बटाटा हाइट्स-१

      बोरीबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या, ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत ?"

      खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नोकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नोकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता, तरी निवासाचा प्रश्न खर्डीसारख्या दूरवरच्या गावात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज किमान जाऊन-येऊन तीन तास जात होते.

      या क्षणी, आत्ताही स्टेशनात गाडी थांबली कधी, गाडीतून उतरणाऱ्या
माणसांच्या लोंढ्याने मला स्टेशनाबाहेर फेकले कधी, मी टॅक्सीत बसलो कधी आणि मुंबई महापालिकेतील या अतिक्रमण विभागातील माझ्या टेबलाशी येऊन बसलो कधी; काही म्हणता काही मेळ लागत नव्हता. नाही म्हणायला, लिफ्टमधून येताना, एस्टॅब्लिशमेन्टमधली एक पोरगी, माझ्या झोपाळलेल्या चर्येकडे सहेतुकपणे पाहत," हंऽऽ तिकडे बघा !" असं काही तरी शेजारच्या इसमाच्या कानापाशी कुजबुजली आणि तोही महाभाग आवाजाच्या त्याच पट्टीत तिला," एन्क्रोचमेंटला आहे तोऽऽ. तिथे काऽऽय .......! (इथे तो उजव्या हाताचा अंगठा तर्जनीवर घासून दाखवीत होता) गेला असेल रात्री कुठे साईट इंस्पेक्शनला." अशी, तोंडाकडे तोच अंगठा नेत, भिवया उंचावत, मौलिक माहिती देत होता. त्यावर ती फिस्कारून हसलेली आणि... " वॉ‍ऽऽव्‌ लक्की गाय्‌ !"असं म्हणाल्याचं मला चांगलंच आठवत होतं.

      " साहब, हमरी फाईलका काय हुआ ?" या आवाजासरशी मी धाडकन जागा झालो. या गर्जनेचा उगम माझ्या टेबलासमोर उभा ठाकलेला, डोळ्यावर काळा चष्मा आणि काळ्याच; पण भरभक्कम देहयष्टीच्या विरोधाभासात हस्तिदंती रंगाच्या सफारी सूटमधला नरपुंगव होता. 'बटाटा हाइट्स' या नावाने बांधलेल्या इमारतीचा तो बांधकाम कंत्राटदार होता. इमारतीचा आणखी काही भाग तो बांधू पाहत होता आणि ते अनधिकृत असणार आहे, अशी हरकत घेणारी याचिका त्या इमारतीत राहण्याऱ्या एका पावशे नावाच्या इसमाने दाखल केली होती. कंत्राटदाराला तो दावा अमान्य होता आणि त्या प्रकरणाची शहानिशा करण्याचे काम माझ्याकडे होते. हे मला तत्काळ आठवले.

 

" हां, वो सब देखना पडेगा. साईट व्हिजिट करनी पडेगी. मेझरमेंट लेने पडेंगे. तुम्हारा बांधकाम प्लॅनके मुताबिक है के नही वो सब देखना पडेगा. " मी वेळकाढूपणाचा प्रस्ताव मांडला.
" चलिये ना साहब. हम गाडी लाया हूँ. चलके देख लेते है. बाकी सब वहीं जमा लेंगे "

