झालं ते चांगल्यासाठीच झालं......... नेहमी जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं ही आईची शिकवण. काय चांगलं झालं तिचं तीच जाणे. नवऱ्याने छळ छळ छळलं, बडव बडव बडवलं, तरी जे होतं ते चांगल्यासाठीच अशी तिची श्रद्धा. पिचून पिचून गेली बिचारी. लहान होते मी तेव्हा. माझ्या बापाची बाप म्हणवून घ्यायची सुद्धा लायकी नव्हती. कुठे आहे तो कोण जाणे. स्कॉलरशिपवर शिकत डॉक्टर झाले. गुरुजींच्या भरोशावर गाणं शिकले. जाऊदे, शेवटी जे काही होतं ते चांगल्यासाठीच. निषादपासून दूर जाणं सुद्धा.
आणि निषादपासून दूर झाल्यावर तर काय, माझा पेशाच माझं सर्वस्व झालं. मुद्दामच मी निवडला होता हा पेशा. रक्त बघितलं तरी निषादला चक्कर यायची, डिसेक्शन तर सोडाच. पण मला आवडायचं. आपल्या शरीरात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण गृहीत धरतो. त्यांच्यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे त्या नाहीत हे लक्षातच येत नाही आपल्या. लक्षात येतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. खूपच उशीर. मला माहितेय ना. आता कळतंय. उशीर. खोल गर्ता.
काय बरं विचार चालला होता? हं मला डिसेक्शन आवडायचं . आपल्याच शरीराची आपल्याला कसली किळस? मग मी ठरवलं एक डॉक्टर व्हायचं आणि ह्या शरीराचे पांग फेडायचे. किती लोकं भेटली आमच्या कॅन्सर हॉस्पिटलमधे. किती त्यांच्या समस्या. नाही, हा रोगच असा आहे. कॅन्सर. मती कुंठीत करणारा. पेशींचं पुनरुत्पादन, आणखी पुनरुत्पादन आणि मग सर्वनाश.
मिनी आठवते अजून. तीन वर्षाची होती. विल्म्स ट्यूमर झाला होता तिला. खरंतर हा उपचारांना चांगला प्रतिसाद देणारा कॅन्सर. खूप प्रयत्न केले. जे जे शक्य होतं ते सगळं केलं पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं? साठ वर्षाच्या जनाबाई, हरिनामाचा जप करीत मृत्यूला सामोऱ्या गेल्या. सोळा वर्षाचा अनंत. केस गळायला लागले तसा वेडापिसा झाला. म्हणाला डॉक्टर मला ही ट्रीटमेंट नको. थांबवा. आरसा बघवत नाही.
खरंच बघवत नसेल का आरसा? कसं वाटेल? जेव्हा माझे केस गळून जातील. मी बघितलंय कित्येक जणांना तसं. पण मला स्वतःला? बघू शकेन मी मला स्वतःला तसं? बघावंच लागेल, कारण उशीर झालाय आता. गेली पाच वर्ष ह्या पेशींशी लढाई केली. वेगवेगळ्या पेशंट्ससाठी, जीव तोडून लढाई केली. जिंकले देखील, हरले देखील. रोगी बरा झाला की वाटायचं मी जिंकले, दगावला की वाटायचं मी हरले. ती माझी हारजीत नव्हतीच मुळी. त्या रोग्याची होती. ह्या सगळ्या धावपळीत, कॅन्सरने माझ्याविरुद्ध उभारलेलं निशाण लक्षातच नाही आलं माझ्या. मी आपली नेहमीसारखीच माझ्या धुंदीत. खूप उशीर झालाय आता. खरंच.
आयुष्य असं जग की उद्या मरण आहे. मी नेहमी सांगायचे निषादला. हसायचा तो मला. म्हणायचा शक्यच नाही असं करणं, कारण उद्या मरण असेल तर त्या येत्या मरणाच्या भीतीनेच माणूस आजच मरेल. मला पटायचं नाही. आता पटतं का? आता कळतंय कसं वाटतं जेव्हा आपलं मरण समोर दिसतं. आज कळतंय मला. खरंच कळतंय का? हे सगळं अशक्य वाटतं. कल्पनातीत. कसं शक्य आहे? मी स्वतः डॉक्टर. इतक्या पेशंटवर मी उपचार केले आणि मलाच? कसं जगायचं असतं, उद्या मरण आहे हे कळल्यावर? एवढं घाबरावं मी एखाद्या गोष्टीला की जी आज नाही तर अजून वीस वर्षांनी अजून पन्नास वर्षांनी कधीतरी होणारच आहे. का?
