिवाणखाना. कोपऱ्यात ठेवलेला माझा तानपुरा. रिकामा असेल तो कोपरा आता. तसा तो तानपुराही आता सूर हरवून बसलाय. निषादबरोबरचा त्या घरातला पहिला एकांत. ते स्वतःचं अस्तित्व विसरून जाणं. मीपणा गळून पडणं वगैरे ते हेच असावं. ह्याच्यासाठी का समाधी लावून बसतात योगी वर्षानुवर्ष.
किती अपराधी वाटत होतं त्याला. मी त्याला किती समजावलं. अरे, माझ्यासाठी तू जास्त महत्त्वाचा आहेस. तुझ्याशी एकजीव होणं महत्त्वाचं आहे. लग्न नाही. संसार नाही. तूमय होणं माझी गरज आहे. तुझी बायको होणं, तुझ्या मुलांची आई होणं नाही.
त्यालाही ते हवं होतं. पण त्याच्या नैतिकतेच्या चौकटीत बसणारा हा प्रकारच नव्हता. कदाचित समाजाच्या अपेक्षांचं ओझं. आपण काही अपराध करतोय अशी भावना? माहीत नाही, पण शेवटी मोहाला भुलला झालं.
सगळं सुरळीत चालू होतं. माझी इंटर्नशिप करून मी नुकतीच मुंबईत परतले होते. निषादबरोबर पुन्हा एकत्र आल्याचा आनंद होताच. समोर दादर चौपाटीचा समुद्र. आम्ही पायऱ्यांवर बसलो होतो. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून. आमचं कॅन्सर हॉस्पिटल, पेशंट्स, त्यांच्या व्यथा, आपल्या असंख्य विकारी डोळ्यांनी आम्हाला न्याहाळणारा गर्दीचा कॅन्सर सगळं सगळं विसरून, मी नेहमीप्रमाणे देहभान विसरून त्या समुद्रात, निषादच्या अस्तित्वात बुडून गेले होते. समोरचा अस्ताला जाणारा सूर्य आम्हाला जणू आशीर्वाद देत होता की आमच्या प्रेमाचा अस्त कधीही होऊ नये.
आणि अशा त्या बेसावध क्षणी, त्याने मला सांगितलं. आता लग्न करूया. किती दिवस असं राहणार?.....
असं राहणार म्हणजे? कसं राहत होतो आम्ही. काय चुकीचं होतं त्यात. आणि त्याने चक्क मला सांगितलं. विचारलं सुद्धा नाही. चक्क सांगितलं की लग्न करूया. कशाला? काय गरज होती लग्न करण्याची. जे चाललं होतं ते ठीक होतं. अमर्याद पुनरुत्पादन, आणखी पुनरुत्पादन. आणखी गर्दी. कॅन्सर. कशाला करायचं होतं लग्न? हक्क दाखवण्यासाठी? मालकी प्रस्थापित करण्यासाठी? अरे, मी तुझीच होते रे आणि जन्मभर तुझीच राहिले असते, पण तेवढा विश्वास तू माझ्यावर दाखवला असता तर. मला नेहमी वाटतं. लग्न म्हणजे एकमेकांवरचा अविश्वास. जर एकमेकांवर विश्वास असेल तर त्याला कायदेशीर दर्जा द्यायची काय गरज आहे? जाऊदे. प्रत्येकाची मतं असतात तशी माझी. त्या संध्याकाळीच तानपुऱ्याने कोपरा सोडला. मला त्या अपेक्षेच्या ओझ्याखाली जगायचं नव्हतं.