      शेवटच्या वाक्यावर त्याने त्याचा एक डोळा बारीक केला होता. ते मात्र मला आवडले नाही. त्याचे ते वाक्य पलीकडच्या टेबलवरील पोंक्ष्याच्या कानावर तर गेले नाही ना ? मी चपापून पोंक्ष्याकडे पाहिले. तर तो गालातल्या गालात हसत होता. इतकेच नव्हे तर तो मला ' जा, जा! ' अशा अर्थाच्या खुणाही करत होता. मला कसेसेच झाले. मला हे सारे नवीन होते. मी या खात्यात नुकताच बदलून आलो होतो. उमेदीची दोन वर्षे एस्टॅब्लिशमेंटला काढून झाल्यावर माझी बदली इथे झाली होती. माझ्या आधी हे काम पाहणारे सद्गृहस्थ अशाच एका भानगडीत निलंबित झालेले होते आणि 'कलीन शर्ट' म्हणून माझी इथे नेमणूक झाली होती.
" गाडी की कोई ज़रूरत नही. आप चलिये. मै पहुँच जाऊँगा वहाँ. थोडी देर से."
असं म्हणून मी त्याची बोळवण केली. मात्र ती इमारत मला पाहावीच लागणार होती. शिवाय 'बटाटा हाइट्स' या काहीशा विचित्र नावाने मनात कुतूहल जागे झाले होते. काही तातडीने पाहण्याजोगे कागद पाहून मी 'बटाटा हाइट्स'ची फाईल काढली आणि साईट व्हिजिटची परवानगी घेऊन जाण्यासाठी जीप मागवली.

      जीपमध्ये मी रात्री वाचायला घेतलेल्या कादंबरीचा आणि 'बटाटा हाइट्स' या दोन्ही परस्परभिन्न गोष्टींचा विचार करीत होतो. कादंबरीचे कथानक एका 'मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' अशा विचित्र विकाराने ग्रासून लागोपाठ पाच खून करणाऱ्या मुलीवर बेतलेले होते. प्रत्येक खुनाच्या वेळी तिचे तात्कालिक व्यक्तिमत्त्व तिच्या नैसर्गिक व्यक्तिमत्त्वापेक्षा अगदी निराळे असायचे. जणू एक दुभंग-व्यक्तिमत्त्व! मी विचार करीत होतो, खरंच असं असू शकेल ? एखादा माणूस असे निराळे व्यक्तिमत्त्व घेऊन जगू शकतो ? निदान, काही काळापुरता का होईना, असा वावरू शकतो ?

      डोक्यातली कादंबरी मी महत्प्रयासाने बाजूला सारली आणि 'बटाटा हाइट्स'चा विचार करू लागलो. मला तो बटबटीत सफारीवाला आठवला. पण मला त्याच्याशी काही घेणे-देणे नव्हते. ते तसे असायलाही नको होते. कारण कुणा पावशे नावाच्या गृहस्थाने (आमच्या भाषेत भोगवटाधारक) अनधिकृत बांधकामाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मला त्याची आणि त्याचीच भेट घ्यायला पाहिजे, असे मी मनाला ठासून बजावले. एवढ्यात ती 'बटाटा हाइट्स' आलीदेखील.

      एका सहामजली सिमेंट-काँक्रिटने बांधलेल्या उत्तुंग इमारतीसमोर मी उभा होतो. प्रत्येक मजल्यावर आठ बिऱ्हाडे असावीत. खालचा मजला म्हणजे आतल्या बाजूने वाहनतळासाठी मोकळी जागा आणि बाहेरच्या बाजूने सलग ओळीने दुकानाचे गाळे. इमारत काटकोनात बांधलेली. म्हणजे चार बिऱ्हाडांच्या काटकोनात लगतची चार बिऱ्हाडे. इमारतीची रचना एकूणच थोडी चमत्कारिक वाटणारी. इमारतीच्या खालील उरलेली जागा विरुद्ध बाजूला बांधलेल्या तटबंदीवजा भिंतीने बंदिस्त केलेली. कोपऱ्यात बांधलेले एक गणपतीचे मंदिर. त्याच्यासमोर, बहुधा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासेक माणसे बसू शकतील असा चबुतरा. मी मुंबईत गेली दोन वर्षे होतो. अनेक नावीन्यपूर्ण आणि नव्या काळाशी सुसंगत इमारती मी पाहिल्या होत्या. पण नावीन्याचा फारसा लवलेश नसलेली ही इमारत पाहून मी जरा अचंब्यात पडलो आणि शिवाय ही इमारत किंवा हा परिसर मी याआधी केव्हातरी पाहिलेला आहे, असं वाटायला लागलं. काही निराळीच कंपनं मला जाणवायला लागली.