इतकं का सैरभैर व्हावं मी? जाऊदे. आणखी एक अनुभव. ह्या आयुष्याने गेले पस्तीस वर्ष वेगवेगळे अनुभव दिले. काही चांगले वाईट. लहानपणाची फरफट, मग तारुण्याचा उन्माद, निषाद, गाणं, निषादचा तो स्पर्श, पहिला आणि शेवटचा, तो दादर चौपाटीचा सूर्य, त्याचं मला लग्नासाठी विचारणं, मी चक्क त्याला सोडून एकटं येऊन राहणं, मिनीचे इवलेसे डोळे, मिटलेले आणि हसत हसत घरी परत गेलेला अनंत. मेलानोमा, कॅन्सर, मला झालेला मेलानोमा.
तो रिपोर्ट. तशीच खुर्चीत बसलेली मी निःशब्द, निषाद जवळ हवा असं वाटणारी मी, कुणीही जवळ नको असं वाटणारी मी, रडणारी, भेदरलेली मी, मग वेड्यासारखं हसणारी मी. किती अनुभव. पस्तीस वर्ष ह्या आयुष्याने माझ्या पदरात चांगली दानं टाकली. आणि हे एक वाईट दान. अखेरचं? की?
किमोथेरेपी. सुरू करावीच लागेल आता. नाहीतर अंत निश्चित. आठवतंय कॉलेजमध्ये शिकवलेलं. पेशंटला शांत करा. त्याला सत्यपरिस्थिती समजावा. काय? की काहीच दिवस उरलेत म्हणून?
निषादला कळलं तसा त्याने फोन केला. म्हणाला लग्न कर नाहीतर नको करू पण मला तुझ्याबरोबर राहायचंय. ह्या परीक्षेच्या क्षणाला मला तुझी सोबत करायचेय. आय लव्ह यू म्हणाला. मला. खरंच प्रेम आहे का हे? की सहानुभूती? मला नकोय रे कुणाचीही सहानुभूती. अगदी तुझीही. निषाद, मी खूप दूर निघून गेलेय रे. सगळंच बेसूर होईल. निषादबरोबर पंचम हवा तो बरोबरीचा. असा पिचलेला, त्राण गेलेला नव्हे.
आणि शेवटी ही माझी लढाई आहे, माझी एकटीची. आणि मला ती एकटीनेच लढायचेय राजा. तू माझ्यावर गाजवलेला हक्क मला सहन झाला नाही आठवतंय ना? मग आता का पुन्हा हक्क गाजवतोस? एकटं राहायचंय मला. लोकं सांगतात, बरं वाटेल, ठीक होईल, अरे पण सहन तर मलाच करायचंय ना? मला एकटीला. मग नुसती पोपटपंची करणारे बगळे हवेत कशाला बाजूला? तू बगळा नाहीस रे. तू राजहंस आहेस. पण तुलाही तुझं आयुष्य आहेच की रे. माझ्यामुळे मी तुझं आयुष्य का वाया घालवू?
लढण्याशिवाय दुसरं काय केलं रे मी आयुष्यात. अजून एक लढाई. पण ह्या लढाईत तुझी माझ्याबरोबर फरफट होऊ नये म्हणून तुला नाही म्हटलं. खरंतर मी ज्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेत, प्रेमात पडायची ऊर्मी सर्वाधिक आहे रे. कुणी आपल्याबरोबर असावं असं वाटतं. विचार करता करता एकटेपणा खायला उठतो. पण मग मी स्वार्थी होईन ना रे राजा. गरज असताना जवळ करणं आणि हक्क गाजवला म्हणून दूर लोटून देणं असं अप्पलपोटं मी नाही रे वागू शकत. निदान तुझ्याशीतरी. ही लढाई मी लढेन. जिंकेन की हरेन ते माहीत नाही. पण प्राणपणाने लढेन.
पण एक लक्षात ठेव निषाद. तुझ्याशिवाय माझा भीमपलासी कधीच रंगणार नाही रे. मी रंगवणार पण नाही. पण सदैव आठवणीत राहील तो माझ्या. संध्याकाळची वेळ, लांब होत चाललेल्या सावल्या, समुद्र, तू आणि भीमपलास....... बिरजमें धूम मचायी श्याम.....कैसे कैसे जाऊ, अपने धाम....
अपने धाम........ एका खोल खोल गर्तेत. ढगामागून ढग, विश्वामागून विश्व, काळामागून काळ मागे सोडत मी पडत चाललेय एका खोल खोल गर्तेत. वाचवा माला.... निषाद कुठे आहेस तू.....मी....आई गं...
को अहम