मला पाहताच मघाचा तो कंत्राटदार सामोरा आला. "आव, आव साहब," म्हणत तो मला त्याच्या कार्यालयाकडे नेऊ लागला. पण मी साफ नकार दिला आणि त्या पावशेची चौकशी केली. तो आणखी काही बोलण्याच्या आतच त्या पटांगणात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांपैकी एकाला 'पावशे कुठे राहतात,' म्हणून विचारलं.

" टॉक्क्‌! कोन्ते पावशे पायजेलेत तुम्हाला? आय मिन्‌, थर्टीन नंबर की थर्टीफोर?"
" पावशेऽऽऽ! म्हणजे तेऽऽऽआपलंऽऽऽ ...!" मी गडबडलो. पण का कुणास ठाऊक  आणि " थर्टीन! तेरा, तेरा... अण्णा....अण्णा पावशे" असा, जवळजवळ, ओरडलोच... ...काय झालं होतं मला ? कोण अण्णा पावशे ? ...मी तेरा नंबरच का सांगितला ? ...डोक्यात एक लहानशी कळ उठते आहे असं वाटायला लागलं. एव्हाना तो सगळी क्रिकेटची टीम जमा झाली होती आणि खूक्क्‌ करून हंसायला लागला होती.

" कूऽऽल मॅन! तुमचं कॉय कुंडली दॉखवायचं आहे कॉ ? " पहिले दोन शब्द त्या टीमला उद्देशून; पण पुढील सारे मला.
" नाही. कुंडली.. तसलं काही नाही. माझं काम ... आय मिन्‌, खरं म्हणजे पावश्यांचं काम...
सॉरी, मी कॉर्पोरेशन मधून एन्क्रोचमेंटच्या चेकिंगसाठी आलो आहे. "
"ओह! म्हंजे मक्याचे पॉप्स.. " मला मक्याची कणसं माहिती होती. पण मक्याचे पॉप्स ??
पण मला फार विचार करू न देता इतका वेळ शांतपणे बाजूला उभा असलेला एक गोरटेला मुलगा पुढे आला नि म्हणाला, चला. मी त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. मध्येच त्याला विचारलं, " का रे, मक्याचे पॉप्स.....?"

 " माझे वडील! मकरंद माझं नांव. मकरंद पावशे. तुम्हाला माझ्या बाबांना भेटायचं ना ? चला "
  तेरा क्रमांकाच्या घराचा दरवाजा उघडला जाताच चिरंजीव मकरंद ऊर्फ मक्याने, सदरा पायजमा परिधान केलेल्या एका 'फॉर्टी प्लस' पुरुष व्यक्तीला मोठ्याने केवळ " बाबा " अशी हाक मारली आणि अंगठ्याने माझ्याकडे निर्देश करीत आतल्या खोलीकडे धूम ठोकली. मी " अण्णा,..." असे म्हणून बोलायला सुरुवात करणार इतक्यात श्रीयुत पावशे उद्गारले," ते गेले. सहा वर्षं झाली त्याला. पण आपण....? आणणं....? माझे वडील ते..!"
" अरेरे, वाईट झालं. सॉरी हं" हं. मला वाटतं खूप चांगले ज्योतिषी होते ते.
 "बाप रे!" माझ्या आतून कोणी तरी बोललं, 'तुला माहीत होतं ते".. काय होत होतं मला ? मी तर इथे आयुष्यात पहिल्यांदाच येत होतो... ...त्या हस्तिदंती रंगाचा सफारी सूट घातलेल्या कंत्राटदाराचे लालबुंद डोळे मला दिसायला लागले... ...त्याच्या काळ्या चष्म्यातूनही ते मला स्पष्ट दिसत होते  आणि ... ...तेरा नंबर ? ...काय आहे हे ? ..."  घशाला कोरड पडत चालली होती.

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.